सोमवार दि.२७ जानेवारी २०२५


सेवानिवृत्त प्राध्यापिकेची तीस लाखांची फसवणूक

आजरा येथील एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला मोबाईल वरून संपर्क साधून आपल्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे असे सांगून तसेच इतर खोटी माहिती देवुन वेळोवेळी कारवाईची भीती दाखवत तब्बल २९ लाख ९३ हजार १५० रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.
आजरा येथील संबंधित प्राध्यापिका यांना मोबाईल वरून संपर्क साधून आपल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे यासह वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे असे वेगवेगळ्या क्रमांकाच्या मोबाईलवरून सांगत आरटीजीएस, फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून २८ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत सदर रक्कम उकळली आहे.
संबंधित प्राध्यापिकेने वरिष्ठ पोलीस विभागासह आजरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून भा. न्या. सं. कलम २०४,३१८ (४),३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(c), ६६(d), प्रमाणे २५ जानेवारी रोजी स.पो.नी. नागेश यमगर यांचे आदेशान्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे .
सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. लोढे, भुदरगड पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर डल्ला
एक फोन कॉल उचलल्याने या प्रकरणात अडकत गेलेल्या प्राध्यापिकेच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमांवर केवळ भय निर्माण करून बोलण्याच्या जोरावर डल्ला मारण्यात संबंधितांना यश आले. त्यामुळे अनोळखी व माहिती मागणारे फोन कॉल व त्यावरून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजऱ्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात ठीक- ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते तहसील कार्यालय आवारात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या हस्ते तर आजरा पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
येथील आजरा अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते, जनता सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते, स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये अध्यक्ष दयानंद भुसारी यांच्या हस्ते, आजरा मर्चंटस् पतसंस्थेमध्ये अध्यक्ष सूरज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
‘ व्यंकटराव ‘ शिक्षण संकुलामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते, पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये प्रा. डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते तर आजरा महाविद्यालय व आजरा हायस्कूलमध्ये अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे तालुकाभर आयोजन करण्यात आले होते.
रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान महिलांना
रवळनाथ पतसंस्थेत प्रजासत्ताकदिनी होणारे ध्वजारोहण प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता फर्नाडीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी स्वतः ध्वजारोहण न करता दरवर्षी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देवून तालुकावासियांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या या निर्णयाने त्यांच्यासह संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सौ. प्रियंका शिंपी, सुरेखा फडके, धनश्री कांबळे, तेजस्विनी नार्वेकर, संचालिका माधुरी पाचवडेकर, अर्चना मराठे, दिवाकर नलवडे, शेखर करंबळी, आप्पासो पाटील, हुसेनसाब दरवाजकर, अशोक पोवार, अशोक पाचवडेकर, इम्रान सोनेखान, आप्पासाहेव तेरणी यासह संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, मॅनेजर विश्वास हरेर उपस्थित होते.

शनिवारी गणेश जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ देवालय उपसमिती, आजरा यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे शनिवार दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवानिमित्त शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.०० : अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन अभिषेक सेवा, शनिवार दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वा.श्री गणेशयाग, दुपारी १२.०० वा. श्री गणेश जन्मकाळ व आरती, दुपारी १२.३० ते ३.००: महाप्रसाद, दुपारी ४.०० वा : वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळ, देवर्डे यांचा भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर सायंकाळी ७-०० वाजता श्रींची महाआरती होणार आहे.

निधन वार्ता
गणपतराव गोविलकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील गणपतराव आप्पाजी गोईलकर (गुरूजी) यांचे वार्धक्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात २ विवाहित मुले, २ मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार असून कृषी विभागाच्या आत्मा कमीटीचे सदस्य अशोक गोईलकर यांचे ते वडील होत.



साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९



