mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्यादेशभारतमहाराष्ट्रराजकीयविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५

चर्चा व आकडेमोडीत गेला दिवस…
अंदाज कांही सापडेना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीकरीता मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अचानकपणे मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर पर्यंत पुढे गेल्याने काल बुधवारी दिवसभर उमेदवारांचे कार्यकर्ते झालेले मतदान व त्यामध्ये आपल्या उमेदवाराला झालेले मतदान याची आकडेवारी काढण्यात गुंतलेले दिसत होते. मात्र अनेकांचे अंदाज जुळता जुळत नव्हते. दोन्ही आघाड्यांकडून आपणालाच मतदान कसे जास्त झाले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात होता.

सत्ताधारी मंडळींनी उभारलेली ताराराणी आघाडी काँग्रेस व मित्र पक्षांनी तयार केलेली आजरा परिवर्तन विकास आघाडी व या दोघांचेही अंदाज चुकवण्यास कारणीभूत ठरलेली अन्याय निवारण समिती व मित्र पक्षांची आघाडी यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. हीच परिस्थिती नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार मंजूर मुजावर यांनी तयार केलेली हवा दोन्ही आघाड्यांना विचार करण्यास लावणारी होती. अन्याय निवारणचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांनीही प्रचाराचे रान उठवल्याने अशोकअण्णा चराटी व संजयभाऊ सावंत यांचे कार्यकर्ते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.

प्रभागवार विचार केल्यास कांही प्रभागात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून २१ तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

घरचे जेवण गोड लागेना…

गेले आठ दिवस शहरातील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल दिसत होती. प्रचाराच्या नावावर असणारे दररोजचे बाहेरचे खाणे अचानकपणे बंद झाल्याने कार्यकर्त्यांची घरचे जेवण गोड लागेल अशी अवस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीत जेवणावळींनी अक्षरशः कहर केला होता.

गवसे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित भरती करावी

शिवसेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गवसे (ता. आजरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी व कर्मचारी नाहीत. त्यामुळे नागरीकांना आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. याबाबतचे निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्यावतीने तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी आजरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गुरव यांना दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे. गवसे (ता. आजरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पुर्ण होवून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. यामध्ये वैदयकिय अधिकारी व कर्मचारी स्टाफ नाही. यामुळे भागातील नागरीकांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांना वंचित रहावे लागत आहे. यासाठी तातडीने बैठक लावण्याची मागणी निवेदनातून केली आहे. याबाबत शुक्रवार (ता. ५) गवसे प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुपारी १२ वाजता बैठक घेण्याचे ठरले आहे. उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष दिनेश कांबळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, युवा सेना उपतालुका प्रमुख अमित गुरव, शिवसेना उप तालुका संघटक चंद्रकांत व्हरकटे, राजू बंडगर, रवी सावंत यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 

 

काजूची बागांच्या शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापनातून आर्थिक उत्पन्न वाढवण्याची संधी

डॉ.पांडुरंग मोहीते

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

काजूची योग्य पध्दतीने लागवड, बागांचे शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापन, कीड व रोगाचे नियंत्रण यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्याची संधी आहे. असे प्रतिपादन आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय, पाल गारगोटीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी केले.

वेळवट्टी (ता. आजरा) येथे प्रगतशील शेतकरी अजित प्रभूच्या काजू बागेमध्ये फलोत्पादन पिकावरील कीड व रोग सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या वेळी काजू पिकाबाबत डॉ. मोहीते यांनी मार्गदर्शन केले. गडहिंग्लजचे उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील अध्यक्षस्थानी होते.

तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात शेतकरी प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला. तालुक्यात काजू पिकाखाली मोठे लागवड क्षेत्र आहे. दरवर्षी काजू पिकातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. या पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृकता तयार व्हावी. शास्त्रोक्त पध्दतीने लागवड व काजू बागांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रशिक्षण आयोजीत केले आहे. डॉ. मोहीते यांनी काजू पिकावरील कीड व रोग नियंत्रण, विविध किडी व व त्यांची ओळख व नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी डॉ. धनाजी राणे, सुरेश देसाई, काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप माळी यांनी सूत्रसंचालन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्निल सुनिल कमते यांनी आभार मानले.

कचरा जळताना वटवृक्ष पेटला
 आगीवर मिळवले नियंत्रण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील व्यंकटराव हायस्कूल नजीक कचरा जळताना अचानक शेजारील वटवृक्षाने पेट घेऊन लागलेली आग अग्नीशन दलाने विझवली. सायंकाळी पावणे सात वाजता हा प्रकार घडला. आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

येथील व्यंकटराव हायस्कूलजवळील जुन्या पोलीस कॉलनीच्या समोर पडलेला कचरा जाळत होते. या कचऱ्याने पेट घेतला व आग सर्वत्र पसरू लागली. आग रस्त्यावरील वडाच्या झाडाजवळ पोहचली. दरम्यान अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले. अग्नीशमन दलाने आग विझवली.

सोहाळे गायरानामध्ये खेळासाठी मैदान उपलब्ध करून द्या.

स्पोर्टस क्लबची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सोहाळे या.आजरा येथील सर्व युवकांना कोणताही खेळ क्रिकेट, कबड्डी व इतर खेळ खेळण्यासाठी खुले असे मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील मुले व युवा वर्ग खेळापासून वंचित रहात आहेत. सर्व मुलांना आपली कला जोपासायला खुले असे मैदान उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण क्रिडा क्षेत्राला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्याकरिता मैदानासाठी गायरानामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सोहाळे स्पोर्ट्स क्लब च्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.

आजच्या युगात खेळ हा शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून अनेक शासकीय व केंद्र शासकीय योजना ग्रामीण भागातील तरुणांना खेळ व विकासासाठी उपलब्ध आहेत पण त्याचा फायदा गावातील मुलांना मिळत नाही, म्हणून गावातील सर्व लहान थोर युवकांना व खेळाडूंना आपल्या गावात ग्रामपंचायत गायरान हद्दीत गट नंबर २५०, २५०/१, २५०/२, मध्ये सर्व खेळासाठी उपयुक्त असे १५० मीटर x १५० मिटर मैदान उपलब्ध करून देण्यात यावे. अशी सर्व युवा तरुणांची इच्छा आहे.

ग्रामपंचायतीने या प्रस्तावावर सहानुभूतीपुर्वक विचार करून लवकरात लवकर ग्रामपंचायत व शासकीय स्थरावर कार्यवाही करुन तरुण मुलांना खेळण्यासाठी योग्य असे मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सोहळा स्पोर्ट्स क्लबचे संजय गाडे व ग्रामस्थांनी केली आहे.

निधन वार्ता
अनुबाई पाटील

गवसे ता. आजरा येथील अनुबाई सखाराम पाटील ( वय ७२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुलगी,सूना, जावई , नातवंडे असा परिवार आहे. महादेव पाटील व रविंद्र पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

होनेवाडीत आजपासून दत्त जयंती उत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

होनेवाडी ता. आजरा येथे आज दिनांक ४ डिसेंबर पासून दत्त जयंती उत्सव सुरू होत आहे. आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता श्री दत्तगुरु व ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवाला अभिषेक, सकाळी ११ वाजता माजी विद्यार्थी संघटना होनेवाडी यांच्यामार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सायंकाळी साडेसहा वाजता श्री दत्त जन्मकाळ व महाआरती त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

उद्या शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता दत्तगुरूंचा पालखी सोहळा सायंकाळी ७ वाजता श्री दत्तगुरूंची महाआरती व त्यानंतर महाप्रसाद व रात्री दहा वाजता आधुनिक सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे असे संयोजकांनी स्पष्ट केले.

 

संबंधित पोस्ट

आज-यात चोरी… सोन्या चांदीचे दागिने लंपास

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!