
आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…
व्यावसायिक चिंतेत

आंबोलीसह कोकणातील वर्षा पर्यटन म्हणजे कोल्हापूर, पुणे – मुंबईकरांच्या दृष्टीने पर्वणीच असते. जोरदार पाऊस सुरू झाला की आंबोलीसह ठिकठिकाणीच्या पावसाळ्यातील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ही मंडळी आजरा मार्गे पुढे कोकणची वाट धरताना दिसतात.
गेल्या सहा महिन्यांपासून संकेश्र्वर – बांदा या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यासाठी ठीक- ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली आहे. पाऊस असल्याने सर्वत्र चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. ज्यांना याची कल्पना आहे असे वाहनचालक आजरा मार्गे कोकणात जाणे टाळताना दिसत आहेत. परिणामी या मार्गावरील चार चाकी वाहनांच्या वर्दळीत प्रचंड घट झाली आहे. पर्यटकांची नेहमीची वर्दळ लक्षात घेऊन अनेकांनी हॉटेल सह छोटे-मोठे व्यवसाय या मार्गावर सुरू केले. वर्षा पर्यटकांवर यातील बरेच व्यवसाय अवलंबून आहेत. परंतु सध्या या मार्गावरून वाहतूक करणे पर्यटक टाळत असल्याने या व्यवसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू लागले आहे. अजून वर्षभर तरी महामार्गाचे काम सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गडहिंग्लज ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अनेक व्यावसायिक अडचणीत आले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
……….

दूध उत्पादकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : अंजनाताई रेडेकर

दुग्ध व्यवसायाकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता दुग्ध व्यवसाय केल्यास त्यातून उत्पादकाला चांगला फायदा होतो त्यामुळे दूध उत्पादकांनी संकरित जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये करावी व स्वतःची आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या भादवणवाडी येथील मसवेरश्वर मंदिर सभागृहात आयोजित आनंदराव पाटील महेश दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या.
मसवेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना श्रीमती रेडेकर पुढे म्हणाल्या, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज प्रकरणे करून दुग्ध व्यवसाय सुरू करावा .मुक्त गोठ्यासारख्या नविन पद्धतीचा स्विकार करावा. हरियाणा, गुजरात येथील मु-हा जाफराबादी , मेहसाना सारखी संकरित जनावरे आपल्या गोठयामध्ये पाळावीत. नविन जनावरे विकत घेण्याबरोबरच वासरू संगोपन हो योजना प्रभावीपणे राबवावी. स्वतःच्या गोठ्यामध्ये जन्मलेली वासरे लवरात लवकर दुधात कशी येतील यासाठी प्रयत्न करावा. याकरिता दूध संघाच्या वतीने संगोपन वासरू संगोपन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती रेडेकर यांनी केले. यावेळी डॉ. लोखंडे यांनी जनावरांना होणान-या विविध आजार व संबंधित उपचारांची माहीती दिली. त्याचबरोबर जंत निर्मुलन, विविध प्रतिबंधात्मक लसिकरण या योजना शंभर टक्के राबविण्याचे आवाहन केले. सदर बैठकिला दुध संघाचे संकलन विभागाचे उपव्यवस्थापक के. डी. आमते, भादवनवाडी गावचे सरपंच महादेव दिवेकर सुशिला शिमने, महादेवी पाटील, सागर भाटले, प्रकाश मगदूम, भरत शिक्षणे, आनंदा चौगुले, अंबाजी कांबळे, महेश कोले, संजय पाटील, विजय शिमणे, दशरथ शिवणे, , किरण पाटील, विनायक पाटील यांच्यासह गावातील सर्व दूध संस्थाचे सभासद उपस्थित होते.
…….

व्यंकटराव परिवारा मार्फत प्लास्टिक हटाव मोहिम..

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये पुनीत सागर अभियान अंतर्गत प्लास्टिक हटाव मोहीम साजरी करण्यात आली. यामध्ये एनसीसी ऑफिसर महेश पाटील यांनी प्लास्टिक या सृष्टीला व मानव जातीला किती अपायकारक व हानिकारक आहे याबद्दल माहिती सांगितली.तसेच शिक्षिका जावळे आर. व्ही. यांनीही प्लास्टिक वापराचे तोटे सांगताना प्लास्टिक बॉटल्स ,प्लास्टिक कॅरीबॅग तसेच अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केल्यामुळे त्यातून मानव जातीला अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते तसेच प्लॅस्टिक हे जमिनीच्या पोटात कित्येक वर्षे तसेच राहते. त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि हे मानव जातीला हानिकारक आहे याबद्दल सविस्तर सांगितले व कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या वापरल्यामुळे होणारे फायदेही सांगितले आणि सर्व विद्यार्थ्याकडून प्लॅस्टिक पिशव्या न वापरणे संदर्भात प्रतिज्ञा म्हणून घेतली.
प्रशालेच्या जवळपास असणाऱ्या तसेच बाजारपेठेतील बुक स्टॉल, किराणा स्टॉल, हॉटेल, बेकरी यानाही कागदी पिशव्या वापरणेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे मार्फत कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक दुकानाला भेट देऊन ही शासनाची प्लास्टिक हटाव देश बचाव ही मोहीम राबवत कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप केले.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष अण्णासोl पाटील, एस. पी. कांबळे सचिव, सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य आर. जी. कुंभार पर्यवेक्षक व्ही. जे. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम एनसीसी ऑफिसर श्री महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राबविला.
………
सर्व श्रमिक संघाची आज आज-यात सभा
गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाले पाहिजे, ‘मालकांवर कर व गिरणी कामगाराला मोफत घर’ या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्व श्रमिक संघाची सभा किसान भवन आजरा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कॉ. शांताराम पाटील यांनी दिली. सदर सभेस उदय भट, बी.के. आंम्रे, अतुल दिघे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत असेही कॉ. पाटील यांनी सांगितले.


