शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर 
वाटंगी यमेकोंड येथे हत्तीचा धिंगाणा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी व यमेकोंड परिसरात हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
माजी पंचायत समिती सभापती अल्बर्ट डिसोजा यांच्या शेतातील घराचा दरवाजा तोडण्या बरोबरच हत्तीने आजूबाजूच्या ऊस पिकाचेही नुकसान केले आहे. गेले काही दिवस हत्ती या परिसरात तळ ठोकून आहे.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. हा हंगाम सुरू असतानाच हत्तीने ऊस पिकाचे मोठे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे.
वाटंगी बरोबरच यमेकोंड परिसरात सुरू असलेल्या या नुकसान सत्राला बळीराजा वैतागला आहे. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार तरी कधी ? असा सवाल पुन्हा एक वेळ उपस्थित केला जात आहे.
शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षाला जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगीतील वटवृक्षाला काल गुरुवरी जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वटवृक्ष संवर्धना बाबतीत सखोल व सकारात्मक चर्चा जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच संदीप चौगले व गावकऱ्यासोबत केली.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले व नवीन योजनांबद्दल माहिती दिली. तसेच पूर्ण परिसरात अतिक्रमण होवू नये म्हणून त्वरित निधी लावू असे सांगितले. ग्रामपंचायत मार्फत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री. समीर माने (तहसीलदार), गटविकास अधिकारी सुभाष सावंत ,सी आर देसाई ,तलाठी समीर जाधव, माजी उपसरपंच श्री पांडुरंग टकेकर , पोलिस पाटील दत्ता गुरव, श्री सागर रवींद्र कुंभार, श्रावण देसाई ,अमर कानडे, दत्तात्रय येलगार , आनंदा कांबळे, उत्तम चौगले, कोकीतकर प्रा.एम व्ही.देसाई , ग्रामसेवक किशोर पाटील, शिवाजी निवुंगरे तानाजी देसाई , तुकाराम कांबळे , सचिन कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
परदेशी पाहुण्यांच्या भेटीचा दौरा पुढे ढकलला
शुक्रवारी २८ रोजी इंग्लंड येथील आरबोरिकल्चरल असोसिएशन संस्थेचे पदाधिकाऱ्यांचा महाकाय वटवृक्षाला भेट देण्याचा दौरा पुढे ढकलला असून यासंदर्भात आरबोरिकल्चरल असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पारकर यांनी व्हिडिओद्वारे आजाद हिंद नेचर आर्मी यांना कळविले आहे.
वाटंगी येथे मानसिक आरोग्य तपासणी शिबिरात ११३ रुग्णांची तपासणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे नागरिकांसाठी मानसिक आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व उपचार पद्धतीची माहिती देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
यावेळी डॉ. कुलकर्णी, डॉ. बेळगुंद्री, डॉ. आर. जी. गुरव , डॉ. शेख या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
रुग्णांना मानसिक ताण, चिंता (Anxiety), झोपेचे विकार, उदासीनता (Depression) यांसारख्या समस्यांबाबत समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मानसिक आरोग्य सेवांचा लाभ त्यांच्या सोयीनुसार मिळाला असून, शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
शेळप येथे दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप येथे श्रीमत् सत्गुरू पद्मनामाच्यार्य स्वामी महाराज शिष्य सांप्रदाय मंडळ, श्री क्षेत्र दत्त मंदिर शेळप यांच्यावतीने दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी दत्तजन्मोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाला कुटुंब कल्याण व सार्वजनिक आरोग्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार भरमूआण्णा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि. २८ रोजी अभिषेक, गुरुचरित्र पारायण, पद्मनाभ स्वामीकृत हरिपाठ, दत्त स्त्रोत होणार आहेत. मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी दिपप्रज्वलन, महाअभिषेक, अखंड विणा नामस्मरण, चजपूजन, ध्वजारोहण होणार आहे. मंगळवारी रात्री ह.भ.प प्रल्हाद अहीर महाराज (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे. यानंतर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. ३ रोजी डॉ. किरण कुंभार (रायगड, भुषण) यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. ४ रोजी महाअभिषेक पूजन सुमेध मोहिते उर्फ फुलचंद स्वामी, कोल्हापूर यांच्या हस्ते पार पडणार आहे. दुपारी १ वाजता महिलांसाठी हळदी कुंकु कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला ताराराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता ह.भ.प संजय पाटील यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
मालेगाव प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
रिपब्लिकन सेनेचे तहसिलदारांना निवेदन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मालेगाव येथे मुलींवर लैगिंक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अशा आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आजरा तालुका रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये महिलांवर लैगिंक अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर वारंवार अत्याचार घडत आहेत. त्या महिला सुरक्षित रहाव्यात असे वाटत असेल तर मालेगाव प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष गोपाळ होन्पाळकर, परशुराम कांबळे, अविनाश कांबळे, मधुकर कांबळे, शंकर कांबळे, शामराव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

आजरा परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील : आलम नाईकवाडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहराच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या आजरा परिवर्तन विकास आघाडीने सुशिक्षित व सक्षम उमेदवार शहरवासीयांसमोर ठेवले आहेत. नगरपंचायत कारभारातील सावळा गोंधळ दूर करण्यासाठी व शहराच्या शाश्वत विकासासाठी शहरवासीयांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवारांना घसघशीत मतदान करून विजयी करावे असे आवाहन नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी केले.
आघाडीच्या वतीने आयोजित प्रचार फेऱ्यां दरम्यान ते बोलत होते.
यावेळी शहरवासीयांशी संवाद साधताना नाईकवाडे म्हणाले, आपणही सत्तारूढ आघाडीमध्येच यापूर्वी होतो परंतु चाललेला कारभार आपणाला मान्य नसल्यामुळे आपण सत्तारूढ आघाडीपासून बाजूला राहणे पसंत केले. आजरा परिवर्तन आघाडी निश्चितच पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करेल असा आपणाला विश्वास आहे म्हणूनच आपण या आघाडी सोबत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संजय सावंत, अभिषेक शिंपी माजी उपनगराध्यक्ष सौ. संजीवनी सावंत,सौ. अलका शिंपी, कॉम्रेड संपत देसाई, प्रभाकर कोरवी, सुधीर नार्वेकर, अशोक पोवार, भैरवी सावंत,अशोक जांभळे, रवी तळेवाडीकर यांच्यासह आघाडीचे उमेदवार व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ताराराणी आघाडीचा विजय निश्चित…
प्रभाग दोन मध्ये अशोक चराटी यांची सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायत निवडणुकीतील मतदारांचा ताराराणी आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आघाडीचे सर्व उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होतील असा विश्वास आघाडीचे प्रमुख अशोक अण्णा सराटी बोलत होते अश्विन डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी आघाडीची प्रचार सभा पार पडली.
यावेळी चराटी म्हणाले ज्यांना निवडणुकीत सर्व प्रभागात उमेदवार मिळाले नाहीत ते कशाच्या जोरावर विजयाचा दावा करीत आहेत हे समजत नाही. काही मंडळींनी तर केवळ बदनामी करून मते मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे पण शहरवासीयांना सर्व काही माहित आहे. बदनामी करण्यापेक्षा विकासावर बोला असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विलासराव नाईक, जयवंतराव सुतार, विजयकुमार पाटील, शिवाजी गुडूळकर, गणपतराव डोंगरे, अनिकेत चराटी, दत्तात्रय मोहिते, अश्विन डोंगरे, संजय चव्हाण, विजय सावंत, विजय थोरवत, उदय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

त्यांनी काय विकास केला हे शहराकडे पाहिल्यानंतर सांगण्याची गरज नाही : परशुराम बामणे
अन्याय निवारण समितीच्या प्रचारफेऱ्यांना प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विकासाचा डांगोरा पिणाऱ्या मंडळींनी आता शहरवासीयांना व त्यांच्या आप्तस्वकीयांना आणि शहराचा विकास केला म्हणून सांगण्याची गरज नाही. शहरवासीयांना धड पाणी नाही, चालताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही, गटर्स व रस्ते बांधणीचा दर्जा, रेंगाळलेली पाणीपुरवठा योजना, अनधिकृत बांधकामे व अनधिकृत पद्धतीने नगरपंचायत जागेत बांधलेले गाळे या सर्वांना त्यांनी दिलेले अभय सर्वश्रुत आहे. त्यामुळे विकासाच्या गप्पा आता बंद करा. शहरवासीयांची दिशाभूल करून मते मिळवण्याची दिवस केले अशा शब्दात परशुराम बामणे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
अन्याय निवारण समिती आघाडीच्या वतीने शहरांमध्ये प्रचार फेऱ्या पार पडल्या यावेळी ते बोलत होते. या प्रचार फेऱ्यांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचार फेरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ .श्रद्धानंद ठाकूर, भास्कर बुरुड, जावेद पठाण, संजय इंगळे, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, गौरव देशपांडे, धनाजी पारपोलकर, जोसेफ लोबो, राजेंद्र वाळके, अरुण देसाई, यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


