रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४




जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…
महाविकास आघाडीची गलबते भरकटली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसह तरुणाईने मतांची त्सुनामी आणल्याने महाविकास आघाडीची गलबते अक्षरश: भरकटली गेली. जिल्ह्यात एकही जागा महाविकास आघाडीला मिळाली नाही. अत्यंत धक्कादायकरीत्या मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचे दूरगामी परिणाम आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांसह ठिकठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जाणवणार आहेत. जिल्हा स्तरावरील संस्थांमध्येही फेरबदल होण्याचे संकेत आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय निकाल पुढीलप्रमाणे –
चंदगड विधानसभा मतदारसंघ
शिवाजी सटुप्पा पाटील ८३६६३
राजेश नरसिंगराव पाटील ५९४७५ मंदाताई कुपेकर ४६४८७
२४१७८ मतांनी अपक्ष शिवाजीराव पाटील विजयी
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
प्रकाश आबिटकर १,४२,१०५
के. पी. पाटील १,०४,२०८ ए.वाय. पाटील १८८९१
शिंदे सेनेचे प्रकाशराव आबिटकर ३७८९७ मतांनी विजयी
कागल विधानसभा मतदारसंघ
हसन मुश्रीफ १,४३,८२८
समरजीतसिंह घाटगे १,३१,९४९
राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे हसन मुश्रीफ ११८७९ मतांनी विजयी
कोल्हापूर दक्षिण
अमल महादेव महाडिक १,४७,०४४
ऋतुराज पाटील १,२८,९१३
१८१३१ मतांनी भाजपाचे अमल महाडिक विजय
करवीर विधानसभा मतदारसंघ
चंद्रदीप नरके १,३३,५४५
राहुल पाटील १,३१,०६९
२४७६ मतांनी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके विजय
कोल्हापूर उत्तर
राजेश क्षीरसागर १,१०,४७०
राजेश लाटकर ८० हजार ७९८
२९६७२ मतांनी शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विजयी
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
विनय कोरे १,३६,०६४ सत्यजित पाटील १,००,०११
जनसुराज्यचे विनय कोरे ३६०५३ मतांनी विजयी
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
अशोकराव माने १,३३,६२७
राजू बाबा आवळे ८७२९९
सुजित मिणचेकर २४७६७
जनसुराज्याचे अशोकराव माने ४६३२८ मतांनी विजयी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
राहुल प्रकाश आवाडे १,३१,९१९
मदन कारंडे ७५१०८
भाजपाचे राहुल आवाडे ५६ हजार ८११ मतांनी विजयी
शिरोळ विधानसभा मतदारसंघ
राजेंद्र पाटील यड्रावकर १,३३,७३१ गणपतराव पाटील ९२,८४२
सुहास संभाजी पाटील २८४१०
राजेंद्र पाटील यड्रावकर ४०,८८९ मतांनी विजयी
सर्वात कमी मतांनी (२४७६) चंद्रदीप नरके हे विजयी झाले तर सर्वात जास्त मतांनी(५६८११) राहुल आवाडे हे विजयी झाले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा पुन्हा एकदा पराभव केला आहे. सलग सहा वेळा कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांना १ लाख ४३ हजार ८२८ मते मिळाली तर समरजितसिंह घाटगे यांना १ लाख ३१ हजार ९४९ मतांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर सातापराव सोनाळकर यांना २३१७ मते मिळाली.
यावेळी मुश्रीफ यांना शरद पवार यांनी टार्गेट केले होते. परंतु मंत्री मुश्रीफ यांनी आपल्यासमोर नेटके आव्हान उभे राहणार याचे भान ठेवत व्यूहरचना केली. येतील त्याला सोबत घेत ते जोडण्या लावत गेले. यामध्ये त्यांना यशही मिळाले. प्रचंड कामाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एक वेळ विजयापर्यंत मजल मारली.
आमदार आबिटकर यांची ऐतिहासिक हॅटट्रिक

तरुणाई मधील नेटके व विकासाभिमुख नेतृत्व अशी गेल्या दहा वर्षाच्या कामातून बिरुदावली मिळवलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात सर्वच नेते एकवटल्याने यावेळी त्यांच्या विजयाबाबत प्रश्नचिन्ह होते. परंतु नेते एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे अशी अवस्था या मतदारसंघात झाल्याने आबिटकर यांनी प्रतिस्पर्धी उ.बा.ठा.चे के. पी. पाटील यांच्यावर तब्बल ३८ हजार मतांनी मात केली. बंधू प्रा.अर्जुन आबिटकर व त्यांच्या सहका-यांनी राबवलेली कौशल्यपूर्ण प्रचार यंत्रणा आबिटकर यांच्या पथ्यावर पडली.
स्थानिक उमेदवार असतानाही राधानगरीतून त्यांना मिळालेले मताधिक्य निश्चितच विरोधकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.
शिवाजी भाऊ ठरले जायंट किलर

गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना निसटत्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवाजीराव पाटील यांनी यावेळी मात्र प्रचंड यंत्रणा राबवली. कोणतेही पद नसताना गेली पाच वर्षे ते चंदगड विधानसभा मतदारसंघात मशागत करत राहिले.
यावेळी सर्व ताकतीने ते निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांची व प्रचार यंत्रणेची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. इनाम सावर्डे सारख्या छोट्या गावातून त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली. गेली पाच वर्षे विविध विकासकामे व कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला वाढवलेला सर्वसामान्यांची संपर्क या निवडणुकीत त्यांच्या कामी आला. तब्बल ८३,६५३ मते मिळवत विद्यमान आमदार राजेश पाटील यांना पराभूत केले. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर तिसऱ्या क्रमांकावर गेल्या.
आजऱ्यात जल्लोष
आमदार प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे तिघेही अनुक्रमे आजरा उत्तूर व कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आघाडीवर राहिले. निकालाचा कल जस- तसा बाहेर येईल तसा आजरेकरांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. तालुक्यात सर्वत्र गुलालाची उधळण व आतषबाजी करताना कार्यकर्ते दिसत होते.
अशोकअण्णा यावेळी यशस्वी…
स्वतः निवडणूक रिंगणात न उतरता आपल्या विचारांच्या उमेदवारांना निवडून आणण्यात अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यशस्वी झाल्याचे निकालानंतर दिसत होते.
अनेक प्रश्नांची मालिका...
समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक असताना लागलेले हे निकाल महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीचा उमेदवारांना मोठी रसद मिळणार हे देखील आता स्पष्ट झाले आहे.









