मंगळवार दि.७ एप्रिल २०२६


मधमाशांच्या हल्ल्यात वृध्द गंभीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मधमाशांनी केलेल्या हल्यात अण्णाप्पा चौऱ्याप्पा राठोड (वय ६५ या. सुतार गल्ली आजरा) हा वृध्द गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोल्हापुर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल सोमवार (ता. ६) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ग्रामिण रुग्णालयाजवळ असलेल्या पंपहाऊस परिसरातील माशांनी अचानकपणे राठोड यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने राठोड यांना बचाव करता आला नाही.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून राठोड यांना बचावण्याचा प्रयत्न केला. हल्यात राठोड हे गंभीर जखमी झाल्याने आजरा ग्रामिण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने पुढे त्यांना कोल्हापुर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेरणोली, कोरीवडे सरपंचपद पोटनिवडणुकीसाठी आजपासून धुमशान
पाच गावात सदस्यपदासाठी पोटनिवडणुक : राजकीय हालचाली वेगावल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली, कोरीवडे येथे सरपंचपदासाठीच्या रिक्त जागासाठी तर तालुक्यातील मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे व हरपवडे येथील सदस्यपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. आज मंगळवार (ता. ७) अर्ज भरणीला सुरूवात होणार आहे. यामुळे या गावातील राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.
पेरणोली ग्रामपंचायत सरपंचांनी राजीनामा दिल्याने तर कोरीवडे येथे सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने या दोनही जागा रिक्त होत्या. पेरणोलीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महीलेसाठी तर कोरीवडे सरपंचपद हे नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मडिलगे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण महीला, देऊळवाडी प्रभाग ३ मधील अनुसुचित जाती, बहिरेवाडी प्रभाग क्रमांक १ मधील अनुसुचित जाती महीला, हरपवडे प्रभाग क्रमांक १ मधील अनुचित जाती, धामणे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण अशा एकूण सहा सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. देऊळवाडी मडीलगेसाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, बहिरेवाडी, हरपवडे व धामणेसाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी आर. एस. गवळी तर पेरणोली व कोरीवडेसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे.

नारायण बाग उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव
शिवसेना उबाठाचा आरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
औद्योगिक वसाहतीच्या विस्तारणीकरणासाठी संकेश्वर – बांदा महामार्गावरील नारायण बागेची जागा संपादन करण्याचा घाट घातला जात आहे. उद्योगपतींच्या घशात ही जागा घालण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. ही जागा काजू बोर्ड, बीजगुणन केंद्र व कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग राबविण्यासाठी केली जावी. अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे म्हणाले, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यातील काजूला भागोलिक मानांकन (जीआय) मिळवण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत काजू उत्पादक संघ व प्रक्रिया उद्योग याबाबत चर्चाही झालेली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता आद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी नारायण बागेचे संपादन करू नये. अशी जनतेचीही भावना आहे. शासनाने यावर उपाय म्हणून २०११ मधे फळरोपवाटीका किंवा तालुका बीजगुणन केंद्राच्या जमिन खासगी सस्था, नगरपालिका आणि कोणत्याही संस्थेला हस्तांतरीत न करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. त्यामुळे ही जागा आद्योगिक वसाहतीला देवू नये.
तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, अत्यंत दुर्मिळ असे वृक्ष असणारा वनौषधी पार्क खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न कदापीही यशस्वी होवू देणार नाही. या विरोधात जनआंदोलन उभारले जाईल. सध्याच्या औद्योगिक वसाहतीमधे वापरा अभावी भूखंड शिल्लक आहेत. ठोस रोजगार देणारा एकही मोठा औद्योगिक प्रकल्प या वसाहतीमधे नाही. असे असतांना शहराच्या लगतच औद्योगिक वसाहत तयार करणे पर्यावरणीयदृष्ट्या योग्य नाही. या जागेत पर्यटनाच्यादृष्टीने एखादा प्रकल्प अथवा काजू बी संशोधन केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. या वेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, समीर चांद, शिवाजी इंगळे, सुनील डोंगरे, महेश पाटील, सुजय पाटील, अमित गुरव,गणेश कांबळे, संजय येसादे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘संस्कृती रक्षणासाठी जागृती हाच खरा मार्ग’ — वास्कर महाराज

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन पार पडले. वसंतदादा पाटील विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमात समाजातील एकोपा, संस्कारांचे जतन आणि सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
संमेलनात मार्गदर्शन करताना ह.भ.प. देवव्रत महाराज वास्कर यांनी समाजाने सजग राहून आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ह.भ.प. शरद घाग यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करत धर्माभिमान आणि कर्तव्यभावना जपण्याचे आवाहन केले.
संमेलनाच्या सुरुवातीला स्वागत कमान ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. लेझीम पथक, भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर दीपप्रज्वलन, गोपूजन, पाद्यपूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी स्वामी शिवयोगीनाथ महाराज, डॉ. के. डी. हिरेमठ, किसन महाराज, आकाराम पोवार, उमेश आपटे, सरपंच किरण आमणगी, पी. ए. घोरपडे, संदेश रायकर, बाळासाहेब सावंत, संजय धुरे, भास्कर भाईंगडे, राजू खोराटे, सतीश खंडाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ हासबे यांनी केले, तर आभार सचिन फाळके यांनी मानले.

निधन वार्ता
पार्वती गायकवाड

बेलेवाडी ता. आजरा येथील पार्वती दिनकर गायकवाड ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील धान्य दुकान व्यवस्थापक शिवाजी गायकवाड यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.
राऊ पाटील

भादवण तालुका आजरा येथील मुंबई स्थित सेवानिवृत्त पोस्ट विभागाचे कर्मचारी राऊ दत्तू पाटील (वय ६८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
सुनंदा प्रभू

लिंगवाडी ता. आजरा येथील सुनंदा गोविंद प्रभू ( वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महिनाभरापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले आहे.
आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी संतोष प्रभू यांच्या त्या आई होत. उद्या बुधवारी रक्षा विसर्जन आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ७ एप्रिल २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी (दुपारी ०४.३४ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (८ एप्रिल पहाटे ०५.५३ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : व्यातीपात योग (दुपारी ०४.१६ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : तैतुला करण (दुपारी ०४.३४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (८ एप्रिल पहाटे ०५.५३पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.२० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.२९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आयपीएल न्यूज
कालचा कोलकता विरुद्ध पंजाब सामना जोरदार पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आले. गुण तक्त्यात पाच गुणांसह पंजाब प्रथम क्रमांकावर,बंगळूरु द्वितीय, राजस्थान तृतीय क्रमांकावर आहे.
आजचा सामना :-
राजस्थान विरुद्ध मुंबई
स्थळ : गुवाहाटी
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


