जि. प. चे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा राष्ट्रीय काँग्रेसला रामराम
जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे विश्वासू सहकारी उमेश मुकुंदराव आपटे यांनी आपण राष्ट्रीय काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे आज आजरा येथील पत्रकार बैठकीत जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
उमेश आपटे हे गेली २७ वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी दहा वर्षे पंचायत समिती सदस्य, दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केले आहे. आजरा साखर कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषविले आहे. आजरा तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे उमेश आपटे असे समीकरण गेली काही वर्षे बनले होते. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आजही आहे.तर त्यांच्या पत्नी सौ. वैशाली आपटे यांनी गेली पाच वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच उत्तुरचे थेट सरपंचपद भूषवले आहे त्यांचे पिताश्री मुकुंदराव आपटे हे देखील राष्ट्रीय काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते.
याबाबत आपटे यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या काही वर्षात उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वसामान्य पर्यंत तसेच तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण व आपल्या सहका-यांनी केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपणाला भरपूर पदे दिली आहेत त्याचबरोबर आपणही राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी सत्तावीस वर्षे अविश्रांत कार्य केले आहे.पण आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना अनेक समस्या येत असल्याने व कौटुंबिक अडचणीमुळे आपण पूर्णवेळ पक्षाचे काम करू शकत नाही या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदासह सर्व पदांचा राजीनामा त्यांनी देत असल्याचेही यावेळी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आपण राजीनामा दिला असला तरी कोणत्याही पक्षात आपण प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लवकरच ‘ सर्फनाला ‘ चे पाणीपुजन ; आ. आबीटकर
गवसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन उत्साहात
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांकडून वेळोवेळी केली जाणारी मागणी व आरोग्य केंद्राअभावी होणारी गैरसोय विचारात घेऊन तब्बल सात कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र गवसे येथे उभारले जात आहे. या आरोग्य केंद्राचा उपयोग सर्वसामान्यांना निश्चितच होईल. पश्चिम भागातील नागरिकांना यामुळे आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील. या आरोग्य केंद्राकरिता पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यासाठी आपला पाठपुरावा राहील याचबरोबर पश्चिम भागाला वरदायी ठरणाऱ्या सर्फनाला पाणी प्रकल्पाच्या पाणीपुजनाचा कार्यक्रम सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच केला जाईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. गवसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

यावेळी आमदार आबीटकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांसाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न आपला कायम राहिला आहे. तालुक्यात बरेच वर्षे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. चाळोबा मंदिर परिसराच्या विकासासाठी या भागातील नागरिकांची मागणी आहे यासाठीही पाठपुरावा केला जाईल. शासकीय फंडातून शेतापर्यंत पाणी नेण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे या पार्श्वभूमीवर पाझर तलाव, साठवण तलाव ठिकठिकाणी तयार करण्यात येतील. पश्चिम भागामध्ये हत्तीकडून नुकसानीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यासाठी हत्तींच्या नियंत्रणाकरता उपाय योजना करण्याबाबत हालचाली सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, तालुक्यामध्ये पंचवीस वर्षापूर्वी मंजूर झालेले पाणी प्रकल्प पूर्णत्वास येण्यास तब्बल २०२३ साल उजाडले आहे.गवसे प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थितीही थोडीफार अशीच आहे. अनेक संघर्षातून सदर प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच सर्फनला प्रकल्पाच्या पूर्णत्वास आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून आकार येईल असे स्पष्ट केले.
यावेळी मारुती डोंगरे,शिवाजीराव पाटील,माजी सभापती सौ, रचना होलम, डॉ.योगेश साळे,माजी सभापती उदय पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी आज-याच्या नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, तहसीलदार विकास अहिर,शाखा अभियंता एस.एस.नाईक, आजरा साखर कारखान्याचे संचालक जनार्दन टोपले,आनंदा कांबळे, दशरथ अमृते, राजेंद्रसिंह सावंत, संजय पाटील, इंद्रजीत देसाई,संजयभाऊ सावंत, अमानुल्ला आगलावे,विशाल शिंदे, सहदेव नेवगे, महादेव हेब्बाळकर, सुरेश होडगे,विलास पाटील,गोविंद पाटील कॉ. संपत देसाई,निलेश चौगुले, रवींद्र दिवेकर,मुकुंदराव तानवडे, राजू पोतनीस,सौ.संपदा देसाई, सुरेश मिटके, अविनाश पाटील, डॉ.संदीप देशपांडे, अनिकेत चराटी, विजय थोरवत, विनोद मुरकुटे, वैभव सावंत, सिद्धेश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी केले तर सरपंच सौ.सोनाली पाटील यांनी आभार मानले.







