mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५       

आजरा साखर कारखान्यात ‘ देसाई पर्व ‘

               ….ज्योतिप्रसाद सावंत

     माजी आमदार कै. वसंतराव देसाई यांनी आजरा साखर कारखान्याची स्थापना केल्यानंतर प्रथमच कारखाना अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई व उपाध्यक्षपदी सुभाषराव देसाई यांची नियुक्ती झाली आहे. कारखान्याचे संस्थापक देसाई, अध्यक्ष देसाई, उपाध्यक्ष देसाई असा योगायोग यानिमित्ताने जुळून आला असून कारखान्यात ‘ देसाई पर्व ‘ सुरू झाले आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नसावी.

      कारखाना आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना व कारखान्यासमोर अनेक आव्हाने असताना अध्यक्षपदाची जबाबदारी मुकुंदराव देसाई यांनी स्विकारली आहे. जनता सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यास मुकुंद दादांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. परंतु बँकेचा कारभार एकहाती करण्यामध्ये कोणतीच अडचण नव्हती. तशी परिस्थिती कारखान्यात मात्र नाही. वेगवेगळ्या विचारांच्या मंडळींची मोट बांधून कारभार पुढे न्यावा लागणार आहे.

     मुळातच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवणे म्हणजेच पर्यायाने गळीत वाढवणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे, कारखाना उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या ३००० रुपये ते १५००० रुपये भाग भांडवल देऊन सहकार्य केलेल्या सभासदांना सवलतीच्या दरातील साखर उपलब्ध करून देणे, कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संचालक मंडळांतर्गत असणाऱ्या कुरबुरी थांबवून कारभार करणे ही प्रमुख आव्हाने दादांसमोर असणार आहेत.

     राष्ट्रवादी ( अजित पवार) गटाचे मंत्री मुश्रीफ यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या विश्वासाने शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षांकडे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. मंत्री मुश्रीफ यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याकरता मुकुंददादांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. समोर असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम कारखाना गळीतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     एकंदर कारखान्याच्या अडचणीच्या कालावधीत अध्यक्षपदी विराजमान होऊन मुकुंददादांनी तालुकावासीयांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत हे नक्की…

शहरासह परिसरात पाऊस…
बळीराजा सुखावला

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह परिसरामध्ये काल मंगळवारी समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

      निसर्गरम्य समजल्या जाणाऱ्या आजरा तालुक्यामध्ये अलीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी सर्वत्र उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. कालच्या पावसाने हवेत थोडा गारवा निर्माण झाला आहे.

      केवळ शहरातच नाही तर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काजू बियांचा हंगाम संपुष्टात येणार असला तरीही शेतकऱ्याला दिलासा देणारा हा पाऊस समजला जातो.

      पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. शहरामध्ये मात्र कांही ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी व चिखलाचे साम्राज्य झाले होते.

साहेब यांना आवरा…
आगीत नष्ट होणाऱ्या वृक्षांबाबत निसर्गप्रेमी संतप्त…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मोठ्या हौसेने वृक्षारोपण करायचे, वर्षभर वृक्षांची काळजी घ्यायची, त्यांची देखभाल करायची आणि कांही विघ्नसंतोषी मंडळींकडून आगी लावून तासाभरात ही वनसंपदा नष्ट करण्याचे उद्योग आजरा तालुक्यात सुरू आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी थेट आरोग्यमंत्र्यांची ‘वृक्षप्रेमी’ च्या  महिला कार्यकर्त्यांनी भेट घेऊन साकडे घातले आहे.

     रामतीर्थ परिसरात ‘वृक्षप्रेमींकडून’  रोपण करण्यात आलेली सुमारे दोनशे रोपे अज्ञातांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाली आहे. ही झाडे लावून ती जगवण्यासाठी गेले वर्षभर पदर मोड करून  कार्यकर्ते मेहनत घेत असताना असा आग लावण्यासारखा प्रकार करून कार्यकर्त्यांच्या कष्टावर विरजण टाकण्याचे काम संबंधितांनी केले आहे.

     पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून हे प्रकार थांबण्यासाठी वनविभागाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात यावेत अशी मागणी पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

वृक्षतोड थांबवण्याची मागणी…

      संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गासह विरळीकरणाच्या नावाखाली तालुक्यात प्रचंड बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे. यामुळे एकंदर तापमानावर परिणाम होत आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत होऊ वृक्षतोडीला परवानगी देऊ नये अशी मागणीही करण्यात आली आहे.

आजरा येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात, तहसीलदार यांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शासनाने नवीन आणलेले लोकशाही विरोधी, विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे. कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करावी.
या कायद्याने जनतेच्या लोकशाही अधिकारांना सुरुंग लावायचा प्रयत्न केला जात आहे. सरकारकडून शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या नावाखाली जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. त्याचबरोबर जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्यामुळे डावी आघाडी व सहयोगी पक्ष जाहीर निषेध करत विधेयक मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.

      यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे रामकुमार सावंत, शशिकांत सावंत काॅ.शांताराम पाटील काॅ. संजय घाटगे, सुरेश बुगडे, शिवाजी सावंत, नारायण भंडागे, निवृत्ती मिसाळे, महादेव होडगे, जोतीबा चव्हाण, ज्ञानदेव गुरव, मनप्पा बोलके याच्यासह परिवर्तनवादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सरपंच परिषद मुंबईच्या तालुकाध्यक्षपदी पांडुरंग तोरगले व सौ.प्रियांका जाधव

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सरपंच परिषद मुंबईची आजरा तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून पुरुष कार्यकारणीच्या अध्यक्षपदी मासेवाडीचे सरपंच पांडुरंग तोरगले यांची तर महिला तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे…

तालुका कार्यकारणी (पुरूष ):-

युवराज दत्तू पाटील (कार्याध्यक्ष) विलास मारुती जोशीलकर (उपाध्यक्ष), अनिल बळवंत पाटील (सरचिटणीस),धनाजी आप्पा दळवी (खजिनदार),कृष्णा बाबुराव कुंभार, लहू रामचंद्र वाकर, बयाजी भोरु मिसाळ, वसंत गंगाराम कोंडुस्कर, सुनील रामचंद्र बागवे, नितीन पांडुरंग सावंत (सर्व सदस्य)

तालुका कार्यकारणी ( महिला ):-

सौ. समीक्षा शिरीष देसाई (कार्याध्यक्षा), सौ.रत्नप्रभा आनंदा भूतुर्ले (उपाध्यक्षा ),सौ.रत्नजा प्रल्हाद सावंत (सरचिटणीस), सौ.माधुरी शामराव गुरव (खजिनदार), सौ.रूपाली सूर्यकांत पाटील,सौ.सुषमा निवृत्ती केसरकर, सौ.शकुंतला सदाशिव सुतार,सौ. सुनिता मारुती कांबळे ( सर्व सदस्या )

     संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी. एम.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवड प्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस राजू पोतनीस, सौ, शारदा गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निधन वार्ता
मेरी मान्येकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दत्त कॉलनी, आजरा येथील मेरी मोतेस मान्येकर ( वय ७४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे निधन झाले.

      त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, पती, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

       आज बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर आजरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

थोडक्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलिसिस सेंटर स्थापन केल्याबद्दल अन्याय निवारण समितीच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

       आजरा येथे डायलिसिस सेंटर उभारले ही अत्यंत स्तुत्य व जनहिताची बाब आहे. या केंद्रामुळे आजरा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे असे समितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

थोडक्यात…

.          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गेले कित्येक दिवस प्रलंबित असणारा आजरा बस स्थानक परिसरातील रिक्षा स्टॉप बाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन रिक्षा स्टॉप युनियनने केली आहे.

     यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज शहरात…

       शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती, आजरा यांच्या मागणीनुसार उपवनसंरक्षक, वनविभाग, कोल्हापूर यांची आज सकाळी ११ वाजता परिक्षेत्र वन अधिकारी,आजरा यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews
error: Content is protected !!