शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५
खड्डेग्रस्त रस्त्यावरून पडून वडील जखमी…
मुलाची नुकसान भरपाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील गुंडू सुबराव केसरकर (वय ९० वर्षे) हे रस्त्यावरून पडून गंभीर जखमी झाल्यामुळे याची जबाबदारी संबंधितांनी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांचे चिरंजीव रामचंद्र गुंडू केसरकर यांनी गजरगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. या मागणीमुळे गजरगाव येथील रस्त्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे.
केसरकर हे गल्लीतून चालत जात असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरता उखडण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती नसल्याने ते चालताना पडले व त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामपंचायत अथवा रस्त्यासंदर्भातील जबाबदार मंडळींकडून नुकसान भरपाई मिळावी अशी लेखी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे रामचंद्र केसरकर यांनी केली आहे.
आजरा कारखाना ३,५०० रु. दर देणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेल्या निवेदनातून माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना प्रशासनाने यावर्षी गळीत हंगामातील उसाला ३,५०० रुपये दर देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कारखान्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून माहिती दिली आहे. एकरकमी ३,४०० रु. व दिवाळीसाठी १०० रु. असे एकूण ३,५०० रुपये देण्यात येणार आहेत.
कारखान्याने निवेदनात म्हटले आहे की, सन २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू झाला असून, गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला एफआरपी कायद्याप्रमाणे प्रतिटन ३,१९४ रु. इतकी रक्कम देय निघते. तथापी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा व आसपासच्या साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊस दराचा विचार करून कारखान्याने प्रतिटन ३,४०० रु. इतका ऊस दर जाहीर केला आहे.
आसपासच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून प्रतिटन ३,४०० रु.अधिक दीपावलीच्या दरम्यान १०० रु. असा ऊस दर देण्याचे धोरण ठरविले आहे. यावर्षी जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन ३,७०० रु. इतके केले आहे. मूल्यांकनाच्या ९० टक्के रक्कम म्हणजेच ३,३३० रुपये इतकी प्रतिक्विंटलला उचल मिळणार असून, त्यामधून १,००० रु. कर्जापोटी टॅगिंग व २५० रु. इतर खर्चासाठी वजा जाता ऊस बिलाकरिता केवळ २,०८० रु. इतकी रक्कम उपलब्ध होते.
कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत असताना व कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प
नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कारखान्याचे चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३,४०० रु. व दीपावलीदरम्यान १०० रु. दोन टप्प्यांत गळीत हंगाम यशस्वीतेनंतर देण्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष सुभाष देसाई, स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, संचालक उदयराज पवार, राजू मुरूकटे, राजेंद्र जोशीलकर, हरीबा कांबळे, सखाराम केसरकर, कार्यकारी संचालक संभाजी सावंत आदी उपस्थित होते.

मडिलगेत उद्या
आरोग्य शिबिराचे आयोजन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त कागल येथील राजे विक्रमसिंह प्रतिष्ठानच्यावतीने मडिलगे (ता. आजरा) येथे उद्या शनिवार (दि.६) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये हृदयविकार, रक्त तपासणी, नेत्र तपासणी आदी विकाराबाबत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचे संयोजन मडिलगे येथील लोकमान्य संस्था समूहाच्यावतीने करण्यात येणार आहे, या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्था समूहाचे प्रमुख जनार्दन नेऊंगरे यांनी केले आहे.
उत्तूरमध्ये विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव; खवय्यांचा मोठा प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथील नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात पार पडला. सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच वैशाली आपटे होत्या.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध पदार्थांचे तब्बल पन्नास स्टॉल्स उभारले होते. पकोडे, वडे, पोहे, बिर्याणी, मिठाई, ताक, चहा, सँडविच, गोभी मंच्युरियन, भंडग आदी पदार्थांनी महोत्सवाला खास आकर्षण प्राप्त झाले. सकाळी सव्वा नऊ वाजता महोत्सवाची सुरुवात होताच परिसर खवय्यांनी गजबजला.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
कार्यक्रमाला वनिता आपटे, शैलेंद्र आमणगी, मंगल कोरवी, दिगंबर कुंभार, सुरेखा परीट, अर्चना पाटील, रेश्मा आजगेकर, संजीवनी हाळवणकर, ऋषिकेश हाळवणकर, अस्मिता गुरव, माजी प्राचार्य शरद पाटील, शैलेश आमणगी, मुनीर शिकलगार, अमोल बांबरे, दत्तात्रय कापसे, संजय आपटे, सुधीर जाधव, सुनील भिऊंगडे, राजीव थोरवत, ध्रुववत मोहिते, आशा गडकरी आदी मान्यवरांसह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक वसंतरावदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी केले तर आभार नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांनी मानले. सूत्रसंचालन राजकुमार राठोड यांनी केले.

आजरा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मुंडे तर उपाध्यक्षपदी सामंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सर्व माध्यमिक खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी येथे संपन्न झाली.
बैठकीत आजरा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शिवदास मुंडे, मुख्याध्यापक श्री भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी यांची तर उपाध्यक्षपदी वामन सामंत मुख्याध्यापक मडिलगे हायस्कूल यांची निवड झाली आहे. सचिव पदी रविंद्र महापुरे मुख्याध्यापक उत्तुर विद्यालय उत्तुर तर खजिनदारपदी संजीव देसाई मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा यांची निवड झाली आहे.
नवीन कार्यकारणीच्या सदस्य पदी राजेंद्र कुंभार,भादवण हायस्कूल भादवण, सुरेश कांबळे वसंतदादा हायस्कूल उत्तुर. दीपक कांबळे महागोंड हायस्कूल चंद्रकांत घुणे गवसे हायस्कूल सौ. सुनीता मुरूकटे चाफवडे हायस्कूल सौ. कल्पना पाटील निंगुडगे हायस्कूल या मुख्याध्यापकांची निवड झाली आहे. तसेच सल्लागारपदी संजय देवेकर, शरद पाटील, उदय आमणगी, अजित तोडकर, सुनील चव्हाण हे मुख्याध्यापक काम पाहणार आहेत.

निधन वार्ता
श्रीकांत तोरस्कर

आरदाळ या.आजरा येथील श्रीकांत सखाराम तोरस्कर (वय ७१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, सून,नातवंडे असा परिवार असून ते राहुल तोरस्कर यांचे वडील होत.
रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी आहे.

आज शहरात
आजरा येथील संभाजी चौकात आजरा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी यांनी पंधरा दिवसाच्या आत उपवनसरंक्षक यांचे उपस्थितीत बैठक लावण्याचे लेखी पत्र दिले होते. त्याला आता महिना उलटून गेला आहे. अजूनही बैठक झालेली नाही. याबाबत विचरविनिमय करण्यासाठी तालुक्यातील विविध पक्ष संघटनांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
बैठकीची वेळ व तारीख-
शुक्रवार दि ५ डिसेंम्बर २०२५ रोजी ठीक १.३० वाजता.
बैठकीचे ठिकाण-
श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी, आजरा.
गजदर्शन

आजरा नेसरी मार्गावर शिरसंगी नजीक असणाऱ्या रामलिंग देवस्थान समोरील रस्त्यावर हत्तीने वाहन चालकांना दर्शन दिले.


