
आजऱ्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

आजरा:प्रतिनिधी
आजरा येथील चाफे गल्लीमधील अल्लाउद्दीन सलीम शेख या २८ वर्षीय विवाहीत सेंट्रिंग कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख हा मूळ तारदाळ ता. हातकणंगले येथील असून तो सेंट्रिंग कामानिमित्त आजरा येथे नंदकुमार सामंत यांच्या घरी भाडोत्री राहावयास होता.
दरम्यान शनिवारी सायंकाळी त्याचा मृतदेह घरातील भिंतीच्या खुंटीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची वर्दी सैपन सलीम शेख रा. आझाद नगर, तारदाळ, ता. हातकणंगले यांनी आजरा पोलिसांत दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.




सिरसंगी येथे बाळूमामा भंडारा उत्सवाला प्रारंभ

आजरा: प्रतिनिधी
सिरसंगी ता आजरा येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवास धार्मिक वातावरणात कालपासून सुरुवात झाली आहे. श्री बाळूमामा ट्रस्ट सिरसंगी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला व्यासपीठ अधिकारी म्हणून श्री दत्त योगीराज आश्रमचे उपाध्यक्ष तुळशीरामअण्णा काम पहात आहेत आहेत.
शनिवारी जालना येथील कार्तिक आगलावे महाराज व कीर्तनकार श्वेता हालसीकर यांचे कीर्तन झाले.आज रविवारी शेगाव येथील भक्ती तेलोरे व आष्टी येथील आदिनाथ झिंजुकरे यांचे कीर्तन पार पडणार आहे. सोमवार दिनांक १५ रोजी अहमदनगर येथील सरगम खंडागळे व आकाश फुले यांचे कीर्तन होईल. मंगळवार दिनांक १६ रोजी ज्ञानतृप्ती सुद्रिक पाटील व महादेव थोडके महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ येथील भाकणूक सांगणारे श्री. भगवान आप्पासो डोणे महाराज यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. १७ रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळूमामा दळवी यांनी केले आहे.






