मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५


कोवाडेत हत्तीचा धिंगाणा…
मोटरसायकलसह पिकांचे नुकसान
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यमेकोंड, वाटंगी परिसरात गेले कांही दिवस धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने कोवाडे/पेद्रेवाडी सीमेवर असणाऱ्या लिलाव रांग येथील भैरु शिवगण यांच्या शेतातील केळींसह शेती पिकाचे नुकसान करून मोटरसायकलचे देखील नुकसान केले आहे.
गेले कित्येक दिवस हत्ती या भागात ठाण मांडून आहे. सध्या ऊस तोडणीची कामे जोरात असताना हत्तीचा वावर सुरूच असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. बिनधास्तपणे हत्तीचा होणारा वावर शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागला आहे.

खानापुरात आगीचे तांडव
उभा ऊस पेटला…
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिनी खानापूर ता. आजरा येथे भर दुपारी लागलेल्या आगीमध्ये उभा ऊस पेटल्याने सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भर दुपारी अचानक आग लागल्याने यशवंत गणू जाधव, बंडू लक्ष्मण जाधव, प्रकाश पांडुरंग जाधव, संतोष मारुती चव्हाण, शिवाजी अण्णाप्पा बोटे, देवदास जाधव, शिवाजी विठोबा पाटील, राजाराम आप्पा मरगळे, एकनाथ जाधव आदींच्या उसाने पेट घेतला. दुपारची वेळ असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजरा येथून अग्निशमन दलाची गाडी तयार करण्यात आली. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. दरम्यान २०० टन ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नुकसान झाले आहे.
सुदैवाने या परिसरात असणाऱ्या दोन पोल्ट्रया आगीपासून बचावल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा तालुक्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवून मिळावी तसेच आजऱ्यातील मदरसा गल्लीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुरळीत व्हावा यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आजरा तालुक्यामध्ये आजरा ग्रामीण रुग्णालय व उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी केवळ दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी जादा रुग्णवाहिका मिळाव्यात व आजरा शहरातील मदरसा कॉलनी येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन वर्षे उलटूनही यावर नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही. पाण्यासारखा मूलभूत विषय सुद्धा लवकरात लवकर सोडवावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष किरण के. के. यांच्या नेतृत्वात, डॉ. उल्हास त्रिरत्ने, रवी देसाई, डॉ. सुदाम हरेर, अमित सुळेकर, राहुल मोरे, नितीन राऊत, यास्मिन बुड्ढेखान, सलीम महागोंडे, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, डॉ. इंद्रजीत जाधव, दशरथ सोनुले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता
पांडुरंग कातवरे

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता. आजरा येथील पांडुरंग एकनाथ कातवरे वय ८० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
युवराज व विलास कातवरे यांचे ते वडील होत. आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रीमती लक्ष्मीबाई पाटील

कानोली (ता. आजरा )येथील श्रीमती लक्ष्मीबाई भैरू पाटील (वय वर्षे ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज मंगळवार दि.२८ रोजी आहे .


वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना गवसे
गाळप स्थिती …

दिनांक -२६ जानेवारी २०२५ अखेर
दिवस – ७१
एकूण गाळप –२,२०,३७० मे.टन.
एकूण साखर उत्पादन- २,५१,०६२ क्विंटल
सरासरी उतारा – ११.७०

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९



