मंगळवार २४ जून २०२५

अतिवृष्टी…
नद्या पात्राबाहेर, बंधाऱ्यांवरून पाणी, घरांची पडझड, वीज गायब

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात तुफानी पाऊस सुरू असून काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तालुकावासीयांची अक्षरशः दैना उडाली आहे. कालच्या २४ तासांमध्ये सुमारे ९६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पावसाच्या जोरदार सरींमुळे हिरण्यकेशी व चित्रा नदी दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणी पात्रा बाहेर आले आहे तर साळगाव बंधाऱ्यासह हिरण्यकेशी वरील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जून महिन्यातील एकूण पावसाच्या सरासरीपेक्षा आजरा मंडल मध्ये ११० टक्के (४४१० मिलिमिटर) इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

जोरदार पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट असून ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होताना दिसत होता. ग्रामीण भागामध्ये घरांची पडझडही सुरू झाली आहे. दाभिल येथील गणपती मस्कर, होनेवाडी येथील विष्णू जाधव,पारेवाडी येथील संभाजी निकम आदींच्या घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती कामे मात्र रेंगाळले आहेत. अनेकांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत.
एकंदर जोरदार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रामतीर्थ धबधबा ही ओसंडून वाहू लागला आहे.

अशोकअण्णा तुम्ही किती पक्षांचे झेंडे खांद्यावर घेणार?
अन्याय निवारण समितीचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वतः भाजपचे जिल्हा पदाधिकारी असताना नगरपंचायतीची निवडणूक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचे जाहीर केले. अशोक अण्णा तुम्ही किती पक्षांचे झेंडे खांद्यावर घेणार? खांद्यावर असलेला भाजपचा झेंडा खाली ठेवणार का? अशी बोचरी टिका आजरा शहर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे व सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली. नगरपंचायत निवडणूक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या झेंड्यावर लढवणार असे अशोक अण्णांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर सदर पत्रकार बैठक घेऊन अन्याय निवारण समितीने कांही सवाल उपस्थित केले आहेत.
आजरा नगरपंचायत मंत्री आबिटकर यांनी मंजूर करुन आणली मात्र पहिल्याच निवडणुकीत त्यांना विश्वासात न घेता पॅनेल जाहीर केले.कामाचा ध्यास असलेल्या मंत्री आबिटकर यांनी व्यक्तीदोष न पहाता कोट्यवधी रुपयांची कामे दिली.मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याचा गैरवापर केला.पाणी पुरवठा योजना, शहरातील गटारी, रस्ते यांची वाट लावली आहे हे आता जनतेला समजल्याने व त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी मंत्री आबिटकर यांना पुढे केले आहे.
अशोक चराटी यांनी सोईचे राजकारण केले. विधानसभेच्या वेळी पाठिंबा देण्यास का वेळ लावला. निष्ठा असल्याचे हे केवळ नाटक आहे. कामे करुन घेताना मंत्री आबिटकर दिसतात मात्र सोबत रहाताना अशोक चराटी अनेक कारणे पुढे करतात.मंत्री आबिटकर यांची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा हेतू असल्याची टिका बामणे यांनी केली. पाणी योजनेचा मुळ ठेकेदार कोण आहे हे सांगायला सत्ताधारी तयार नाहीत.आपल्याच लोकांना उपठेकेदार करुन दर्जाहीन कामे करुन घेतली जात आहे.
अन्याय निवारण समितीने समाजाभिमुख काम केले आहे त्यामुळे कामांचा दर्जा अबाधित राहीला आहे. अन्याय निवारण समिती सतत कामांचा पाठपुरावा करुन घेत असल्याचे बामणे यांनी सांगितले.यावेळी शिवसेना (शिंदे) तालुकाध्यक्ष विजय थोरवत यांनीही मत व्यक्त केले.
या पत्रकार बैठकीला बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, मिनीन डिसोजा, गौरव देशपांडे, दयानंद भोपळे, दिनकर जाधव, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अनेकांच्या नावावर बोगस कामे…
शहरात सुरू असणारी लाखो रुपयांची विकास कामे विविध ठेकेदारांच्या नावावर घेण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या कारभाऱ्यांनीची कामे घेतली आहेत. अनेक कंत्राटदारांना आपल्या नावावर कामे आहेत हे माहित देखील नाही असेही यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील शाळांची हिंदी सक्ती मागे घ्या…
आजऱ्यातील विविध पक्ष व संघटनांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून मराठी शाळा बंद करण्याच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या राज्यसरकारच्या धोरणाला आमचा विरोध असून पहिलीपासून हिंदीची सक्ती धोरण मागे घेण्यात यावी अशी मागणी आजरा तालुका पुरोगामी व प्रागती पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांच्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचे धोरण घेतले आहे. या धोरणामुळे महाराष्ट्रातील मुलांच्या बौद्धिक विकासात मोठी गुंतागुंत तयार होणार आहे. वास्तविक लहान वयात कोणत्याही संकल्पना नीटपणे समजायच्या असतील तर मातृभाषा आणि बोलीभाषेतूनच त्या अधिक प्रभावी पध्दतीने मुलांच्यापर्यंत पोहचतात. भाषा हे संवादाचे मध्यम आहे. महाराष्ट्रात प्रमाण मराठीपेक्षा बोली भाषेत जास्त संवाद होतांना दिसतो. बोली हीचं संवादाची प्रभावी भाषा असते. महाराष्ट्रात मालवणी, अहिराणी, गोंडी, भिलोरी, पावरी, मराठवाडी, खानदेशी, चंदगडी अशा अनेक बोली भाषा आहेत. या साऱ्या बोली भाषांनी मिळून प्रमाण मराठी भाषा समृध्द केली आहे.
वेगवेगळ्या बोली भाषेतून आलेल्या मुलांना प्रमाण मराठी सुध्दा समजताना अडचणी जाते. असे असतांना हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्यची सक्ती का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यामागे भाषेचे राजकारणा आहे हे स्पष्ट आहे. एखाद्या जनसमुदायावर सत्ता गाजवायची असेल तर प्रथम त्या जनसमूहाला त्याच्या भाषेपासून तोडावे लागते. एकदा हा जनसमूह आपल्या भाषेपासून तुटला की तो सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम होतो. कारण भाषा हे संस्कृतीचे वहन करणारे प्रभावी माध्यम आहे. सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम झालेल्या समूहावर सत्ता करणे सहजसोपे असते. थोडक्यात भाषेच्या माध्यमातून वर्चस्वाचे राजकारण खेळले जाते. त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या मागे एक भाषिक राजकारण आहे हे स्पष्ट आहे. म्हणूनच या धोरणाला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.हे धोरण तातडीने मागे घ्यावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील , रवींद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे , संजय घाटगे,बाळू जाधव भीमराव माधव, काशिनाथ मोरे उपस्थित होते.

सेवाक्षेत्रातील रवळनाथची गरुडभरारीच बँकेचे स्वप्न साकार करेल
प्र. कुलगुरु डॉ. पाटील
रवळनाथची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था असा लौकिक रवळनाव हॉसिंग फायनान्सने निर्माण केला आहे. गेल्या २९ वर्षामध्ये सहकारावरील श्रद्धा, कामावरील निष्ठा, शिस्त आणि समर्पण या सुत्रीमुळे सेवाक्षेत्रामध्ये रवळनाथने गरुडभरारी घेतली आहे. त्यामुळे ही गरुडभरारी आणखी शाखा विस्तारांसह संस्थेचे बैंकेत रुपांतर करण्याचे स्वप्न निश्चितच साकार होईल असा विश्वास संस्थेचे सभासद व शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केला
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी स्टेट) प्रधान कार्यालय, गडहिंग्लज या संस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कोल्हापूर येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बसवराज मास्तोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले होते.
यावेळी पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त सभासद व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रा. डॉ. पी. एस. पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी संचालक श्री. महेश मजती यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला
श्री. बसवराज मास्तोळी म्हणाले, निवारा ही मानवाची मुलभूत गरज ओळखून ती पुर्ण करण्यासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड वा प्रामीण भागातून रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कार्यास सुरुवात झाली. सामाजिक बांधिलकी, आर्थिक शिस्त, कुशल नेतृत्व आणि व्यावस्थापन कौशल्यामुळेच खेड्यातून सुरु झालेल्या या संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी संस्थेच्या कार्याचा व उपक्रमांचा आढावा घेतला. केवळ सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतकांचा विश्वास आणि पाठबळ, संचालक, सल्लागार व कर्मचा-यांचे योगदान यामुळेच संस्थेने २९ वर्षाच्या वाटचालीसह संमिश्र व्यवसायाचा १००० कोटीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला, पापुढेही सर्वांनी अशीच साथ द्यावी असेही त्यांनी आवाहन केले.
सीईओ श्री. ओ. के मायदेव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. मागील सभेचा वृत्तांत बोर्ड सेक्रेटरी सौ. प्रज्ञा पाटील यांनी वाचला अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन संचालक प्रा. व्ही. के मायदेव, नफा विभागणी वाचन संचालक प्रा. विजयकुमार घुगरे यांनी तर अंदाजपत्रक वाचन संचालक प्राचार्य डॉ. आर.एस. निळपणकर यांनी केले.
ऐनवेळच्या विषयांसह सर्व विषयांना चर्चेअंती एकमताने मंजूरी देण्यात आली.प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सो. मौना रिंगणे यांनी आभार मानले.
सभेस सर्व संचालक, शाखा चेअरमन सभासद उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयाचे MHT-CET, JEE व NEET प्रवेश परीक्षांमध्ये धवल यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ तसेच NEET व JEE परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केले .या परीक्षेत आजरा महाविद्यालय आजरा मार्फत चालविण्यात येणाऱ्या CET बॅच मधील ४० पैकी तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.
यामध्ये ७ विद्यार्थी ९० पर्संटाईल च्या पुढे,
८ विद्यार्थी ८० च्या पुढे तर १९ विद्यार्थी ७० च्या पुढे पर्संटाईंल मिळवले आहे.
यामध्ये MHT-CET साठी समृद्धी नार्वेकर ९४.८७, प्रज्योत कुंभार ९५.६३साईनाथ डोंगरे ९५.२५,अंकिता पाटील ९४.७८,चिन्मय पाटील ९३.३५,काजल गेहलोत ९१.७५,दिपाली झेंडे ९१.७१त्याचबरोबर वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा NEET साठी सोहम चव्हाण ९५.८९, समृद्धी नार्वेकर ९४.८७ ,ईरम वाडीकर ७१.५५
हे विद्यार्थी पात्र झाले आहेत..
त्याचबरोबर मीना कालेकर, मानसी राजबंसी व अंकित गणेश राम हे विद्यार्थी JEE Advance परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.LL.B CET मध्ये सानिया नार्वेकर हिला ९५.३८ पर्संटाईल इतके गुण प्राप्त झाले आहेत.
यासाठी जनता शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोकआण्णा चराटी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.अशोक सादळे ,अधिक्षक योगेश पाटील, उपप्राचार्य दिलीप संकपाळ व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

धामणे येथे हिवताप जनजागरण व अतिसार नियंत्रण मोहीम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ ते ३० जून अखेर हिवताप जनजागृती मोहीम सूरु आहे. यामध्ये आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या १६ गावामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या मार्फत घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हेक्षण व कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणेत आली. ताप रुग्णांचे रक्त नमुने गोळा करुन शाळेमध्ये मुलांना कीटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन केले .
डॉ.रविकांत शर्मा व डॉ. श्री. कसबे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे, देवानंद तानवडे, रणवीर पाटील, कल्पना बंडगर, क्रांती पाटणकर, सुनिता शिंत्रे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

निधन वार्ता
अकबर तगारे

आजरा येथील सेवानिवृत्त बस चालक अकबर हुसेन तगारे ( वय ६६ वर्षे ) यांचे दिनांक २३ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. उर्दू शाळेचे शिक्षक महमद तगारे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो क्लिक



