mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार २४ मे  २०२६

मतदारसंघातील वाड्यावस्त्यांवरील लोकांच्या प्रेमामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोणतीही संस्थात्मक पाठबळ नाही की राजकीय वारसा नाही असे असताना केवळ वाड्या- वस्त्यांवरील सर्वसामान्य नागरिकांच्या बळावर आपणाला कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचता आले. पूर्ण महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. एखाद्या मंत्र्याने मनात आणले तर तो काय करू शकतो हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील शक्य त्या सेवा सुविधा सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आवंडी धनगर वाडा क्रमांक तीन मधील पाणीपुरवठा योजना व रस्त्याच्या मुरमीकरण लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर होते.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, धनगर वाड्यावर प्राथमिक सेवा सुविधा पोहोचवण्याचा गेली कांही वर्षे आपण प्रयत्न करत आहोत. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संघटित रित्या एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा रस्ता असे म्हणावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. वन हक्काचे रखडलेले दावे तातडीने मार्गी लावण्याचे सूचना त्यांनी वनविभाग व महसूल विभागाला केल्या. स्थानिक धनगर बांधवांनी आपली एक इंचही जमीन विकू नये अन्यथा आपणालाच आपल्या गावामध्ये पाहुणे म्हणून रहावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी रणजीत सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी सरपंच बयाजी मिसाळ, जगू कोकरे,उप वनसंरक्षक विकास काळे, परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील राजू पोतणीस, इंद्रजीत देसाई, बाबू येडगे, धनंजय पाटील, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बशीर तकिलदार, सुनील दिवेकर , जितेंद्र भोसले, विलास भादवणकर, बंटी सूर्यवंशी, रामू कोकरे, संतोष भाटले, अभिजीत शिंदे, विजय थोरवत, महेश खेडेकर, मंदार बिरजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धनगर वाड्यावरील शिकणाऱ्या मुलींना पावसाळी अधिवेशना करता नेणार…

तिन्ही धनगरवाड्यातील मिळून ५० मुली शिक्षण घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. या सर्व मुलींना येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मुंबई दर्शन घडवून आणणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

खर्डा भाकरीचा घेतला आस्वाद…

आवंडी धनगर वाड्यावरील धनगर बांधवांच्या घरातील जेवण हा मंत्रिमहोदयांच्या आवडीचा विषय. कार्यक्रमानंतर त्यांनी धनगर बांधवांच्या घरात बसून विशेष मागणी करून खर्डा भाकरीचा येथेच्छ आस्वाद घेतला.

हंदेवाडी येथील रस्त्याचे काम प्रशासनाच्या निष्काळजीपणाने रखडले,संबंधितांवर कारवाईची मागणी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे ९९ लाखांची कामे प्रशासनाच्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचेकडे करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की,सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो.लोकांना चालणे ही अशक्य होते.अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली.सदर रस्ते डिसेंबर २०२५ मध्ये मंजूर होऊनही या वसाहतीमध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत ३१ मे ला संपणार असल्याचे समजते.तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसविण्याची व्यवस्था करावी.तसेच गावातील रस्त्याचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही त्याचीही चौकशी व्हावी. कामाची पूर्तता नाही झाली तरी उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

विष्णू बावडेकर,शीतल कदम, छाया चव्हाण,मारुती राजाराम, आनंदा शिंदे,संभाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति तहसीलदार आजरा,बांधकाम सभापती जी. प ., व सी. इ. ओ. जी. प. कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी पंचायत समिती सदस्य समीर पारदे,विस्तार अधिकारी बी. टी.कुंभार व इतर उपस्थित होते .

शासकीय वस्तीगृहात विनामूल्य प्रवेश सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात अनु. जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील इयत्ता ८ वी पासून पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या वर्षाकरीता प्रवेश देण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, आजरा येथे किंवा भ्रमणध्वनी ९५५२२१५१५२ द्वारे संपर्क साधावा. तसेच वसतिगृह ऑनलाईन प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर नोंदणी करुन विद्यार्थांनी आपला अर्ज परिपूर्ण भरून त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे. वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळेचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, संगणक कक्ष, जिम व क्रीडा साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जातात.

शहरात धुवॉंधार पाऊस

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता.

जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

 महत्त्वाच्या बातम्या 

♦ इंधन दरवाढ सुरूच असून केवळ चार दिवसात पेट्रोल लिटरमागे ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी वाढले आहे. यामुळे गेल्या नऊ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढले आहेत. ही सलग तिसरी दरवाढ आहे.

♦ ‘कॉकरोच जनता पार्टी’ मुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने त्यांच्या सिडको/ वाळूज महानगर येथील घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

♦ शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि न्यू कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के.आर. तथा कृष्णराव रामचंद्र यादव वय ९० वर्षे यांचे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

♦ गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथील गणेश बबन नांदवडे / वय २२ वर्षे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

आयपीएल न्यूज

काल झालेल्या पंजाब विरुद्ध लखनौ सामन्यांमध्ये पंजाबने लखनौवर सात गडी राखून मात केली व आपला प्ले ऑफ मधील प्रवेशाचा संघर्ष सुरूच ठेवला आहे.

गुण तक्ता

बंगळूरु १८
गुजरात. १८
हैदराबाद १८
पंजाब १५
राजस्थान १४


आजचे सामने

मुंबई विरुद्ध राजस्थान

दुपारी ३.३०
पासून

कोलकाता विरुद्ध दिल्ली

सायंकाळी ७:३० पासून

आजचे पंचांग

आजचे पंचांग
दिनांक : 24 मे 2026
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी (25 मे पहाटे 04:30 पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (25 मे पहाटे 02:50 पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : हर्षण योग (25 मे पहाटे 03:44 पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : बलवा करण (दुपारी 04:23 पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी 05:30 ते सायंकाळी 07:08 पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी 12:09 ते दुपारी 01:02
सूर्योदय : सकाळी 06:03
सूर्यास्त : सायंकाळी 07:08
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: 2083 विक्रम संवत
शक संवत: 1948 शक संवत

 

संबंधित पोस्ट

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

चंदगड संघाप्रमाणे आजरा तालुका खरेदी – विक्री संघाला वैभव प्राप्त करून देणार : जयवंतराव शिंपी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!