
नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करा…
खा. शाहू छत्रपती व आ. सतेज पाटील यांच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यात २०० घरांची पडझड झाली असून ३६१ हेक्टर क्षेत्रावरील पिक पाण्याखाली गेली आहेत. घरांचे पंचनामे सुरु आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार, समीर माने यांनी दिली. झाल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करा अशा सूचना यावेळी खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांनी दिल्या.
खासदार शाहू छत्रपतींनी आजरा तालुक्यातील पूरपरिस्थीचा आढावा घेतला. येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये आढावा बैठक झाली. आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, परशुराम बामणे, दिग्वीजय कुराडे, बसवराज आजरी,युवराज पोवार, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, मुख्याधिकारी स्रज सुर्वे आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी स्वागत केले. पूरामुळे नदीपात्रालगतची शेती पाण्याखाली गेल्याने पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाण पिके कुजली आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. नद्यांमध्ये गाळ साठून उथळ झाल्याने पूर येतो. त्यातील गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे होवून त्यांना भरीव शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांना देण्यात आले.
श्री. माने म्हणाले घरांचे पंचनामे सुरु आहेत. २०० घरांची पडझड झाली असून अंदाजे ८ लाखांचे नुकसान झाले आहे. ३६९ हेक्टरवरील पिक पाण्याखाली गेली आहेत. पाणी उतरल्यावर तातडीने शेतीचे पंचनामे पूर्ण केले जातील. दहा बंधारे पाण्याखाली होते त्यापैकी आठ बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे. दिनेश कांबळे, पांडुरंग पाटील, डायें, धनाजी राणे यांनी सूचना मांडल्या. आम.सतेज पाटील म्हणाले, शासनाच्या घरकुल योजनेतून घर बांधणीसाठी नुकसानग्रस्तांना लाभ कसा देता येईल. हे गटविकास अधिकारी यांनी पहावे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी. अडचणी असल्या तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोडवू. या वेळी सुनिल शिंदे, किरण कांबळे, विजय देसाई, सचिन शिंपी, विलास पाटील, विश्वास जाधव, सदाशिव डेळेकर, एस. पी. कांबळे, अशोक पोवार, विक्रम पटेकर, संकेत सांवत, किरण गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हिरण्यकेशी नदीवर साळगावला पूल व्हावा
हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा दरवर्षी पाण्याखाली जातो. पेरणोली पंचक्रोशीसह पश्चिम भुदरगड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी पांडुरंग पाटील, दिनेश कांबळे यांनी केली. पुलासाठी अर्थसंकल्पात ३ कोटी ६० लाखांची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे तातडीने पूल तयार करावा अशीही मागणी केली.

प्रशासकीय अधिका-यांची पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसामुळे झालेली घरांची पडझड त्याचबरोबर पाणी साठून झालेले पिकांचे नुकसान याबाबतच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने करावी. अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. त्यांनी तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी त्यांनी विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी तहसीलदार समीर माने, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, बालकल्याण अधिकारी बापू शिनगारे आदी प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार माने यांनी तालुक्यातील पूरपरिस्थीतीचा आढावा मांडला. तालुक्यात दोनशे घरांची पडझड झाली आहे. यामुळे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ३६१ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. घराचे पंचनामे सुरु आहेत. पाणी ओसरल्यावर पिकांचे पंचनामे केले जातील. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, घराचे व शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचेही कामही गतीने करावे. लाभापासून कोणही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामिण पाणीपुरवठाचे उपअभियंता महादेव तिवले, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

विद्या मंदिर मेंढोली शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण सप्ताह व पालक योगदान अंतर्गत विद्यामंदिर मेंढोली शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि श्री. सुनिल होडगे यांनी आपली मूले हर्षल व अराध्या यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना दप्तर व लेखन साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गाणी व नृत्य सादर करीत दोघांना शुभेच्छा दिल्या. सुनिल व वसुधा होडगे यांनी सामाजिक भान जपत केलेले कार्य उल्लेखनीय आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजीव नांदवडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सरपंच श्री.विलास जोशिलकर , जोतिबा चौगले,अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उमाजी कुंभार यांनी केले. याप्रसंगी मुख्याधापक गुंजकर सर व सौ. वसुधा होडगे यांनी मनोगत व्यक्त केले.श्री. शशिकांत सुतार यांनी आभार मानले.
निधन वार्ता…
सुनंदा ओतारी

आजरा येथील श्रीमती सुनंदा महादेव ओतारी (वय ७२ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आजरा येथे आहे.
पाऊस-पाणी…

आजरा मंडल व परिसरात पावसाचे जोर कोसळला असून गेल्या २४ तासात २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरीही साळगाव बंधारा अद्यापही पाण्याखाली असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
निवेदन…
पावसाच्या ताज्या घडामोडी व आकडेवारी मिळण्यास विलंब होत असल्याने अपवादात्मक परिस्थितीत बातम्या देण्यास उशीर होत आहे. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.
मुख्य संपादक

