
राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी
आजऱ्यात निष्ठायात्रेनिमित्त शिवसेनेची सभा

भारतीय जनता पक्षाला राज्यात शिवसेनेने ताकद दिली. पक्ष वाढीसाठी मदत केली. आज भाजप आमच्या मानगुटीवर बसला आहे. त्यांना गाडण्याचे काम महाराष्ट्रतील शिवसैनिकच करतील. असा इशारा युवा सेना विस्तारक प्रमुख शरद कोळी यांनी केले.
येथील गंगामाई वाचन मंदिरात निष्ठायात्रेनिमित्त झालेल्या शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांच्यावतीने आयोजीत सभेत कोळी यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला केला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय बाबा घाटगे होते. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, संपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, प्रभाकर पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने प्रमुख उपस्थित होते.
युवराज पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

कोळी म्हणाले,हिंदूत्वाची भाषा करून भाजप जनतेची दिशाभूल करीत आहे. खर हिंदुत्व हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. एवढा जर भाजपला हिंदुत्वाचा पुळका आला असेल तर राज्यात छत्रपती शिवराय, शाहू, फुले व आंबेडकर या महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. त्याबद्दल काहीच वाटत नाही. हे दुर्दैव आहे. शिंदे – भाजपने महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास हुकुमशाही येणार आहे. त्यामुळे डोळ्यासमोर अत्याचार होणार आहे. ही लढाई एकट्या उद्धव ठाकरे यांची नाही, तर अठरापगड जातीच्या माणसांची आहे. तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा ? हा प्रश्न आहे. भाजपला नेस्तनाबूत केल्याशिवाय पर्याय नसून आता २०२४ च्या निवडणुकीत भाजपला खाली खेचण्याची शिवसैनिकांनी नशा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी तुम्हाला वेळ दिला नाही म्हणता, तर ४० वर्षे सेनेत का थांबला? सेनेने नारायण राणे यांना नगरसेवकापासून मुख्यमंत्री केले आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका करत आहेत.” यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची भाषणे झाली.
याप्रसंगी ओंकार माद्याळकर, कृष्णा पाटील, दिनेश कांबळे, आनंदा कोरगावकर, दयानंद भोपळे,प्रकाश पाचवडेकर,शिवाजी आढाव आदींसह ठाकरे गटाचे समर्थक उपस्थित होते.
प्रा.सुनील शिंत्रे यांचा वाढदिवस उत्साहात
कार्यक्रम स्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख व आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

‘त्या’ संशयितांना अटकपूर्व जामीन फेटाळला
(डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल प्रकरण)
माध्यमिक शिक्षणअधिकारी एकनाथ आंबोकर यांनी डाॅ. झाकिर हुसेन ॲंग्लो उर्दु हायस्कूल ॲण्ड ज्युनियर काॅलेज आजरा, या शाळेतील स्वेच्छानिवृ-ती घेतलेले मुख्याध्यापक जमशेद जमादार व क. लिपीक याहयाखान बुड्डेखान यांना खोटे कागद तयार करणे , मस्टरमध्ये खाडाखोड करणे असे गंभीर आरोप ठेवून त्यांच्या विरोधात आजरा पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर नं. १५४/२०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यात संशयित आरोपी १ व २ यांनीअटकपूर्व जामिन करीता जिल्हा न्यायालय,गडहिंग्लज येथे अर्ज केला होता, तो अर्ज दि.१४/९/२३ रोजी मे. न्यायाधिश देशमुखसो यांनी रद्द केला आहे, अशी माहिती तक्रारदार संग्राम सावंत व शरीफ खेडेकर यांनी दिली.
जामीन रद्द झाल्याने संशयितआरोपींना पोलीस अटक करणार काय ? असा संवाद ही त्यांनी उपस्थित केला असून प्रसंगी आपण जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे तक्रारदार संग्राम सावंत व शरिफ खेडेकर यांनी सांगितले.

देऊळवाडी येथे हत्तीचा धिंगाणा…
चारचाकीला बनवले खेळणे

आजरा तालुक्यातील देऊळवाडी येथे बुधवारी रात्री अक्षरशः धुमाकूळ घालत हणमंत सावंत यांच्या घरासमोर उभी केलेली चारचाकी पायाने ढकलत सुमारे दोनशे फूट लांबीवर घेऊन भात शेतात ढकलून लावली.

यामध्ये गाडीचे मोठे नुकसान तर झाले आहेत परंतु त्याच बरोबर भात पिकाचेही हत्तीच्या वावराने नुकसान झाले आहे. वनखाते हत्तीचा बंदोबस्त करणार तरी कधी ? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून केला जात आहे.

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला…
आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी गेल्या दोन दिवसात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच तालुकावासीयांना चकवा दिला आहे. पावसाच्या दडीमुळे पोटरीला आलेले भात पीक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना पावसाने गेले दोन दिवस शहरासह तालुक्यात ठीक-ठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळे किमान माळावरील पिकांसह भात पिकाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.
पं.दीनदयाळ विद्यालयात हिंदी दिन उत्साहात

१४ सप्टेंबर हिंदी दिवस पंडित दीनदयाळ विद्यालयात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक सुधीर कुंभार उपस्थित होते सुरुवातीला सौ. कुंभार एस. आर.यांनी हिंदी दिन १४ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो याची माहिती देऊन हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
त्यानंतर इयत्ता सहावी व सातवी वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी हिंदी लघु नाटिका सादर करून मुलांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुुुुधीर कुंंभार यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



