बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४

गोठ्यावर वीज कोसळली…?
म्हैशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील गट नंबर ३६२ मध्ये असणाऱ्या हारुण पीरखान यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळली. वीज कोसळल्याने पत्र्याच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या विद्युत तारा पेटल्याने लोखंडी भागामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित झाला यामुळे दुभत्या म्हैशीला विजेचा धक्का बसून म्हैशीचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास सदर प्रकार घडला.
यामध्ये पीरखान यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

भादवण येथून युवती बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथून अठरा वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित युवतीच्या पालकांनी आजरा पोलिसात दिली आहे.१८ ऑक्टोबर रोजी घरातून निघून गेलेली संबंधित युवती अद्याप घरी परतली नसल्याचे वर्दीत म्हटले आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पावसामुळे रस्त्यावर पडले भगदाड…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यावर्षी सुमारे पाच महिने सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न प्राधान्याने ऐरणीवर आला असून तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
आजरा- महागाव मार्गावर बुरुडे नजीक असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याखालचा भराव वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. एखादी अपघातासारखी घटना घडण्यापूर्वीच सदर खड्डा बुजवून घेण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

पावसाची विश्रांती… धुक्याचे आगमन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले तब्बल पंधरा दिवस आजरा तालुकावासीयांना हैराण करून सोडणाऱ्या परतीच्या पावसाने अखेर थोडी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर आता सर्वत्र धुक्याचे आगमन झाले असून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
गेले पंधरा दिवस दररोज पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. शेतकरी वर्गाकडून सुगी खोळंबल्याने पावसाच्या विश्रांतीची प्रतीक्षा केली जात होती. मंगळवारपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला असून आता धुक्याचे आगमन होऊ लागले आहे. पावसाने पूर्ण विश्रांती घेऊन कडकडीत ऊन पडल्याशिवाय शेतकरी वर्गाच्या पावसाच्या तडाख्यातून बचावलेल्या पिकांच्या सुगीला वेग येणार नाही हे देखील स्पष्ट होत आहे.

आसमा शेखची ‘गुणवंत कृषी विद्यार्थी’ पुरस्कारासाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूरची कृषीकन्या कु. आसमा मुकीमुद्दीन शेख हिची ह्युमन सर्विस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील २०२४ मधील विद्यार्थी दशेतील कार्याची दखल घेऊन ‘गुणवंत कृषी विद्यार्थी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दहावीच्या परिक्षेत मोठा बदल !
‘या ‘ दोन विषयात ३५ नव्हे , फक्त २० गुण मिळाले तरी होणार पास !

महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परिक्षेत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आता गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये आता ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले तरी विद्यार्थांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंबधी तरतूद करण्यात आली आहे.
शाळेत असताना अनेक विद्यार्थांना गणित आणि विज्ञान हे विषय कठीण जातायत. या विषयांमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३५ गुण आवश्यक असतात. मात्र, यापुढे विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञानात या दोन विषयात २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला उत्तीर्ण केले जाईल. पण अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणीत किंवा विज्ञान अशा शाखांमध्ये करियर करायचे नाही अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. असे विद्यार्थी या दोन विषयात कमी गुण मिळाल्याने त्याच इयत्तेत अडकून राहाणार नाहीत. दहावीत गणीत या विषयात कमी गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाच ब्रेक लागतो. या बदलामुळे असे होणार नाही, विद्यार्थांना इतर क्षेत्रात आपले शिक्षण सुरू ठेवता येईल. दरम्यान शिक्षण आराखड्यातील या तरतुदींवर शिक्षणतज्ज्ञांकडून आक्षेप घेतला जात आहे. तसेच याचा विद्यार्थ्यांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
(viral news…online news)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



