mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार १५ मे  २०२६

वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात मोठे नुकसान

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामु‌ळे मडिलगेसह ठीक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मडीलगे येथील अमोल कांबळे यांचे पोल्ट्री शेड कोसळून अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. गावातील अनेकांच्या घरांची काले व पत्रे उडाले आहेत. आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले असून वृक्ष उन्मळून पडले आहेत.

आजरा तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मडिलगे येथे तर पाऊस व वादळाचा वेग मोठा होता. पावसाचा मारा व वादळामु‌ळे मोठे नुकसान झाले आहे. अमोल कांबळे यांचे कुरण नावाच्या शेतात पोल्ट्री शेड उभारले होते. येथे लेअर कोंबड्या पाळून अंड्याचे उत्पादन घेतले जाणार होते. यासाठी संपूर्ण तयारी श्री. कांबळे यांनी केली होती. वादळी पावसात हे शेड कोसळले. त्यांचे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा फटका गावातील घरांना बसला आहे. दत्तात्रय निउंगरे, संदीप सुतार, भगवान कांबळे, बाळू इंगळे, शिवाजी इंगळे, केशव बाणेकर यांच्या घरावरील छप्परावरील काल, पत्रे उडाली आहेत. बापू निऊंगरे व युवाराज जाधव यांच्या आंब्याच्या बागेचे नुकसान झाले आहे. वृक्ष उन्मळून पडले आहेत. आजरा तालुक्यात वादळी वाऱ्याने वीज गायब झाली होती. दिवसभर वीजेमुळे शासकीय कामे खोळंबली.

पंधरा दिवसात पर्यायी दुसऱ्या विद्युत लाईनची व्यवस्था करणार :महावितरणचे आश्वासन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत अन्याय निवारण समिती व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व वीज वितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांनी पुढाकार घेत काल गुरुवारी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आवाहन केले.

यानुसार आजरा येथील महावितरण कार्यालयात नागरिक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी वारंवार वीज खंडित होत असल्याबाबत नगरसेवक बाळ केसरकर व किरण कांबळे यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील १५ दिवसांत पर्यायी वीज लाईनची व्यवस्था केली नाही तर हजारो नागरिकांसह आंदोलन करून जाब विचारला जाईल असा इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुडेखान यांनी रात्रभर वीज नसताना वयोवृद्ध नागरिकांनी कसे जगायचे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रकाश सावंत यांनी,पावसाळ्यापूर्वीच फक्त आजरा शहराचीच वीज वारंवार का बंद होते? असा सवालही उपस्थित केला. आजरा तालुका वीज बिल वसुलीत प्रथम क्रमांकावर असूनही ग्राहकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभारी आजरा श्री. नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता श्री. कृष्णात कोळी व वायरमन श्री. संतोष डोंगरे उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी १२ वर्षांपूर्वी मलिग्रे येथे पर्यायी फिडिंगसाठी सबस्टेशन उभारण्यात आले होते, मात्र काही कारणांमुळे तो फिडर बंद असल्याची माहिती देण्यात आली.
यावर संबंधित सबस्टेशनची दुरुस्ती करून तसेच तेथून येणाऱ्या वीजवाहिन्यांच्या मार्गावरील झाडांची छाटणी करून पुढील १५ दिवसांत पर्यायी वीज व्यवस्था सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या चर्चेत प्रकाश सावंत, समिती उपाध्यक्ष गौरव देशपांडे तसेच समिती सदस्य जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, अतुल पाटील, दिनकर जाधव, शरीफ खेडेकर, मुनीर माणगावकर व सफवान काकतीकर यांनी सहभाग घेतला.

‘ आजरा ‘ च्या साखर वाटपास ३१ मे अखेर मुदतवाढ

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिटन अर्धा किलो सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू आहे.कारखाना व्यवस्थापनाने सदर साखर वाटपाची दिनांक १५ मे अखेर असलेली मुदत वाढवून ती दि. ३१ मे २०२६ करणेत आलेली आहे अशी माहिती आजरा साखर कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संतापजनक…

आंदोलन झाले विज गायब…

शहरवासियांनी वीज पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता सकाळी आंदोलन केले. आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गायब झालेली वीज सायंकाळी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली.

वर्क फ्रॉम होम करायचे कसे…?

तालुक्यात अद्यापही वर्क फ्रॉम होम करणारे अनेक जण आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे असे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मंडळींचे चांगलेच हाल होत आहेत.

 

विशेष बातम्या…

♦ देशामध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर एप्रिल २६ मध्ये तब्बल ८.३० % वर गेला आहे. हा दर गेल्या साडेतीन वर्षातील उच्चांकी दर आहे.

♦ मतदार यादींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा/एसआयआर तिसरा टप्पा महाराष्ट्रामध्ये येत्या ३० मे पासून सुरू केला जाणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

♦ जोरदार वादळी वाऱ्याने जत तालुक्यातील खलाटी येथे घराचे छत हवेत उडाले. छता बरोबर छताला बांधलेला पाळणाही उडून गेला व त्यातील नऊ महिन्याचे बाळ दगावले.

 निधन वार्ता 

जयसिंग कातकर

पेद्रेवाडी ता. आजरा येथे फोटोग्राफर जयसिंग नारायण कातकर ( वय ५५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई,वडील, विवाहित मुलगी, जावई, मुलगा असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन आज शुक्रवारी सकाळी पेद्रेवाडी येथे आहे.

आयपीएल न्यूज 

काल गुरुवारी झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यांमध्ये मुंबईने पंजाबला पराभूत केले. पंजाब ने दिलेले २०० भावांची उद्दिष्ट मुंबईने एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.३३ चेंडूत ७५ धावा काढणाऱ्या तिलक वर्माला सामनावीर घोषित करण्यात आले.

आजचा सामना…

लखनौ विरुद्ध चेन्नई

वेळ : सायंकाळी ७.३० पासू

गुण तक्ता

बंगळुरू.   १६
गुजरात.    १६
हैदराबाद.. १४
पंजाब.      १३
चेन्नई         १२
राजस्थान.  १२
दिल्ली.       १०
कोलकाता  ०९
मुंबई          ०६
लखनऊ.    ०६

आजचे पंचांग 

दिनांक : १५ मे २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (सकाळी ०८.३१ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (रात्री ०८.१४ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : आयुष्मान योग (दुपारी ०२.२० पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०८.३१ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : मेष राशी (सकाळी ०६.२१ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५८ ते दुपारी १२.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संव

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

BREAKING… एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!