mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार २५ मे  २०२६

पावसाचा नाही पत्ता…
तरीही वीज बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व परिसरात ना विजांचा कडकडाट, ना जोरदार पाऊस अशी परिस्थिती असतानाही रात्रभर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.

हवेत वाढलेला प्रचंड उष्मा, शहरभर असणारा डासांचा त्रास अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास शहरवासीयांचे मोठे हाल होताना दिसतात. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत वारंवार वीजपुरवठा खंडित होताना दिसत होता. यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मुम्मेवाडी येथून वीज पुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर विद्युत पुरवठा सुरळीत करताना अनेक मर्यादा येताना दिसतात.

रस्ता बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना पेरणोली ग्रामस्थांनी धरले धारेवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गारगोटी-आजरा रस्ता तयार करतांना वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामु‌ळे किरकोळ स्वरुपाचे अपघात घडत आहेत. या मार्गावर अनेकदा सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप करीत रस्ता बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना पेरणोली ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. याबाबत कार्यवाही न झाल्यास लोकशाही

मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. रस्ता सुरक्षेबाबत सर्वकष काळजी घेणार असल्याचे लेखी पत्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यावर ग्रामस्थांनी माघार घेतली.

कंपनीचे अधिकारी व कर्मचारी रस्त्याचे काम सुरु असतांना प्रवाशी व वाहनधारकांच्या सुरक्षेबाबत गंभीरनाहीत. रस्त्याचे काम सुरु असल्याचे सूचना फलक लावले दिसत नाही. यामु‌ळे किरकोळ स्वरुपाचे अपघात घडलेले आहेत याकडे संतोष जाधव यांनी लक्ष वेधले. आठवड्‌यापूर्वी सूचना देऊनही स्रक्षेबाबत कार्यवाही का केला नाही असा सवाल केला.

संदीप सासूलकर म्हणाले, दोन महिन्यापूर्वी लेखीपत्र देऊनही निष्काळजीपणा कंपनीचे अधिकारी दाखवित आहेत. रस्त्याची अनेक ठिकाणी कामे अर्धवट ठेवली आहेत. युवराज लोंढे म्हणाले, अतिक्रमण काढण्याचे काम बांधकाम विभागाचे आहे. याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. कंपनीचे अधिकारी व विनय आवर्सेकर, गणेश मुसळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता एस.एल.कुंभार म्हणाले, रस्ते स्रक्षिततेबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत. युवराज लोंढे, संतोष जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी चर्चेत कृष्णा सावंत, निलेश चव्हाण, नामदेव सावंत, अविनाश कालेकर, भूषणसुतार, नामदेव मोहीते यांनी सहभाग घेतला. यावेळी एकनाथ जोशीलकर, अरुण कालेकर, हर्षद लोंढे, अरविंद नावलकर, वैभव हळवणकर, राजेंद्र भोकरे, अजय वंजारे, पोलीस हवालदार अनिल सरंबळे, विशाल कांबळे, पोलीस पाटील दिपाली कांबळे उपस्थित होत्या .

कामासाठी परप्रांतीयांवर भिडस्त ; उत्तूर पंचक्रोशीत स्थानिक बेरोजगारीचे गंभीर चित्र


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर पंचक्रोशीत गेल्या काही वर्षांत लघुउद्योग, कारखाने, काजू प्रक्रिया उद्योग, बांधकाम व्यवसाय तसेच शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या कामगारांची गरजही वाढली आहे. मात्र स्थानिक स्तरावर पुरेशा प्रमाणात कामगार उपलब्ध होत नसल्याने व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना आता उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यांतील कामगारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे.

इलेक्ट्रिशियन, फरशी कामगार, गोठा कामगार, हमाल, बांधकाम कामगार, काजू कारखान्यातील कर्मचारी, शेती कामगार अशा अनेक क्षेत्रांत परप्रांतीय कामगारांचा वाढता सहभाग दिसून येत आहे. कमी मजुरीमध्ये आणि अधिक वेळ काम करण्याची तयारी असल्यामुळे स्थानिक उद्योजकांकडून त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही कुटुंबांनी उत्तूर परिसरात कायमस्वरूपी वास्तव्यास सुरुवात केली असून त्यांनी स्थानिक समाजात चांगले संबंधही निर्माण केले आहेत. अनेक जण प्रामाणिकपणे काम करत असून सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण होत आहे.मात्र दुसरीकडे तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या काही कामगारांमुळे चिंता वाढत आहे. अनेक जणांची कुठेही अधिकृत नोंद नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

कांही ठिकाणी शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय शेतातील उत्पन्न, फळे किंवा अन्य माल काढून नेण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक प्रशासनाकडे अशा स्थलांतरितांची अचूक माहिती नसल्याने भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर तात्पुरत्या वास्तव्यास येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, स्थानिक युवकांमध्ये शारीरिक मेहनतीच्या कामांबाबत वाढती उदासीनता असल्याचे व्यापारी व उद्योजक सांगत आहेत. छोटी-मोठी कामे करण्याची मानसिकता कमी होत चालल्याने अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. कामगार मिळत नाहीत, त्यामुळे बाहेरील राज्यांतील कामगारांवर अवलंबून राहणे भाग पडते, अशी भावना अनेक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक बेरोजगारी वाढत असताना बाहेरील कामगारांची संख्या वाढत असल्याने सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मोठे बदल होत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही स्थानिक तरुणांचा कल इतर क्षेत्रांकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक रोजगार व्यवस्थेवर याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उत्तूर पंचक्रोशीत वाढणारे उद्योग आणि त्यासाठी वाढणारी कामगारांची गरज ही विकासाची सकारात्मक बाजू असली तरी स्थानिक रोजगार, स्थलांतरितांची नोंद, सुरक्षेचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे नुकसान या मुद्द्यांवर प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कामगार मिळत नसल्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि कारखानदार यांच्याकडे परप्रांतीय कामगारांना कामावर घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे केवळ व्यापारी किंवा परप्रांतीय कामगारांना दोष देऊन उपयोग नसून स्थानिक स्तरावर कामाबाबतची मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

 महत्त्वाच्या बातम्या 

♦ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाईट हाऊस या निवासस्थानी हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी केलेल्या हल्ल्यात हल्लेखोर मारला गेला. ट्रम्प यांना यामध्ये कोणतीही ईजा झाली नाही.

♦ आंबा उत्पादकांची गणिते हवामानातील बदल व अमेरिका इराण युद्धामुळे विस्कटली असून आंबा प्रचंड प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला असल्याने दर कोसळले आहेत.

♦ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सज्ज झाले असते तरीही युद्धजन्य परिस्थितीमुळे सेवांच्या प्रारंभाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

♦ पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची भीती गृहीत धरुन नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला सहा जून पर्यंत विशेष न्यायालयीन कोठडी दिल्ली विशेष न्यायालयाने सुनावली आहे.

आयपीएल न्यूज

मुंबईला पराभूत करून राजस्थान प्ले ऑफ मध्ये गेला आहे. राजस्थानी ठेवलेले २०५ धावांची उद्दिष्ट काढताना मुंबईला २० षटकात नऊ बाद १७५ धावावरच मजल मारता आली. जोफ्रा आर्चरी याला सामनावीर घोषित करण्यात आले.

दरम्यान दिल्लीने कोलकाताचा पराभव केला.


प्ले ऑफ मधील पहिले चार संघ

बंगरूळू १८ गुण

गुजरात. १८ गुण

हैदराबाद १८ गुण

राजस्थान १६ गुण

आजचे पंचांग

दिनांक : २५ मे २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी (२६ मे पहाटे ०५.१० पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (२६ मे पहाटे ०४.०८ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : वज्र योग (२६ मे पहाटे ०३.१४ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : तैतुला करण (सायंकाळी ०४.४६ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : सिंह राशी (सकाळी ०९.०६ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४१ ते सकाळी ०९.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!