मंगळवार दि. १६ डिसेंबर २०२५


उत्तूर पाठोपाठ लाकूडवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या, नऊ मेंढ्या ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर परिसरात लांडग्यांच्या कपाच्या हल्ल्यात तब्बल पाच शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लाकूडवाडी (ता. आजरा) येथील अर्जुन शिवगोंडा पाटील यांच्या शेतातील गोठ्यात दुपारच्या सुमारास लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व नऊ मेंढ्या ठार झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
नेहमीप्रमाणे जनावरांना चारा घालून अर्जुन पाटील गोठ्याला लागून असलेल्या घरात जेवणासाठी गेले असता गोठ्यातून शेळ्यांचा मोठमोठ्याने आवाज आल्याने अर्जुन पाटील गोठ्याकडे गेले.
तेव्हा लांडगा गोठ्यातून पळून गेला. गोठ्याची पाहणी केली असता शेडमधील दोन शेळ्या व नऊ मेंढ्या मृतावस्थेत दिसून आल्या. बिबट्यानंतर आता लांडग्यांपासून पशुधन जपण्याचे आव्हान शेतकरी वर्गासमोर आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत याने आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

वीजबील वाटपात गोंधळ : उत्तूर येथे ग्राहक, कर्मचारी दोघेही त्रस्त…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्याची वीजबीले वेळेत न मिळाल्याने वीजग्राहकांना दंडासह बीले भरण्याची वेळ आली आहे. अजूनही कांही भागात बीलांचे वाटप झालेले नाही. याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून, महिनाअखेरीस वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना ग्राहकांचा रोष पत्करावा लागणार आहे.
याबाबत वीज वितरण कार्यालयाकडून अद्याप स्पष्ट खुलासा मिळालेला नाही.
उत्तूर १ विभागात अंदाजे २५०० वीजग्राहक आहेत. येथे मिटर रिडींग दर महिन्याच्या १६ तारखेपासून सुरू होते. मोबाईलवर बीलाचा संदेश व प्रत्यक्ष बील पाच ते सहा दिवसांत मिळणे अपेक्षित असते. महिन्याच्या ११ तारखेपर्यंत बील भरता येते. त्यानंतर थकीत बीलांसाठी महावितरण कर्मचारी वसूलीचे काम करतात. मिटर रिडींग, बील तयार करणे व बील वाटपाचे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया सुरळीत सुरू होती. मात्र सध्या सुमारे ८० टक्के स्मार्ट मिटर बसल्याने रिडींगचे मोठे कमिशन बंद झाले आहे. बील वाटपासाठी अत्यल्प म्हणजे सुमारे १ रुपया प्रति बील कमिशन असल्याने ठेकेदाराने बील वाटपास नकार दिल्याचे समजते.
यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बीले वाटण्यास सांगितले. मात्र घरे माहिती नसणे तसेच दैनंदिन कामातून पुरेसा वेळ न मिळाल्याने बीलांचे गठ्ठे कार्यालयातच पडून राहिले आहेत. खाजगी व्यक्तीही उपलब्ध होत नसल्याने अडचण अधिक वाढली आहे. अधिकारीही याबाबत अपेक्षित तत्परता दाखवत नसल्याची चर्चा आहे.
आता उशिरा बील मिळाले तरी ग्राहकांना दंडासकट रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.

धनादेश न वटल्याने कर्जदारास तीन महिन्यांचा कारावास
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथील श्री भावेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील चंद्रकांत लक्ष्मण सावंत यास तीन महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्र. २, गडहिंग्लज यांनी दिला.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित धनादेशाची रक्कम एका महिन्याच्या आत अदा न केल्यास आरोपीस पुन्हा तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. एम. एल. शेख यांनी काम पाहिले.

सर्जेराव देसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील श्री. सर्जेराव ईश्वर देसाई ( वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पुणे स्थित सायनास टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे डेप्युटी मॅनेजर वैभव देसाई यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुले , मुलगी , सून आणि नात असा परिवार आहे.
इंदुबाई गाडे

भादवण ता. आजरा येथील इंदुबाई महादेव गाडे (वय ७५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
मुंबईस्थित यशवंत गाडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

आजऱ्यात शाळा बचाव आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षणाबाबत सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप करत शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात आजरा येथील तहसील कार्यालया समोर शाळा बचाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सरकारी शाळा हळूहळू बंद केल्या जात असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षणाचा मूलभूत हक्क धोक्यात आला आहे हे धोरण तात्काळ मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे .
गुरव यांच्या या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
शिरसंगी येथील ऐतिहासिक वारसा नव्या पिढीने जपावा : जॉन पार्कर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगभरात हजारो वर्षांची झाडे आहेत. त्याचे उत्तमरित्या संगोपन केले जात आहे. त्याचपध्दतीने शेकडो वर्षांचे वृक्ष भारतात आढळतात. यामध्ये शिरसंगीतील महाकाय वटवृक्ष आहे. या वृक्षाचे जतन, संवर्धन व संगोपन उत्तम पध्दतीने झाले आहे. येथील ऐतिहासिक वारसा नव्या पिढीने जपावा. असे आवाहन इंग्लडच्या आर्बोरिकल्चरल असोशिएशन मुख्यकार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांनी केले.
जॉन पार्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरसंगी (ता. आजरा) येथील महाकाय वटवृक्षाला भेट दिली व माहीती घेतली. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, वृक्षसंवर्धन तज्ञ वैभव राजे, आझादी हिंद राष्ट्रीय ट्रस्ट व आझाद हिंद नेचर आर्मीचे संस्थापक आध्यक्ष राहूल मगदूम, शिवाजी विद्यापीठ उद्यान अधिक्षक अभिजीत जाधव, आझाद हिंदचे सुनिल, मुळे, गौरी निंबाळकर, गटविकास अधिकारी सुभाष सावंत त्यांच्या समवेत होते.
आझादी हिंद राष्ट्रीय ट्रस्ट व आझाद हिंद नेचर आर्मी यांच्यावतीने दौऱ्याचे आयोजन केले होते.
सी. आर. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जॉन पार्कर यांनी वटवृक्षाची पहाणी केली व ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी हा एतिहासिक वारसा जपावा. आवश्यक ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगीतले. ग्रामस्थ व कोल्हापूरकरांनी उत्तमरित्या पाहुणचार केल्याचेही सांगीतले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. यादव म्हणाले, हा पर्यावरणाबरोबर ग्रामसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. तो जपण्याचे काम प्रत्येकाने करावे. विस्तार अधिकारी श्री. कुंभार, संतोष चौगले, पांडुरंग टक्केकर, सरीता कुंभार, सुमन होडगे, सर्जेराव कांबळे, बाबूराव बुडके, भिमराव सडेकर, दत्तात्रय यल्गार, मंडल अधिकारी सुंदर जाधव, श्री. कुरणे, तलाठी समीर जाधव आदी उपस्थित होते.

संस्कारमय शिक्षण हीच काळाची गरज – श्री. आय. के. पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
“संस्कारमय शिक्षण हीच काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अत्यावश्यक आहे” असे प्रतिपादन आय.के.पाटील यांनी केले. येथील रोजरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कार, शिस्त व सामाजिक भान जोपासावे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमात जगाच्या अभ्यासाची खिडकी म्हणून इंग्रजी भाषेची आवश्यकता या विषयावर प्रमुख वक्ते श्री. पी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा ही जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देणारी प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांच्या हस्ते सन १९८८ च्या बॅचच्या वतीने व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला जिव्हाळा व योगदान अधोरेखित झाले.
व्यासपीठावर श्री. अल्बर्ट डिसोझा, श्री. जॉन्सन डिसोझा, श्री. प्रकाश करवाल्हो, फादर मेल्विन पायस, प्राचार्य फादर अँथनी डिसोझा, मुख्याध्यापक श्री. मनवेल बारदेस्कर, AARSA चे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी व हितचिंतक तसेच श्री. संदीप सासूलकर, श्री. शिवाजी पारळे, नवनियुक्त पालक-शिक्षक समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतनृत्याने झाली. त्यानंतर स्वागत व परिचय मुख्याध्यापक श्री. मनवेल बारदेस्कर व श्री. विजय केसरकर यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांची भाषणे श्री. आय. के. पाटील व श्री. जॉन्सन डिसोझा यांनी केली.
वार्षिक अहवालाचे वाचन मुख्याध्यापक श्री. मनवेल बारदेस्कर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री. विजय केसरकर यांच्या हस्ते पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच सर्व शिक्षक पालकांच्या सहकार्याने खाऊ खेळाचे स्टॉल उभारून आनंद उत्सव उत्साहात साजरा केला.
या स्नेहसंमेलनाचे यशस्वितेसाठी व्यवस्थापक फादर मेल्विन पायस, प्राचार्य फादर अँथनी डिसोझा, मुख्याध्यापक श्री. मनवेल बारदेस्कर, पर्यवेक्षक विजय केसरकर,सांस्कृतिक समिती सदस्य – सौ. लक्ष्मी पाटील,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक शिक्षक प्रतिनिधी व सदस्य, पी.पी.सी सदस्य, व हितचिंतक यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे आभार श्रीमती एलिझाबेथ फर्नांडिस व श्री. विजय केसरकर यांनी केले. सूत्रसंचालन सहभागी विद्यार्थी – विद्यार्थिनी, सौ. सांचीझ डिसोझा व श्री. आशिष फर्नांडिस यांनी केले.
छाया वृत्त

पारेवाडीच्या कन्या डॉ. सौ .सुनंदा सुभाष शेळके ललित लेख विभाग ‘ प्रतिमेच्या पारंब्या ‘ या ललित लेख पुस्तकाला साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाड ता.चंदगड वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती पारेवाडी – पेठेवाडी यांच्यावतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ .तनुजा सागर कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ए.के पावले ,सौ .विजया पावले .दीप्ती यादव, डॉ. सुभाष शेळके , महादेव देसाई , गडहिंग्लजचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष विभुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


