दि. १३ सप्टेबर २०२४


शासकीय योजनांची लूट
कारवाईची टांगती तलवार…?बोगस कागदपत्रांची होणार शहांनिशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासकीय योजनांवर डल्ला मारणारे वेगवेगळ्या योजना पदरात पाडून घेत असतात. वैशिष्ट्य म्हणजे काही नोकरदार, आयकर दाते मंडळी व त्यांचे कुटुंबीय यामध्ये गुंतलेली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करणाऱ्या मंडळींनी चक्क कुटुंबीयांना बांधकाम कामगारांचे बोगस दाखले मिळवून त्यांचेही लाभ उठवण्यास सुरुवात केली आहे.केवळ इतकेच नाही तर शासनाच्या शौचालय, घरकुल बांधणी, काजू प्रक्रिया उद्योग, अतिवृष्टीत पडझड व पिकांचे नुकसान, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, यासह लाडकी बहीण योजनेचाही लाभ कांही जण उठवत आहेत. आता या सर्वांमागे चौकशीचा ससेमीरा लागणार असून काही मंडळींनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघड होत आहे. लवकरच या लाभार्थींच्या याद्या सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
आता शासनाच्या योजना लुटण्यासाठीच असतात असा समज करून घेणाऱ्यांची मात्र गोची झाली आहे.
बोगस कागदपत्रांचे सादरीकरण…
या योजनांचे लाभ घेताना बोगस कागदपत्रांचे सादरीकरण करण्यात आले आहे. अगदी उत्पन्नाच्या दाखल्यापासून ते लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्रेही बोगस देण्यात आली आहेत. यामुळे मुख्य लाभार्थी वंचित राहत असल्याचे समोर येत असून अशा कागदपत्रांवर सही, शिक्के देणारी मंडळीही अडचणी देण्याची शक्यता आहे.
बांधकाम कामगार आले कोठून?
तालुक्यात शेकडो बोगस बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे.ते शासनाला चुना लावून शासनाच्या विविध योजना पदरात पाडून घेत आहेत अशा मंडळींची चर्चा सध्या तालुक्यात जोरात सुरू आहे. बांधकामाशी काडीचाही संबंध नसणारी मंडळींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
पडताळणी पथकाची नेमणूक…?
शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत असून सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी जोडण्यात आलेली कागदपत्रे व लाभार्थ्यांची खरी आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र पथकांच्या नेमणुकीच्या हालचालीही सुरू आहेत असे समजते.


पुढच्या वर्षी लवकर या…
भावपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्ती विसर्जन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यांमध्ये भावपूर्ण वातावरणात ‘ पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने उघडीप असल्याने घरगुती गणेश मुर्त्या विसरण्यासाठी प्राधान्य दिले जात होते. चार नंतर मात्र संपूर्ण तालुक्यात एक वेगळा माहोल तयार झाला होता. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी ‘बाप्पा मोरया’ चा गजर आणि पुढच्या वर्षी लवकर या चे साकडे घालत घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी पाच नंतर मात्र वातावरणात बदल होऊन पावसाची हजेरी लागली. त्यामुळे मात्र उशिरा गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मंडळींच्या उत्साहावर काही प्रमाणात पाणी पडले.
आजरा तालुक्यामध्ये शासनाच्या वतीने ठिकठिकाणी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात आले. याकरता शासनाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्थानिक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसर, हिरण्यकेशी नदी काठ व वडाचा गोंड येथे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती स्थानिक शिवाजीनगरच्या कार्यकर्त्यांनीही शिवाजीनगर घाट परिसरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती याला भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आजपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धमाल…
बहुतांशी घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन झाल्यामुळे आज पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध संस्कृती कार्यक्रमांची धमाल उडणार आहे.अनेक ठिकाणी झिम्मा फुगडी, रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर, महाप्रसाद, भजन स्पर्धा, यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अनंत चतुर्थी पर्यंत या कार्यक्रमांचा आनंद शहरवासीय व तालुका वासीयांना लुटण्यास मिळणार आहे.


आज-यात निषेध आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव याने प्रभू श्रीराम, सर्व वारकरी संप्रदाय, आणि श्री स्वामी समर्थ व हिंदु समाजातील महापुरुषांच्यावर चिखलफेक केली आणि गरळ ओकली.
यामुळे अधिवेशनात हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा काम या केले आहे. हे वक्तव्य करत असताना शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचा काम न करता त्यांना मुक समर्थन दिले. याच्या निषेधार्थ भाजपा आजरा तालुका यांच्या वतीने तहसीलदार आजरा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोकअण्णा चराटी जिल्हा उपाध्यक्ष, अनिरुद्ध बाळ केसरकर तालुका अध्यक्ष, सी.आर. देसाई , संभाजी सरदेसाई, अनिल पाटील, संतोष चौगुले, अभिजीत रांगणेकर, महेश पारपोलकर, रुपेश परीट, शुभम पाटील, शिवाजी खामकर, राहुल पेंडसे,सुनील परीट, बबलू कुंभार, राकेश परीट,प्रवीण सुतार, विनायक शिवणे, प्रवीण हुक्केरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


बहिरेवाडी येथे झिम्मा फुगडी स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जाणता राजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बहिरेवाडी यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य खुल्या झिम्मा- फुगडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी आठ वाजता या स्पर्धा होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७७७७/-,५५५५/-,३३३३/- रुपये रोख व शिल्ड तर उत्तेजनार्थ रुपये २२२२/- रोख व शिल्ड देण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अशोक जोंधळे यांनी दिली आहे.

गणपतराव गेले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सुलगाव येथील माजी सरपंच, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक, ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गणपतराव धोंडीबा खवरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समिती त्यांचे वय ७८ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले व एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. एक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची तालुक्यात ओळख होती.

गुगली…की यॉर्कर…
१.गड्या आपले ‘खेडे’ च बरे...
महात्मांनी सांगितले होते खेड्याकडे चला. पण मग खेड्यातील मंडळींनी काय करायचं सर्व ‘जन्नत’ तर शहरात आहे. ही ‘जन्नत’ अनुभवण्यासाठी तालुक्यातील ‘खेड्या’तून शहराकडे गेलेला एक जण चक्क ‘लॉज’वर सापडला. आता लॉजवर म्हटल्यावर पुढे सांगण्याची गरज नाही.
पोलिसांनी त्याला ‘रंगेहात ( ?) ताब्यात घेतले असून गड्या आपले ‘खेडे’ च बरे असे म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
२. या ‘गैर’सोयीला जबाबदार कोण…?
जीवनावश्यक वस्तूंसाठीच किराणा दुकान असते. आता अलीकडे जीवनावश्यक वस्तूमध्ये काही लोकांना मद्यही जीवनावश्यक वाटू लागत असल्याने मलिग्रे पंचक्रोशीतील एका किराणा दुकानदाराने चक्क किराणा दुकानातूनच मद्य विक्री सुरू केली. तळीरामांचाही याला प्रतिसाद मिळत होता.सब कुछ अलबेल होते.पण विरोधकांना म्हणे हे रुचले नाही.थेट ‘ खात्याचा’ छापा पडला. किराणा दुकानदार रंगेहात जाळ्यात सापडला.
आता भागातील नागरिकांना ऐन सणासुदीत ‘जीवनावश्यक’ वस्तूसाठी निश्चितच पायपीट करावी लागणार हे निश्चित… या ‘ गैर ‘सोयीला जबाबदार कोण…?


गणेश दर्शन
१.शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ, खेडे

अध्यक्ष : वैभव बाबुराव आर्दाळकर
उपाध्यक्ष : बाळासाहेब कृष्णा सावरतकर
सचिव : बाळासो शामराव आर्दाळकर
खजिनदार : सतीश कृष्णा पाटील
शिव-शक्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, पेरणोली

अध्यक्ष : गोवर्धन काकासो सुतार
उपाध्यक्ष : मृणाल कालेकर
खजिनदार : गुरुप्रसाद काकासो देसाई
सचिव : हर्षवर्धन तानाजी देसाई
मुर्ती देणगीदार : प्रमोद ज्ञानोबा हवालदार


