सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५


गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या : नागेश यमगर
उत्तूर येथे मंडळांची बैठक

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा वार्ताहर
डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याबरोबरच शासनाच्या नियम व अटीच्या अधिन राहून गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यांसाठी पोलिसांना मंडळांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन आजऱ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी उत्तूर ता. आजरा येथील गणेश उत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते
यावेळी बोलताना यमगर म्हणाले ,गणेश उत्सव मंडळ यांनी डॉल्बी मुक्त व पारंपारिक वाद्याच्या वापर करावा, गणेश मूर्ती लहान व आकर्षक असावी. सर्व प्रकारच्या परवानगी घ्यावयाच्या आहेत रहदारीस/वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.गणेश मूर्ती जवळ २४ तास २ स्वयंसेवक हजर ठेवावे. सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये. आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ, फोटो व्हायरल झालेला आढळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणेस संपर्क करावा. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा मिरवणूकीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनी तीव्रता व वेळेबाबत निर्देशांचे पालन करावे.
यावेळी स्वागत महेश करंबळी यांनी केले . संदेश रायकर, संजय गुरव, सुहास पोतदार , प्रमोद तारळेकर , संदेश रायकर , अजित उत्तूरकर , प्रमोद गुरव , विशाल उत्तूरकर , सुधाकर हुले आदीसह मंडळाचे कार्यकर्ते, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

मलिग्रे विकास सेवा संस्थेत परिवर्तन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील मलिग्रे विकास सेवा संस्थेतील बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडीत करीत झालेल्या निवडणूकीमध्ये भावेश्वरी शेतकरी विकास आघाडी आठ उमेदवारांच्या विजयासह सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली आहे. या आघाडीचे अशोक शिंदे, संतोष चौगले, शंकर जाधव, शिवाजी निऊंगरे, चंद्रकांत बुगडे, विश्वास बुगडे, बाबू सावंत, हिराबाई ईक्के हे उमेदवार विजयी झाले.
रवळनाथ ग्रामविकास आघाडीला उमेदवार दशरथ पारदे, शिवाजी गूरव, चाळू केंगारे, कमल बुगडे व बिन विरोध आलेले मारूती गाडीवड्डर या पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सुजय येजरे यानी काम पाहिले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळी आजरा कारखाना संचालक व आघाडी प्रमुख अशोक तर्डेकर यांनी ही परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच गजानन देशपांडे, दत्ता परीट, किशोर जाधव, शिवानंद आसबे, राऊ बुगडे, गणपती भणगे, दिलीप बुगडे, आनंदा बुगडे,सदाशिव मानगावकर, प्रकाश सावंत, सुनिल निंऊगरे सचिन सावंत याच्यासह मुंबईकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
विजयानंतर भावेश्वरी विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

उत्तूरच्या मुलींचा जिल्हास्तरावर योगासनात डंका ; स्वरा, नव्या, अवनीचे घवघवीत यश

उत्तूर : मंदार हळवणकर
इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया योगासन फेडरेशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तूरच्या योगदीप स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व गाजवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वरा गोडसे, नव्या देवार्डे व अवनी देसाई या तिघींच्या प्रभावी सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली.१४ वर्षांखालील वयोगटात हॅन्ड बॅलन्स प्रकारात स्वरा विक्रम गोडसे हिने उत्कृष्ट संतुलन व नियंत्रण दाखवत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. नव्या विनायक देवार्डे हिने पारंपरिक योगासन प्रकारात दुसरा क्रमांक पटकावला, तर रिद्धीमिक योगासन प्रकारात अवनी अभिजीत देसाई हिने दुसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे स्वरा गोडसे व नव्या देवार्डे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींना योगदीप अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
उत्तूर सारख्या ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोश्रातवाडीच्या नरसिंह दुध संस्थेत सत्तारूड आघाडी विजयी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोश्रातवाडी ता. आजरा येथील नरसिंह दुध संस्थेची सन २०२५-३० ची निवडणूक सत्ताधारी श्री. रवळनाथ नरसिंह स्वाभिमानी आघाडीने ९ पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला.
विजयी उमेदवार –
सर्वसाधारण प्रवर्ग- गोविंद नारळकर, संभाजी दत्तू नारळकर, अरूण पाटील, सुरेश पाटील,संभाजी राजाराम, या प्रवर्गातून विरोधी आघाडीचे संभाजी संत्तू नारळकर हे एकमेव उमेदवार निवडून आले. तसेच महिला राखीव प्रवर्गामध्ये कल्पना कनुकले शशिकला शिंदे भटक्या विमुक्त जाती प्रवर्गमधून नामदेव पाटील विजयी झाले.
सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व जयराम संकपाळ, प्रा. तानाजी राजाराम, भैरु पाटील, बाबुराव राजाराम, भागोजी पाटील, संतराम शिंदे, जानबा पाटील आदींनी केले.
विजयानंतर सत्ताधारी मंडळींच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई मिळावी…
सुळेरान ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामपंचायत सुळेरान व ग्रामपंचायत किटवडे या हद्दीतील नदीच्या दोन्ही तीरावर असणाऱ्या शेतीपिकांचे १५ मे पासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावरील व डोंगराळ जमिनी असल्याने संपूर्ण पिकांचे कुजून व पाण्यात बुडून नुकसान झाले आहे. ऊस, भात व नाचना या पिकांचे प्राधान्याने नुकसान झाल्यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज फेडताना शेतकरी अडचणीत येणार आहे. पालकमंत्र्यांनी कृषीसह संबंधित विभागांना झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे सुळेरान ग्रामपंचायत ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी सरपंच शशिकांत कांबळे, उपसरपंच जयश्री पाटील, आजरा कारखाना संचालक गोविंद पाटील, रामचंद्र पाटील, तानाजी जाधव, जयसिंग पाटील बाबुराव पाटील, बावतीस बारदेस्कर, निवृत्ती यादव, भास्कर पाटील, दीपक पाटकर, हणमंत खरुडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञान कथाकथन स्पर्धेत उत्तूर विद्यालयाचे यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी विज्ञान विज्ञान परिषद गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान कथादिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या विज्ञान कथाकथन स्पर्धेत उत्तूर विद्यालय, उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .
यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान कथा सादर केल्या. डॉ. अविनाश जोशी, सौ. विशाखा जोशी, श्री. विनय पाटील यांनी विज्ञानकथेचे अभिवाचन व मार्गदर्शन केले.
यशस्वी विज्ञानकथा वाचन करणाऱ्या विभावरी शिंदे ( वि. दि. शिंदे हायस्कूल ) हिने प्रथम क्रमांक, ज्योती परसू नाईक( उत्तूर विद्यालय,उत्तूर ) हिने द्वितीय क्रमांक तर श्वेता मारुती कांबळे (उत्तूर विद्यालय, उत्तूर ) हिने तृतीय क्रंमाक ,प्राजक्ता प्रवीण देसाई , शीतल विलास गोडसे ( उत्तूर विद्यालय, उत्तूर) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
मुख्याध्यापक श्री.एस.के.डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस.के.नेर्ले यांनी प्रास्ताविक तर श्री. ए. जे. हराडे यांनी आभार मानले.
यावेळी बी.जी.काटे, विश्वनाथ धूप, अरुण हावळ,.संजय घाटगे, संदीप जोशी.सोनाली पाटोळे, अलका शिंदे आदी उपस्थित होते . एस. डी. पद्मनावर, बसाप्पा आरबोळे यांचे मार्गदर्शन लाभले .

निधन वार्ता
अलका हरळकर

मडिलगे ता. आजरा येथील अलका सदाशिव हरळकर ( वय ५१ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे.


