
भादवण येथून तरुणी बेपत्ता…
भादवण ता. आजरा येथून २१ वर्षीय तरुणी २९ ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याची वर्दी अरुण दशरथ कदम यांनी पोलिसात दिली आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भादवण येथील राहत्या घरातून निघून गेलेली संबंधित तरुणी ही अद्याप परत आली नसल्याचे कदम यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आम्ही गावी यायचे की नाही…?
मुंबईतील तालुकावासीयांचा संतप्त सवाल…खाजगी बसेसचे दर गगनाला
गणेशोत्सव कालावधीमध्ये खाजगी बस चालकांनी मुंबई ते आजरा भाड्यामध्ये तिप्पटीने दरवाढ केल्याने आम्ही गणेशोत्सवासाठी गावी यायचे की नाही ? असा सवाल मुंबईकर आजरातालुकावासिय उपस्थित करू लागले आहेत.
गणेशोत्सव चार दिवसांवर आल्याने आजरा तालुक्यातील मुंबईकरांना सणासाठी गावी परतण्याचे वेध लागले आहेत. प्रचंड प्रमाणावर गावी परतणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन खाजगी बस व्यावसायिकांनी आपल्या दरामध्ये प्रचंड वाढ केली आहे. इतर वेळी सहाशे रुपये भाडे असणाऱ्या बैठ्या व्यवस्थे करता १४०० ते १५०० रुपये आकारले जात आहेत. तर स्लीपर कोच करता हाच दर दोन हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे.
चौकोनी कुटुंब असणाऱ्या मंडळींना गावी येऊन जाण्यासाठी केवळ प्रवासापोटी दहा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम निश्चितच जास्त आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणावर अशी लूट सुरू असताना राजकीय पक्षांसह विविध संघटना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दलही संताप व्यक्त होत आहे.
आजरा आगाराचा उदासीनपणा
आजरा आगाराकडून बस फेऱ्यांचे कोणतीही योग्य नियोजन नसल्यामुळेही याचा मनस्ताप प्रवासी वर्गाला सहन करावा लागत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. प्रवाशांची प्रचंड संख्या असताना ही केवळ आगाराच्या उदासीनतेमुळे बस फेऱ्या बंद झाल्याचीही उदाहरणे आहेत. केवळ नियोजनाच्या अभावामुळे उत्पन्नात घसघशीत वाढ करण्याची ही संधी आजरा आगार निश्चितच गमवत असल्याचेही दिसत आहे.

कै. केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडी मध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

पेद्रेवाडी येथील कै. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये आजी- आजोबा पाद्यपूजन व पौष्टिक धान्य पाककृती स्पर्धा असा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत प्रथम आजी-आजोबांचे पाद्यपूजन विधिवत करण्यात आले. पाल्य नातवांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण केले.
कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या आजी-आजोबांना विरंगुळा म्हणून विविध प्रकारचे फनी गेम्स घेण्यात आले. यातील विजेत्या स्पर्धक पालकांना बक्षीस घेऊन गौरवण्यात आले. तर पाककृती स्पर्धेमध्ये कु. समृद्धी प्रवीण डोंगरे, कु. आर्या अनिल येसणे आणि कु. मधुरा प्रवीण शिंदे व सीमा आनंदा चौगुले यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.
मुख्याध्यापक एस. एम. चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. देऊस्कर व सौ.सुविद्या वाशीकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमास यु.के.जाधव, व्हीं.एम.मोहनगेकर यांच्यासह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आर. एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
आजरा आठवडा बाजार हाऊसफुल्ल…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी आजरा येथील आठवडा बाजारामध्ये तालुका वासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. सजावटीच्या साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीमध्ये प्रचंड उलाढाल झाली.
बऱ्याच दिवसानंतर आज-याचा आठवडा बाजार आज गर्दीने फुलून गेला होता. गणेशोत्सव सजावटीसाठी लागणारे साहित्य, फळे, नारळ ,जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी तालुकावासियानी मोठी गर्दी केली होती.


