मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५





मुकुंददादांनी बाजी मारली…
साखर कारखाना अध्यक्षपदी बिनविरोध निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी (शरद पवार) चे तालुकाध्यक्ष उदयसिंह उर्फ मुकुंदराव देसाई यांची आज बिनविरोध निवड पार पडली. संचालक मंडळाच्या प्रादेशिक साखर संचालक जी.जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये सदर निवड करण्यात आली. संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेनंतर सत्ताधारी आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद लखोट्यातून अध्यक्षपदाच्या नावाची निवड पाठवली. सर्व संचालकांसमोर हा लखोटा खोलण्यात आला. यामध्ये अध्यक्ष पदाकरिता मुकुंददादांचे नाव सुचवण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. निवड प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. कारखाना अडचणीत आहे हे नाकारता येत नाही. संपूर्ण संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नूतन अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले.
संचालकपद नको पासून अध्यक्ष निवडीपर्यंत अनेक घडामोडी…
गतसाली झालेल्या आजरा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी वेळी आपण संचालक पदासाठी इच्छुक नाही अशी भूमिका मुकुंद दादांनी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी तयार होणाऱ्या पॅनलमध्ये मुकुंददादा नसतील तर आपणही निवडणुकीस इच्छुक नाही अशी अनेकांनी भूमिका घेतली. त्यानंतर मुकुंददादांनी आपला निर्णय बदलून उमेदवारी घेतली. निवडूनही आले. वर्षभरातच त्यांचा उमेदवारी नको ते अध्यक्ष निवडीपर्यंतचा प्रवास निश्चितच चर्चेत आहे.
पुत्र व मानसपुत्र यांचीच नावे अध्यक्षपदासाठी
स्व. बळीरामदादा देसाई यांचे मुकुंदराव हे पुत्र तर विष्णुपंत केसरकर यांची बळीराम दादांचे मानसपुत्र अशी तालुक्याला ओळख … हे दोघेच या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मुकुंदराव देसाई यांना सदर पदाची अखेर संधी मिळाली.
गळीताचे आव्हान कायम
सद्यस्थितीस कारखाना अडचणीत असल्यामुळे अध्यक्ष पद म्हणजे ‘ काटेरी मुकुट ‘ समजला जातो. मध्यंतरी जनता बँक अडचणीत आल्यानंतर मुकुंददादांनी पूर्णवेळ बँकेच्या कारभारात लक्ष घालून बँकेला वैभव प्राप्त करून दिले आहे. याच पद्धतीने कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मुकुंददादा प्रयत्न करतील अशी अपेक्षा कारखाना सभासद, कर्मचारी व ऊस उत्पादक बाळगून आहेत.










