
राजेंना राजेशाही पद्धतीने लोकसभेत पाठवूया…
आजरा येथे महाविकास आघाडीची सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे भूषण आहे. त्यांचे रक्ताचे व विचाराचे वारस शाहू छत्रपतीराजे यांना वाजत गाजत राजेशाही पद्धतीने संपूर्ण देशामध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी करून कोल्हापूरचा हा स्वाभिमान लोकसभेत पाठवूया असे आवाहन आजरा येथे झालेल्या प्रचार सभेत करण्यात आले.
बाजार मैदान आजरा येथे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांची प्रचार सभा प्रचंड उत्साहात पार पडली.
यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाविरोधात संपूर्ण देश उतरला आहे. फंद फितुरीचे राजकारण करून आलेली सत्ता फार काळ टिकत नाही. लोकांवर फक्त आश्वासनांचा मारा करून त्यांना खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात महागाईचा आलेख प्रचंड वाढला आहे. सर्वसामान्यांचे जिणे मुश्किल झाले आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारीत वाढ, हुकुमशाही असे एक नवे रूप उदयाला आले आहे. परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व शाहू छत्रपतींना लोकसभेत पाठवावे असे आवाहन केले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजपाच्या अनेक खासदारांची विधाने पाहता घटना बदलाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे हे स्पष्ट होते. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर तीस लाख युवकांना नोकऱ्या, गरीब महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये, शेती अवजारावरील वस्तू व सेवा करात शंभर टक्के माफी दिली जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी तालुकावार संपर्क कार्यालये तयार केली जातील असे सांगितले.
संजय पवार म्हणाले, समाजामध्ये फूट पाडून, पक्ष फोडून जातीपातीचे राजकारण करण्याचे काम भाजपाने केले आहे. विश्वासघातकी व गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.आता चारशे पार नाही तर त्यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे. मोदीसाहेब दहा वर्षे तुमचे आम्ही ट्रेलर बघितले. ट्रेलर इतके भयानक आहे त्यामुळे आता पिक्चर बघण्याची इच्छा आमची नाही असे सांगत मराठा आंदोलनात खासदार प्रा. संजय मंडलिक कुठे होते ? समरजीत घाटगे यांची आठवण निवडणुकी वेळीच कशी आली ? असे सवाल ही त्यांनी उपस्थित केले.
शाहू छत्रपती म्हणाले, संविधान मोडून काढण्याचा भाजपाचा हा प्रयत्न संघटितरित्या आणून पाडूया. आजरा तालुक्यामध्ये काजू बियांना हमीभाव, घनसाळ भात संशोधन केंद्र व एमआयडीसीचे विस्तारीकरण यासाठी आपला प्रयत्न राहील.
यावेळी डॉ. नंदाताई बाभुळकर, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, कॉ. संपत देसाई, कॉ. अतुल दिघे, अभिषेक शिंपी, अंजनाताई रेडेकर, दयानंद भोपळे, युवराज पवार, यांचीही भाषणे झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, रामराजे कुपेकर, संजयभाऊ सावंत, अप्पी पाटील, राजू होलम, समीर चांद,संकेत सावंत, विक्रम देसाई, किरण कांबळे, नौशाद बुड्डेखान, उत्तम देसाई, रवींद्र भाटले, दिनेश कुरुणकर हरिबा कांबळे, दिनेश कांबळे, सौ.अलका शिंपी, सौ.नंदाताई घोरपडे, संजय घाडगे, संजय तर्डेकर, कॉ. शांताराम पाटील,सौ. भैरवी सावंत, मंजूर मुजावर, अशोक पोवार, अमित खेडेकर, आरिफ खेडेकर, सलीम लतीफ,दिनेश कांबळे, संदीप कांबळे, दयानंद कांबळे यांच्यासह मान्यवर व तालुकावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष संतोष मासाळे यांनी आभार मानले.
मोदींनी आता मणिपूर बद्दल बोलावे…
मणिपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचार प्रश्नी पंतप्रधान मोदी व भाजपा काहीही बोलण्यास तयार नाही. जे काय झाले आहे ते देशवासीयांना कळून चुकले आहे, आता तरी तुम्ही याबद्दल भूमिका स्पष्ट करा असे आवाहन वक्त्यांनी मोदी यांना केले
त्यांचे कुटुंब अतिशय छोटे...
पंतप्रधान मोदी यांचे कुटुंब अतिशय छोटे आहे. अमित शहा, आदानी, अंबानी,ईडी, सीबीआय व आयकर विभाग एवढेच त्यांचे कुटुंब आहे असा टोला यावेळी डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी लगावला.

मेंढोली येथील तरुणाची मुंबई येथे आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेंढोली ता. आजरा येथील विकास तुकाराम कांबळे (वय २३ वर्षे) याने गोरेगाव, मुंबई येथे राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी सदर प्रकार घडला.
मेंढोली येथील विकास याचे कुटुंबीय मुंबई गोरेगाव येथे राहतात. शुक्रवारी दुपारी त्याच्या घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेली असता त्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या मागे मोठा भाऊ, आई- वडील, भावजय असा परिवार आहे.
विकासच्या मृत्यूमुळे मित्रपरिवार व मेंढोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरंबळवाडी ता.आजरा येथे विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्या प्रकरणी आयोजकासह ६ जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल शनिवारी सरंबळवाडी ते कानोली मार्गावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.या शर्यतीसाठी पोलिसांतून परवानगी घेतली नव्हती.बैलगाडया शर्यतीत पळवून लोकांच्या शरीरास व जिवास धोका निर्माण होईल तसेच बैलगाडी शर्यतीतील बैलांचा छळ करुन बेकायदेशीर जमाव जमविल्या प्रकरणी आयोजक बाजीराव आनंदा देवरकर, रा. सरंबळबाडी (ता. आजरा) यांच्या स्पर्धक आयुब खेडेकर (रा. आजरा), साइनाथ भोगुलकर( रा. महागाव ता. गडहिंग्लज), हर्षल धनाजी बुगडे (रा. मलिग्रे, ता. आजरा), रितेश हणमंत देसाई (रा. निगुडगे ता. आजरा),गिडू पाटील (रा बिद्रेवाडी ता हुक्केरी जि बेळगाव) व इतर अनोळखी १० ते १५ जणांवर आजरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अनिल तराळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी?
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या आजरा आगाराचा कारभार दिवसेंदिवस भोंगळ बनत चालला आहे. तो सुधारणार तरी कधी ? असा सवाल जरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
मुळातच आजरा तालुका हा दुर्गम व डोंगराळ आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात व वाडीवस्त्यांवर दळणवळणाची व इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांशी तालुकावासियांचा प्रवास एस.टी. बसवरच अवलंबून आहे. मात्र आगार प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका तालुका वासियांना बसत आहे. बऱ्याचवेळा आजरा-कोल्हापूर, आजरा-पुणे या गाड्या सावंतवाडी गाडी आजरा बसस्थानकात आलेनंतर त्यांचेपूर्वी या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे त्या बऱ्याचवेळा मोकळ्या धावतात. किमान सावंतवाडी आगारच्या गाड्यांचे वेळापत्रक पाहुन आपल्या गाड्यांचे वेळापत्रक करावे म्हणजे दोन्ही गाड्यांना प्रवासी मिळतील. तसेच आजरा-पुणे या मार्गावर धावणाऱ्या गाड्या फारच जुन्या व अस्वच्छ असतात. त्याबद्दल प्रवाशांच्या तक्रारी आहेत. तसेच आगाराकडून जून महिन्यामध्ये नवीन वेळापत्रक तयार करणेचे आश्वासन दिले आहे.
तोपर्यंत सध्या चालु असलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या वेळेवर सोडणेची व्यवस्था करावी. अनेक बसेसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याबाबत एस.टी. महामंडळाकडून काय उपाययोजना करणेत
येत आहे याची माहिती मिळावी. वरील सर्व बाबींचा विचार करून प्रवाशांची गैरसोय दुरु होणेच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करुन आजरेकर प्रवाशी,नागरीक यांना सहकार्य करावे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे, अध्यक्ष एस. टी. प्रवासी संघटना अध्यक्ष सचिन इंदुलकर, समिती उपाध्यक्ष सुधीर कुंभार,तसेच पांडुरंग सावरतकर, रौनक कारेकर, गौरव देशपांडे विजय थोरवत, डॉ. प्रविण निंबाळकर,जोतिबा आजगेकर,जावेद पठाण नौशाद बुड्डेखान, नाथा देसाई यांच्या सह्या आहेत.



