शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर २०२५


जनतेच्या रेट्यामुळे अन्याय निवारण रिंगणात
सत्तेतून पैसा मिळवायचा नाही, समाजकारणासाठी राजकारणात- डॉ श्रद्धानंद ठाकूर

प्रशासक आल्यापासून जनतेला एकच उत्तर ते म्हणजे आमची सत्ता नाही. हे जबाबदारी टाळण्याचे लक्षण आहे.आम्हाला सत्तेतून पैसा मिळवायचा नाही.समाजकारणासाठी आम्ही राजकारणात आहोत. जनतेच्या रेट्यामुळे अन्याय निवारण आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे आज-यातील प्रसिद्ध डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांनी सांगितले.
आजरा सुजलाम सुफलाम करणार
आजरा शहरातील रामतीर्थ पर्यटनस्थळ विकसित करणार आहे.निधी आला पण निधीचा विनियोग होत नाही. निधी मध्ये आम्ही आजरा सुजलाम सुफलाम करणार असल्याचे डॉ श्रद्धानंद ठाकूर यांनी यावेळी सांगितले. सत्ताधारी मंडळींनी शहरात एक रूपयाचेही काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना मतदान मागण्याचा नैतिक अधिकार राहीलेला नाही.
समितीच्या आघाडीचे आठ उमेदवार
अन्याय निवारण समितीच्या आठ सदस्यपदासह नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला. अन्याय निवारण समिती आघाडी म्हणून घोषित करण्यात आली.
प्रभाग दोन मधून संजय लक्ष्मण इंगळे,चार मधून जावेद पठाण, अकरा मधून डॉ. स्मिता सुधीर कुंभार, प्रभाग क्रमांक बारा मधून गौरव दिगंबर देशपांडे, तेरा मधून रवींद्र भिमराव पारपोलकर, पंधरा मधून परशुराम वैद्यनाथ बामणे, सोळा मधून शृती सूरज पाटील, सतरा मधून आरती अभिजीत मनगूतकर तर नगराध्यक्षपदासाठी डॉ श्रद्धानंद ठाकूर उमेदवारी जाहीर करण्यात आली.
कर वाढीला विरोध केला
पाच पटीने करवाढीचा धक्का समितीने दिला. कर वाढीला विरोध केल्याने जुन्या कराप्रमाणेच कर आकारला. जनतेची कामे झाली नाहीत. नवीन नळपाणी योजनेच्या माध्यमातून आजरेकरांचे हाल झाले. माजी नगरसेवकांनी जनतेची अडचण बघितली नाही.
अन्याय निवारणला कामासाठी सत्ता पाहिजे…
अन्याय निवारण समितीने रोज नगरपंचायतीवर धडक मारून काम केले आहे. कामासाठी सत्ता पाहिजे. दिलेले उमेदवार प्रामाणिक आहेत. अडीच वर्षात जात, धर्म न बघता पाणी पुरवठा, सुविधा देण्यासाठी काम केले आहे. सेवा देण्याचे आवाहन देत आहोत.
हाती घेतले ते तडीस नेले…
७०० रूपयाचा घरफाळा ३२०० रूपये केला. आज-यात मोठा मोर्चा काढून समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला. रामतीर्थ कर आकारला होता तो मोफत केला. पटेल काँलनीत आठ दिवसात पाईप लाईन करून दिली. जातीच्या दाखला ताबडतोब देण्याची व्यवस्था केली. सत्ताधारी निवडून आले तर कर आकारणी पाच पट करतील. ठेकेदार कोण आहे हे आजरेकरांना अजून माहिती नाही. कोणत्याही नगरसेवकांनी जाब विचारला नाही. जनतेने ओळखून सहकार्य केले. हाती घेतले ते तडीस नेले.
सुशिक्षित वर्ग आमच्यासोबत…
सणासुदीत आठ ते दहा दिवस पाणी मिळाले नाही. शहरातील कचरा बाहेर जात नव्हता.सत्ताधारी मंडळी बेजबाबदारपणे वागली. कारभारात नियोजनाचा अभाव होता.समाजकारणात राजकीय पक्ष लागतोय. ही निवडणूक जनसामान्यांची व सतांतराची होईल. सुशिक्षित वर्ग आमच्या सोबतच राहील.
विजयाचा विश्वास…
आजरा शहरात सर्व धर्मीय राहतात.हे शहर समानतेच्या विचारांनी प्रेरित आहे. या शहरामध्ये कधीच जातीपातीचे राजकारण केले गेले नाही. सर्व समाज अतिशय गुण्यागोविंदाने काम करतात. शहराच्या विकासासाठी अनेकांनी वेगवेगळे योगदान दिले आहे. त्यामध्ये विविध समाजाचे लोक समाविष्ट आहेत. त्यामुळे शहर अतिशय विकासात्मक करण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला सर्व स्तरातून डॉ श्रद्धानंद ठाकूर यांना शहरातील सर्व समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे.याचा त्यांना ठाम विश्वास आहे व याच जोरावर आपण निवडणुकीत विजयी होऊ असे ते सांगतात.
भ्रष्टाचाराला थारा देणार नाही…
गेल्या सात वर्षात शहरात एक रूपयाचेही काम झालेले नाही. आलेला निधी कुठे गेला हे जनतेने ओळखावे. आम्ही भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.

केवळ ढपलेबाजीत खोळंबली.. आजऱ्याची पाणी योजना

आजरा शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. काही व्यक्तींनी ही योजना जणू स्वतः मंजूर करून आणल्याचा खोटा दावा करून जनतेची दिशाभूल करण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की ही योजना शासनमान्य असून, स्थानिक पातळीवर झालेल्या गंभीर त्रुटी, गैरव्यवस्थापन आणि ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण प्रकल्प अडीच वर्षांपासून ठप्प पडलेला आहे असा आरोप अन्याय निवारण समितीच्या वतीने प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कंत्राटदाराने मुदतीत काम पूर्ण केलेले नाही, आणि झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी असंख्य वेळा दाखवून दिले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे—या प्रकल्पाचा ठेकेदार नेमका कोण आहे याची माहिती आजही नागरिकांना दिलेली नाही. तसेच प्रशासना बरोबर समितीने केलेल्या चर्चांमध्ये हा ठेकेदार एकदाही उपस्थित राहिलेला नाही.
या योजने दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये केलेल्या रस्ते खोदकामामुळे नागरिकांना गेले तीन वर्षे तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व अनियमिततेविरुद्ध अन्याय निवारण समितीने सतत आवाज उठवला, निवेदने दिली, आंदोलने केली आणि बैठकीत सहभागी होऊन नागरिकांच्या अडचणी मांडल्या. परंतु या चर्चांमध्ये काही नगरसेवकांनी नागरिकांच्या बाजूने आवाज उठवण्याऐवजी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचेच समर्थन केले, जे नागरिकांच्या हिताला विरोधी ठरले.
दिनांक ११/३/२०२५ रोजी पाणीपुरवठ्यातील त्रुटीविषयी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १०/३/२०२५, शहरात पाणीपुरवठ्याचा बंद दिवस असतानाही, मोर्चा मोडीत काढण्यासाठी सर्वत्र पाणीपुरवठा करून जनतेला भ्रमित करण्याचा उघड प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही पाणीपुरवठा कामकाजात अनियमितता आणि अंदाधुंदी कायमच राहिली.
आता मात्र निवडणुकांच्या तोंडावरच अचानक रस्ते व पाणीपुरवठ्याची कामे केल्याचा दिखावा करून पुन्हा नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजरेकरांना गेल्या अनेक वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांची आणि ढपलेबाज कारभाराची पूर्ण जाणीव झालेली आहे.
या सर्व परिस्थितीत नागरिकांची एकच अपेक्षा आहे—पाणीपुरवठा योजना पारदर्शकपणे, गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण व्हावी, तसेच जबाबदार व्यक्तीं जर मत मागायला आली तर त्याना जाब विचारला जावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.





