mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार  दि. ७ मार्च २०२६

गिरणी कामगारांना मुंबईतच घर देऊन त्याची योजना जाहीर करा : कॉ. अतुल दिघे

आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे शासनाने मान्य केले असून आज उद्या करत वाऱ्यावर सोडले आहे. येत्या अधिवेशनात शासनाला जाब विचारण्यासाठी १० मार्च रोजी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करून सरकारने मुंबई घरे दाखविण्याचा कार्यक्रम करून मुंबईतच घरे देऊन त्याची योजना जाहीर करावी असा इशारा कॉ. अतुल दिघे यांनी दिला. आजरा येथे किसान भवनाच्या सभागृहामध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

स्वागत कॉ. संजय घाटगे यांनी केले. प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी बोलताना उदय भट म्हणाले, शासनाकडे अदानी व अंबानी यांना देण्यासाठी प्रचंड जागा आहे. परंतू गिरणी कामगारांनी स्वतःचे रक्त आटवून मुंबईला जागतिक दर्जा दिला. त्यातील गिरणी व्यवसाय बंद करून गिरणी कामगारांना देशोधडीला लावले.

संघटनेच्या मागणीप्रमाणे गिरणीच्या जागेतच गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याची मान्य केले असून ती घरे दाखविण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर करावा यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगितले.

यावेळी अतुल दिघे यांनी निवडणूका तोंडावर आल्यानंतर गिरणी कामगारांची आठवण येते, पण प्रत्यक्ष मागणीच्यावेळी पालकमंत्री दुर्लक्ष करतात. हे बरोबर नाही. मुंबईमधील एकूण १४ संघटना एकसंघ झाल्याने गिरणी कामगारांना मुंबईतच घरे दिली पाहिजेत. तसेच गिरणी कामगार हे पेन्शनर व शेतकरी आहेत. त्यासाठी त्यांची पेन्शनवाढ व शेतीच्या नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे यासाठीही लढण्याची तयारी ठेवावी तसेच गिरणी कामगारांच्या वारसांचा पाठिंबा वाढत असल्याचे  सांगितले.

कॉ. शांताराम पाटील यांनी आजऱ्यातील गिरणी कामगार हा लढवय्या व चळवळीतील असून आजऱ्यातील गिरणी कामगारांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. धोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विठ्ठल बामणे, नारायण राणे, हिंदूराव कांबळे, दौलती राणे, निवृत्ती मिसाळ, बापू निकम,मारूती पाटील, अनिता बागवे, राजश्री कुंभार, शांता राणे यांच्यासह गिरणी कामगार, पेन्शनर, महिला उपस्थित होत्या. काशिनाथ मोरे यांनी आभार मानले.

आर्थिक संस्थांची वसुली पथके दारात…
कर्जदार अंडरग्राउंड…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सहकारी बँकांसह विविध आर्थिक संस्थांना आर्थिक वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर कर्ज वसुलीचे वेध लागले आहेत. जास्तीत जास्त कर्ज वसुली करण्याच्या उद्देशाने बँकेचे अधिकारी व कर्मचारी कर्जदारांना भेटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु एकाच वेळी अनेक संस्थांकडून कर्ज उचललेली व कर्जफेडीची क्षमता नसणारी मंडळी या तगाद्याला कंटाळून अंडरग्राउंड (?) झाली आहेत. अशा मंडळींचा शोध घेताना अधिकारी वर्गाची चांगलीच दमछाक होत आहे.

२० ते २२ दिवसांवर आर्थिक वर्ष समाप्तीचा कालावधी आला आहे. सीडी रेशो सुस्थितीत आणणे, कर्ज थकबाकी कमी करणे, एन.पी.ए.चा धोका टाळणे या दृष्टीने आर्थिक संस्थांची ३१ मार्चपूर्वी कर्ज वसुली करण्याची संधी आहे.

यामुळे बँकांसह पतसंस्था व विविध आर्थिक संस्थांची कर्ज वसुली करण्याच्या दृष्टीने कर्मचारी वर्ग कामाला लागला आहे. कर्जदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कांही कर्जदारांनी अनेक संस्थांची कर्जे उचल केली असल्याने सर्वच संस्थांचा वसुलीचा तगादा मागे लागल्याने घरी रहाण्यापेक्षा बाहेर फिरून दिवस काढण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. तर काही मंडळींचे मोबाईल ‘आऊट ऑफ कव्हरेज’ लागत आहेत. अशा कर्जदार मंडळींचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसुली करणे हे मोठे आव्हान आर्थिक संस्थांसमोर उभे राहिले आहे.

ई-चलन दंडाविरोधात बस व्यावसायिक आक्रमक; नियमांमध्ये बदलाची मागणी


उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून बस व्यवसायावर आधीच विविध प्रकारचे कर लावले जात असल्याने बस व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यात भर म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ई-चलनद्वारे अन्यायकारक पद्धतीने दंड आकारला जात असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेने केला आहे.
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे. ई-चलनाद्वारे आतापर्यंत आकारण्यात आलेले सर्व दंड तात्काळ रद्द करावेत व नव्याने नियमावली तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बसची ६० सीट मर्यादा असल्यास ती किमान ५० टक्क्यांनी वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय जागोजागी फोटो काढून दंड आकारण्याची पद्धत तात्काळ बंद करावी, ५० टक्के आगाऊ दंड भरण्याची सक्ती रद्द करावी, दंड वसुलीचा महसुली दृष्टिकोन थांबवावा तसेच रोड टॅक्स व टोल अशा प्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून बस व्यावसायिकांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे व प्रदीप राठोड, संदेश रायकर यांनी हे निवेदन दिले.

कचरा मत फेको…
आता पोलीसच करताहेत समुपदेशन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कचरा टाकणारी मंडळी थेट पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातच कचरा टाकू लागली असल्याने असे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी पुढाकार घेऊन आजूबाजूच्या वस्त्यांमधील रहिवाशांना कचरा टाकू नका असे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. परंतु नगरपंचायतीकडून कचरा उठावच केला जात नसेल तर तो घरी ठेवून यायचा का ? असा प्रश्नही आता नागरिकांना पडू लागला आहे एकतर बाहेर कचरा टाकू दिला जात नाही व घरातून कचऱ्याची उचल केली जात नाही अशा परिस्थितीमध्ये या कचऱ्याचे नेमके करायची तरी काय हा सवाल मात्र सध्या अनुत्तरीत आहे.

एकंदर शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे हे निश्चित.

साळगाव बंधाऱ्याचा मधला भाग गायब...


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – पेरणोली मार्गावरील साळगाव बंधारा दिवसेंदिवस धोकादायक बनू लागला असून या बंधार्‍याचा पाया व वरील स्लॅबमधील भाग कोसळला असल्याने दिवसेंदिवस हा बंधारा अधिकच धोकादायक बनू लागला आहे. सुमारे १६ वर्षानंतर साळगाव येथील यात्रा होत असून बंधाऱ्याची झालेली दुर्दशा व रस्त्याचे लांबलेले काम यामुळे साळगाव ग्रामस्थान समोर यात्रेच्या कालावधीत मोठा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.


कौतुकास्पद…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोवाडे तालुका आजरा येथील कु. भक्ती सुभाष हुंदळेकर तिची महा लोको रेल्वे मध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. खडतर परिश्रमातून अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत भक्तीची ही झालेली निवड निश्चितच कौतुकास्पद असल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

पेद्रेवाडीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेद्रेवाडी ता.आजरा येथील कै. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. संस्थापक कै. केदारी रेडेकर यांच्या २८ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १०) ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत इ. सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याध्यापक सुनील चव्हाण यांनी केले आहे.

आज रवळनाथ कॉलनीत खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा

मराठा प्रतिष्ठान व रवळनाथ कॉलनी तरुण मंडळ आजरा यांच्या वतीने होळी महोत्सवानिमित्त आज शनिवारी रात्री आठ वाजता खुल्या रेकॉर्ड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे सात हजार, चार हजार, तीन हजार, दोन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीकरीता अतुल पाटील/९९६०२८२१४१ व सतीश बामणे/ ९८९०१८५८६८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गजरगाव येथे आज क्रिकेट स्पर्धा

रंगपंचमीनिमित्त गजरगाव येथे भव्य ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आज शनिवार दिनांक ७ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३००१/-, २००१/- व १००१/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी संताजी भिऊंगडे व साईराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग

♦ दिनांक : ७ मार्च २०२६
♦ वार : शनिवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : चतुर्थी तिथी (रात्री ०७.१७ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
♦ नक्षत्र : चित्रा नक्षत्र (सकाळी ११.१५ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
♦ योग : ध्रुव योग (८ मार्च सकाळी ०७.०३ पर्यंत)
♦ करण : बलवा करण (रात्री ०७.१७ पर्यंत)
♦ चंद्र राशी : तूळ राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ९.५२ ते सकाळी ११.२१ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२६ ते दुपारी ०१.१३
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५५
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४५
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

शहाजी देसाई यांचे निधन… पंधराव्या वित्त आयोगाची बिले तातडीने अदा करा…. पंचायत समिती सभेत सूचना… किटवडे येथे ३ टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!