दि. १४ सप्टेबर २०२४


तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून एक जण ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे ता. आजरा येथे सुभाष जानबा पाटील (वय ५४ वर्षे) यांचा शेतातील विद्युत खांबावरील तुटलेल्या तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी…
सुभाष पाटील हे किणे- कोळींद्रे मार्गावरील कामत नावाच्या शेतामध्ये जनावरांसाठी चारा आणण्याकरीता नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते. उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता शेतातील गवतामध्ये विद्युत खांबांच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
पाटील यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
याबाबतची वर्दी मारुती सुभाष पाटील यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

२५ कोटी ३९ लाखांच्या विकास कामांचे आज उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत असलेल्या विविध २५ कोटी ३९ लाखाच्या विकास कामांचे उद्घाटन होत आहे.
या कामांमध्ये किटवडे -धनगरवाडा रस्ता- १ कोटी ४२ लाख, शेळप-आंबाडे-लिंगवाडी रस्ता- ५ कोटी ५३ लाख, दाभिल फाटा ते गवसे रस्ता- १० कोटी, गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र- ६ कोटी ६४ लाख, देवर्डे ते पारेवाडी रस्ता- १ कोटी ३० लाख, देवर्डे फाटा ते वेळवट्टी- ५० लाख यांचा समावेश आहे.
या सर्व विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज शनिवारी होणार आहे.

शासकीय योजनांची लूट
बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासकीय योजनांवर डल्ला मारणा-यांचे पितळ उघडे करणारे वृत्त ‘मृत्युंजय महान्यूज’ मधून प्रसिद्ध झाल्यानंतर बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले असून आता या योजनांचा लाभ घेताना ‘ धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय…’ अशी विचीत्र अवस्था या बोगस लाभार्थ्यांची झाली आहे.
वेगवेगळ्या योजना पदरात पाडून घेत असतात. वैशिष्ट्य म्हणजे काही नोकरदार, आयकर दाते मंडळी व त्यांचे कुटुंबीय यामध्ये गुंतलेली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करणाऱ्या मंडळींनी चक्क कुटुंबीयांना बांधकाम कामगारांचे बोगस दाखले मिळवून त्यांचेही लाभ उठवण्यास सुरुवात केली आहे.केवळ इतकेच नाही तर शासनाच्या शौचालय, घरकुल बांधणी, काजू प्रक्रिया उद्योग, अतिवृष्टीत घर व पिकांचे नुकसान, विविध निराधार विधवा, परितक्यांसाठी असणाऱ्या योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, यासह लाडकी बहीण योजनेचाही लाभ आणि जण उठवत आहेत. आता या सर्वांमागे चौकशीचा ससेमीरा लागणार आहे.
आधार असणारे बनले निराधार…
शासनाच्या निराधार लोक,विधवा महीला व वयोवृद्ध व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांची अवस्थाही फारशी वेगळी नाही. नोकरदार मंडळींचे पालक चक्क कागदोपत्री निराधार बनले आहेत.
लवकरच याद्या प्रसिद्ध होणार…
बांधकाम कामगार म्हणून लाभ उठवणाऱ्या मंडळींसह विविध शासकीय योजनांचे लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या माहिती करिता लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. यातूनच शासनाला लुबाडणाऱ्या अनेक मंडळींचा चेहरा जनतेसमोर येणार आहे.

आता पाटी फुटणार नाही…
वाटंगी शाळेत डिजिटल पाट्यांचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘ शाळा सुटली पाटी फुटली ‘ असे म्हटले जात असे. पण आता फुटणारी पाटी इतिहास जमा होऊन कधीही न फुटणारी डिजिटल पाटी मुलांच्या हातात आली आहे .सध्याच्या डिजिटल युगात पारंपारिक पाटी ला छेद देऊन आधुनिक पद्धतीची नवीन तंत्रज्ञान युक्त डिजिटल पाटी आता मुलांच्या हातात आली आहे .
वाटंगी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम म्हणून शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांना डिजिटल पाट्यांचे वाटप केले आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. संजय पोवार उपस्थित होते तर माजी सरपंच व विद्यमान सदस्य कारखान्याचे संचालक श्री. शिवाजी नांदवडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पाट्यांचे वाटप करण्यात आले .
स्वागत प्रस्ताविक मुख्याध्यापक सुनील कामत यांनी केले .श्री नांदवडेकर सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले . यावेळी उपसरपंच सौ. मीनाक्षी देसाई, सदस्य श्री. मधुकर जाधव, सौ . आक्काताई कुंभार, सौ. स्वाती गुरव , सौ.सुनिता सोनार, सौ मंगल वांद्रे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल तेजम आदी मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक श्री. रणजित पाटील उपस्थित होते. शेवटी आभार अनिता कुंभार यांनी मानले.
सूत्रसंचालन श्रीमती रंजना हसुरे यांनी केले श्रीमती अनुजा केने, अनिता जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .

कानोलीची लक्ष्मी यात्रा मे महिन्यात
गावसभेत ग्रामस्थांचा निर्णय..

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा )येथील लक्ष्मी देवीची यात्रा तब्बल १३ वर्षानंतर होणार आहे. यात्रे संदर्भात चर्चा करणेसाठी प्राथमिक शाळा येथे बैठक आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुषमा पाटील होत्या,
स्वागत व प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील यांनी केले, यावेळी झालेल्या चर्चेत लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार ६ मे व बुधवार ७ मे २०२५ रोजी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला,
मंगळवार दि.१० रोजी ग्रामदैवत भैरवनाथ व लक्ष्मी देवीला नारळ व पान विडा ठेऊन शुभारंभ झाला, दसऱ्यानंतर बळ सोडण्याचा निर्णय झाला. यावेळी यात्रा कमिटी निश्चित करण्यात आली.
यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष मनोहर सावतकर सेक्रेटरी चंद्रकांत आपगे, कारखाना संचालक राजेंद्र मुरुकटे, माजी सरपंच संभाजी आपगे, सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, ग्रा. प. सदस्य चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, सारिका भोसले, शुभांगी पाटील, आरती देसाई यांच्यासह दिनकर पाटील, श्रीपतराव देसाई,बाजीराव पाटील, दत्तात्रय भोगण, विजय हरी पाटील, पंडित पाटील दिग्विजय भोसले, संतोष भोगण,तानाजी पाटील यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार सुभाष पाटील यांनी मानले

गणेश दर्शन
१.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरदाळ

अध्यक्ष.. अमोल बांबरे
उपाध्यक्ष.. दिपक पाटील
सचिव.. योगेश नाईक
सेक्रेटरी..प्रतिक कुडवे
मूर्ती देणगीदार.. अश्विनी पाटील
मूर्ती शिल्पकार.. सतिश कुंभार
२.राजे एक स्वाभिमानी हुंकार कला क्रीडा सांस्कृतिक सेवा मंडळ, पारेवाडी.

अध्यक्ष -अनिल धोंडिबा नार्वेकर
उपाध्यक्ष – तुषार गोविंद निर्मळे
खजिनदार -अनिल लक्ष्मण निकम
सचिव – निलेश शांताराम निर्मळे
मुर्ती देणगीदार – आदिनाथ उत्तम निर्मळे
३. जाणता राजा कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ, बहिरेवाडी

अध्यक्ष– अशोक पांडुरंग जोंधळे. उपाध्यक्ष– प्रल्हाद शामराव इंचनाळकर. सचिव — पुंडलिक मारुती दळवी खजिनदार — अशोक दिनकर इंचनाळकर. शिल्पकार– धीरज कुंभार हिरलगे. मुर्ती देणगीदार – अशोक पांडुरंग जोंधळे

शेवटी ते झाड हटले…

आजरा बस स्थानक परिसरात वटलेले आंब्याचे झाड अखेर हटवण्यासाठी मुहूर्त मिळाला.
शुक्रवारी रात्री सदर झाड हटवण्यात आले. धोकादायक स्थितीत कितीतरी दिवसापासून हे झाड वटलेल्या अवस्थेत उभे होते.

धार्मिक…
♦ह .भ.प.पू. लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताहास शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात उत्साहात सुरुवात...
♦लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शनिवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन…
♦भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शनिवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन…

गुगली…की यॉर्कर…

त्यांचा तरी काय दोष ?
नुकताच श्रावण संपला. पण जत्रा, यात्रा, लग्न समारंभ असं कुठच काही नसल्यामुळे फुकटच्या मटणासह तांबड्या- पांढऱ्या वर ताव मारणाऱ्या मंडळींची चांगलीच गोची झाली आहे. श्रावण संपताच मटणाचे दरही ७००/- रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामुळे आता ठीक- ठिकाणी चरायला सोडलेल्या बक-या पळवून नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये परवा जाता जाता मोटरसायकलस्वारांनी(?) चरायला सोडलेलं बकरच चोरून नेलं.
आता मटण व रस्स्यावर येथेच्छ ताव तर मारायचा आहे पण मटणाचे वाढलेले दर परवडत नसतील तर त्या बिचार्यांना तरी दोष का द्यावा ?


