mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्याभारतमनोरंजनराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार  १६ नोव्हेंबर २०२५

नगराध्यक्ष पदासाठी
अबूताहेर तकीलदार यांचा अर्ज दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी माजी पंचायत समिती व माजी ग्रामपंचायत सदस्य तालुका खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक अबूताहेर तकीलदार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, कारखाना संचालक अनिल फडके, रणजित देसाई व संजय भाऊ सावंत उपस्थित होते.

अबूताहेर तकीलदार हे राजकीय पटलावर ‘जायंट किलर’ म्हणून ओळखले जातात. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या तालमीत तयार झालेले तकीलदार यांनी राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यासह तालुक्यातील राजकारण ज्ञात असलेली व्यक्ती म्हणून पाहिले जाते.यामुळे वरिष्ठ नेत्यांची जवळीकता आहे.राजकारणाची गणिते मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. जातपात न पहाता सर्वांसाठी समाजकारण करण्यात त्यांना आवड आहे यामुळेच ते अनेक शिखर संस्थांमध्ये काम केले आहे.अन्याया विरुद्ध बेधडक बोलणारी व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत.व्यवसायातून अनेक धर्मीयांचा संबंध येतो. ते इतर धर्मीयांच्या धार्मिक असो वा वैयक्तिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.आपल्या बोलण्यातून समोरील कोणत्याही अधिकाऱ्यांवर छाप पाडण्याची कला त्यांना अवगत आहे.अभ्यासू वृत्तीमुळे प्रशासना समोर प्रश्न मांडता येतात.

आजरा पंचायत समितीचे ते सदस्य होते.या माध्यमातून त्यांनी अनेक शासकीय योजना पोहोचवल्या आहेत.आजरा ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते त्यावेळी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.त्यांचा अनुभव व कामाची पद्धत पहाता त्यांना आजरा साखर कारखान्याचे संचालक, आजरा तालुका संघ या शिखर संस्थावर काम करण्याची संधी मिळाली

आजही अबूताहेर तकीलदार गडहिंग्लज बाजार समितीचे विद्यमान सदस्य आहेत.शहीद अब्दुल हमीद सेवा संस्थेचे चेअरमन आहेत.प्रशासन हाताळण्याचा अनुभव आहे.

आजरा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत.या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे असे मत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आजरा नगरपंचायतीकरीता शनिवारी ३० उमेदवारी अर्ज दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीकरिता शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २७ असे एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी ५४ असे एकूण ६३ अर्ज दाखल झाले आहेत.रविवारीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी संजय सावंत,
आबूताहेर तकीलदार,
मौजूदअहमद माणगावकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.

नगरसेवक पदासाठी…

प्रभाग एक मधून अश्विनी चव्हाण

प्रभाग दोन मधून पूजा डोंगरे

प्रभाग तीन मधून रहिमतबी खेडेकर

प्रभाग चार मधून नदीम मुल्ला

प्रभाग पाच मधून निशाद चाँद, इरम चाँद, तस्मिन सय्यद

प्रभाग सहा मधून सरोज बिरजे

प्रभाग आठ मधून असिफ सोनेखान,इकबाल शेख, सुहेल काकतीकर, अबूबक्कर पठाण

प्रभाग नऊ मधून यास्मिन लतीफ,रुमाना तकीलदार

प्रभाग दहा मधून सनाऊला चाँद, उमेद चाँद, लहू कोरवी, मेहताब आगा

प्रभाग बारा मधून समीर तकीलदार,समीर गुंजाटी

प्रभाग चौदा मधून अभिषेक शिंपी

प्रभाग सोळा मधून नाजमीन लष्करे, बानू तळगुले,मीनाक्षी पुजारी असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

हत्ती संगोपन केंद्र घाटकरवाडी येथे उभारण्याच्या हालचाली सुरू


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यासह सिंधुदुर्गमध्ये गेली पंधरा वर्षे हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. आजरा तालुक्यात तर अनेक शेतकऱ्यांनी हत्तीच्या उपद्रवाला वैतागून शेतजमिनी कसणे बंद केले आहे. हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे हत्ती संगोपन केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. स्थानिक ग्रामस्थांनी याला विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी सरकारकडे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी हत्ती ग्राम घाटकरवाडी येथे उभारण्या संदर्भातला प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे आजरा तालुक्यातील पर्यटन विकसित होण्यास मदत होणार आहे.

हत्तींकडून जीवित हानी व पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाचे करोडो रुपये नुकसान भरपाई पोटी खर्च होत आहेत. नुकसानग्रस्त भागातून गेली कित्येक दिवस हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

चार वर्षांपूर्वी हत्ती संगोपन केंद्राचा प्रस्ताव पुढे आला होता. यासाठी तत्कालीन आमदार व सध्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. परंतु सदर केंद्राबाबत फारशी माहिती नसल्याने विरोधझाला होता. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांची शिमोगा येथील हत्ती संगोपन केंद्रास भेट घडवून आणण्यात आली होती.

आता वनविभागाने या सर्व पार्श्वभूमीवर हत्ती ग्राम/हत्ती संगोपन केंद्र उभा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला असल्याने याबाबत लवकरच पुढील हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

आजरा-वझरे रस्त्यावर बिबट्याची दहशत…
कॅमेऱ्यात कैद

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा-वझरे रस्त्यावर पेरणोलीजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. संबंधितांनी त्याला मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्तही केले आहे.

गेले कित्येक दिवस तालुक्यात पट्टेरी वाघ व बिबट्यांचा वावर सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी हाजगोळी, बिबट्याच्या वावराच्या खुणा जाणवल्या होत्या.
सध्या सुगीमुळे भात कापणी व मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. ऊसतोड यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.

शुक्रवारी पेरणोलीतील कामे आटोपून काही जण ट्रॅक्टरने वझरेकडे निघाले होते. ‘चदिकरचा बांबर’ नावाच्या शेतापासून काही अंतरावर विबठ्या ट्रॅक्टरच्या समोर आला. चालकाने ट्रॅक्टर बंद केला. पुढे तो शेती पिकात निघून गेला.

तालुक्यातील जंगले सध्या समृद्ध झाल्याने धनगर वाड्यावर पट्टेरी वाघाचा तर जंगला शेजारील शेती पिकांमध्ये बिबटे, गवे, रान डुकरे यांचा वावर वाढला आहे. हत्ती तर तालुकावासीयांच्या पाचवीला पुजला आहे.

भौगोलिक उपदर्शनामुळे घनसाळ तांदळाला जगभरात मागणी : कृषी अधिकारी जालिंदर पांगरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भागोलिक उपदर्शन (जीआय) मुळे घनसाळ तांदळाला जगभर मागणी होत आहे. दर्जेदार व चांगल्या प्रतीचे तांदूळ ग्राहकांना देण्यासाठी घनसाळ उत्पादकांनी अधिकृत उपभोक्ता ॲथोराईजड युजर) व्हावे. असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.

दाभिल (ता. आजरा) येथील घनसाळ शेतीला त्यांनी भेट देवून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी कृषी उपसंचालक नामदेव परीट, स्मार्टचे नोडल अधिकारी विजय माईनकर, गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील व दाभिलचे सरपंच युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पांगरे म्हणाले, घनसाळ हे सुवासिक देशी वाण आहे. याचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभाग गेली वीस वर्ष कार्यरत आहे. घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांनी वीस वर्षापुर्वी घनसाळ संवर्धनाची चळवळ हाती घेतली होती. यामधील दाभिलमधील शेतकरी सहभागी होते. त्यांना बळ देण्याचे काम कृषी विभागाने केले आहे. येथे पिकणाऱ्या आजरा घनसाळ तांदळाला चांगला दर मिळावा यासाठीही कृषीकडून प्रयत्न सुरु आहेत. येथे जो घनसाळ भात पिकेल त्यावर प्रक्रिया करून त्या तांदळाची विक्री करण्यासाठी विक्री केंद्र (आऊट लेट) करण्यासाठी कृषी विभाग सहकार्य करेल. आजरा घनसाळमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. त्यावर कार्यवाही कृषी विभागाकडून कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी उत्तूरचे मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील, स्मार्टचे अधिकारी अक्षय पोवार, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) चे अमित यमगेकर, सहाय्यक कृषी अधिकारी नागेश काळे, उपसरपंच श्रावण वाझे, घनसाळ उत्पादक शेतकरी नामदेव पाटील, कमलाकर पाटील, अशोक पाटील, रवि मुगुर्डेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये बालदिन उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

 

व्यंकटराव शिक्षण संकुलात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

श्री व्ही.एच गवारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये त्यांनी सांगितले. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे असं समजून त्यांनी लहान मुलांवर प्रेम केले म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

श्री.सुनील पाटील व सौ.एस.पी.ढेकळे यांच्यासह यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये ‘बालदिन ‘ साजरा

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई तसेच इ. पाचवी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन कार्य याबद्दल विजय राजोपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले आवडत होती .भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धुरा वाहिली. ते लहान मुलांवर फार प्रेम करत. मुलांमध्ये नेहमी ते रमत असत .त्यांच्या या प्रेमामुळेच देशभर त्यांची जयंती ” बाल दिन’ म्हणून साजरी केली जाते. असे विचार राजोपाध्ये यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक ‘,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

रेंदाळ येथील पर्यटकांकडून आज- यात गोळीबार…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!