mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेश

सातच्या बातम्या

सोमवार  २३ जून २०२५              

चितळे येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       मंगळवार दिनांक १९ जूनपासून चितळे ता.आजरा येथून बेपत्ता असणाऱ्या तानाजी सुरेश तरडेकर (वय २५ वर्षे  ) यांचा मृतदेह त्यांचे चुलते धोंडीबा तरडेकर यांच्या मालकीच्या गट नंबर मधील विहिरीमध्ये काल दुपारी तरंगताना आढळला. तरडेकर यांचा बुडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

      मंगळवारपासून तरडेकर हे बेपत्ता होते. याबाबतची वर्दी आजरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान त्यांचा शोध सुरू असता काल त्यांचे बंधू शिवाजी तरडेकर यांना चुलत्यांच्या विहिरीमध्ये मृतावस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.

      याबाबतची वर्दी शिवाजी तरडेकर यांनी पोलिसात दिली असून पोलीस हवालदार अनिल सरंबळे पुढील तपास करीत आहेत. 

अर्जुन घेवडे यांची मर्चंट नेव्ही च्या कॅप्टन पदी निवड…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील चाफवडे येथील योगेश अर्जुन घेवडे यांची मर्चंट नेव्हीच्या कॅप्टन पदी निवड झाली आहे. सध्या जपान येथील मित्सुई ओ.एस.के. लाइन्स येथे ते कार्यरत आहेत.

       चाफवडे सारख्या ग्रामीण भागात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले आहे जानेवारी २००६ पासून ते शिपिंग कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

       स्वकर्तृत्वावर मर्चंट नेव्ही कॅप्टन पदापर्यंत त्यांनी मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

उत्तूर मधून एकजण बेपत्ता

          उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील बाजारपेठेतील सुनील एकनाथ वेसणेकर (वय ५८ वर्षे) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत स्वाती वेसणेकर यांनी पोलिसात वर्दी दिली आहे. वेसणेकर हे घरातून काही न सांगता निघून गेले ते परत आलेले नाहीत. त्यांच्या अंगावर पिवळसर रंगाचा शर्ट तपकिरी रंगाची पॅंट आहे. कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या सलामीतच तीन घरांची पडझड

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये गेले आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे तीन घरांची पडझड होऊन अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ‌.

       यमेकोंड येथील सुरेश महादेव कांबळे यांच्या घराची भिंत पडून सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले तर हात्तिवडे येथील शंकर रामचंद्र सुतार यांच्या रहात्या घराची ही पडझड झाली आहे. त्याचबरोबर वाटंगी येथील शांताबाई दत्तात्रय कांबळे यांच्या घराचीही भिंत कोसळली आहे. शासन दरबारी तीन घरांची पडझड असली तरीही प्रत्यक्षात ही संख्या जास्त असल्याचे सांगितले जाते.

      पडझड झालेल्या घरांचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत.

     शारंगधर देशमुख शिंदे सेनेत जाणार…

आजऱ्यातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कोल्हापूर येथील आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख हे शिवसेनेत (शिंदे गट ) प्रवेश करत असून आजऱ्यात सध्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या संजयभाऊ सावंत यांच्यासारखे त्यांचे समर्थक यापुढे नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

       शारंगधर देशमुख व आजऱ्यातील संजयभाऊंसह काही मंडळींचे थेट व निकटचे संबंध आहेत. शारंगधर यांना मानणारी अनेक मंडळी आजऱ्यामध्ये आहेत. देशमुख यांच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असलेल्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संबंधितांना याबाबत कल्पना देण्यात आल्याचेही समजते.

      देशमुख यांच्या सेना प्रवेशानंतर आजरा तालुक्यातील देशमुख यांना मानणाऱ्या व सध्या काँग्रेससोबत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय राहणार ? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

ते ठसे मादी बिबट्याचे….

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मंगळवारी अडकूरहून वाटंगीकडे येणाऱ्या तरुणांना रात्री वाटंगी येथे बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाने बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले होते. उपलब्ध झालेले ठसे हे मादी बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या परिसरातील बिबट्याचा वावर पुन्हा एक वेळ चर्चेत आला आहे.

आशा स्वयंसेविकांचे थकित मानधनासाठी खा. धनंजय महाडिक यांच्याकडे मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आज-यासह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकाच्या शिष्टमंडळाने थकित मानधन देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तक यांचे सहा ते सात महिन्याचे केंद्र शासनाचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थीत फार बिकट झाली आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजना ऑनलाईन फॉर्म आशांनी भरले त्याचे चार वर्षाचि मानधन अद्यापही मिळालेले नाही. योजनासुद्धा महिला बालसंगोपन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे . त्याचे मानधन लवकरात लवकर मिळावे. खा.महाडिक यांनी लक्ष घालून ताबडतोब देण्याची मागणी करण्यात आली आहे.

      दरम्यान यावेळी खा. महाडिक यांनी क्रेंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला व चार दिवसात मानधना संदर्भात माहिती देण्यात येईल असे आश्वासन दिले . तसेच राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याशीही महाडिक यांनी फोन द्वारे संपर्क केला असता चार दिवसात मानधन संदर्भातील अपडेट कळविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी नेत्रदिपा पाटील, मंदाकिनी कोडक, सुनिता पाटील , रूपाली गुरव, रेश्मा कुंभार , अनिता पाटील, विद्या बाणेकर, दिपमाला पोवार, शुभांगी मोहिते, सुरेखा पाटील, भारती कांबळे आदी उपस्थित होते.

निधन वार्ता

शरद गुरव

      गजरगाव तालुका आजरा येथील शरद सदाशिव गुरव (वय ३२ वर्षे ) यांचे मुंबई मुक्कामी अल्पशा आजाराने निधन झाले.

      त्यांचा पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

मसोली नजीक मालवाहू टेम्पो खड्ड्यात कोसळला… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews

पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!