mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.२५ फेब्रुवारी २०२६

चैनीसाठी मिळेल ते चोरले…५ आरोपी ३ चोऱ्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चैनीसाठी मिळेल ते चोरून उत्तुर, चिमणे, धामणे वगैरे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या पाच आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. कारवाईत अडकलेल्या या तरुणांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

वझरे येथे चोरी करताना रंगेहात सापडलेल्या संशयितांची पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केल्यानंतर कर्पेवाडी येथील काजू प्रक्रिया उद्योगातील चोरी प्रकरण, चिमणे येथील केबल चोरीचे प्रकरण, वझरे येथील घरफोडी हे गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्वांमध्ये अभिजीत अमृत आरेकर या उत्तुर येथील तरुणाचा सक्रिय सहभाग असल्याचे पुढे आले आहे. याचबरोबर त्याच्या सोबत असणारे दत्तात्रय तुकाराम चव्हाण रा. चिमणे राजवर्धन दत्तात्रय मांढरे रा. कर्पेवाडी, पवन संपत खवरे या. कर्पेवाडी व एका अल्पवयीन मुलाचाही या संगणमताने केलेल्या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे दरम्यान यातील राजवर्धन मांढरे व पवन खवरे यांना जामीन मंजूर झाला आहे. आरेकर याला जामीन मंजूर झाला असला तरीही त्याला दुसऱ्या एका गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

विविध गुन्हे उघडकीस येणार…

आजरा तालुक्यामध्ये भुरट्या चोरांसह विविध चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तूर परिसरातील गुन्ह्यांमध्ये स्थानिक युवकांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. अन्यत्र झालेल्या गुन्हयात स्थानिकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलीस प्रशासनाकडून गुन्ह्यांची माहिती पुन्हा एक वेळ घेतली  जात आहे.

विकास सेवा संस्थांनी विविध क्षेत्रात सहभाग नोंदवण्याची गरज : सुधीर देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

केंद्र व राज्य सरकारने ९७ व्या घटनादुरुस्तीसह विकास सेवा संस्थांबाबत विविध धोरणे अवलंबून सेवा संस्था स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे‌. प्रशिक्षण हा त्याचाच एक भाग आहे. अशावेळी सेवा संस्थांनी केवळ पीक कर्जामध्ये अडकून न राहता विविध क्षेत्रात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक व जि.प. सदस्य सुधीर देसाई यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे संचलित कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या वतीने व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने आजरा येथे विकास सेवा संस्थांचे गटसचिव व संचालक यांच्याकरिता सहकारी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला यावेळी ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी देसाई म्हणाले, गट सचिवांनी चेअरमन व संचालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे . कर्जमाफी बाबत आपण सकारात्मक आहोत, परंतु प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी करण्याची गरज असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपण यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक संस्था सध्या तोट्यामध्ये सुरू असून भविष्यात या संस्था दुसऱ्या संस्थेत विलिनीकरण होण्यापासून रोखण्यासाठी संस्था नफ्यात आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले , सहकारामध्ये आता बदल होऊ लागले आहेत. हे बदल अंगीकारण्याची गरज आहे. केवळ सचिवांनीच नाही तर संचालक मंडळही सुशिक्षित व अपडेट असण्याची गरज आहे. विकास सेवा संस्थां साठी जिल्हा बँकेकडून अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आता संगणकीकरणाचे सखोल ज्ञान सचिवांसह संचालकांना आत्मसात करून घेण्याशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुधीर देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी सहकार विभागाचे अधिकारी जोतीराम बंडगर, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, प्राचार्य एस. टी. पाटील , एस.बी. शिंदे, विक्रम पाटील, संतोष ढोणुक्षे, श्रीधर कुऱ्हाडे, सुभाष चौगुले संजय घाटगे विविध संस्थांची सचिव, संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांना आवरा…

शेतकऱ्यांचे शासनाकडे साकडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हत्ती, गवे, रानडुक्कर, माकडे इत्यादी वन्यप्राण्यांचा उपद्रव आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतपिकाच्या नुकसानिबरोबर शेतकरी स्त्री- पुरुषांवर वाढलेले वन्य प्राण्यांचे हल्ले थांबवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल व वन विभागाकडे केली आहे.

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतीपिकाच्या नुकसानीबरोबर माणसांच्यावरही वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. जंगली प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून जंगला लगतच्या शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. गेली अनेक वर्षे याबाबत वनविभागाकडे सातत्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी निवेदने, अर्ज विनंत्याही केल्या आहेत. पण वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. यावर शेतकऱ्यांचे अनेक मोर्चे, आंदोलनेही झाली पण वनविभागावर त्याचा कांहीही परिणाम झालेला आम्हाला दिसत नाही. या आपल्या असंवेदनशील वृत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मनात वन कार्यालयाविषयी नाराजी तयार झाली आहे.

वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी आपल्या कार्यालय कडून ठोस उपाययोजना होण्याचे गरज आहे, हे होताना दिसत नाही. महामोलाची बियाणे खते खालून शेतकऱ्याने कष्टाने पिक घेतले जाते हे पिक गवे, हत्ती व इतर वन्य प्राणी एका रात्रीत भस्त करून टाकतात, आपल्या कार्यालयाकडून नुकसानभरपाई मिळते पण ती तुटपुंजी आहे त्याचबरोबर ती वेळत मिळत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकरी शेती कसणे सोडून देणेच्या अवस्थेत आहे, शेतकर्यांना उत्पदनाच्या आधारित बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आमच्या शेत जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहची सोय करावी, वरील प्रश्ना संदर्भात ठोस उपाययोजना करण्यास कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

यावेळी श्री. आबासो बाळू पाटील/देवर्डे, श्री. निवृत्ती जानबा कांबळे/ देवर्डे, श्री. जयसिंग शामराव नार्वेकर/ पोळगाव, श्री. शिवाजी जनाबा गिलबिले/वाटंगी, श्री. जानबा महादेव धडाम / वाटंगी, श्री. भिमराव नानासो देसाई/ सिरसंगी,श्री. गुणाजी विष्णू नेवगे/ पोळगाव,श्री. कृष्णा पिलाजी नार्वेकर/ पोळगाव,संभाजी बाळू नार्वेकर /पोळगाव,  उत्तम वसंत नार्वेकर /पोळगाव, सुरेश बाळू दारूगडे/ पोळगाव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


मुळशीच्या शेतकऱ्यांचा आजऱ्यात अभ्यास दौरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आजरा येथे अभ्यास दौरा झाला. आजऱ्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. बांबू लागवडीलाही भेट दिली. यापुढील काळात आजरा तालुक्यासह भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात बांबू लागवड प्रचार व प्रसार करण्याचे ठरले. दरम्यान त्यांनी सिंधुदुर्गचा दारा केला. मालवण येथे हापूस आंबा फळबागेचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालु‌का शेतकरी संघाच्यावतीने दौऱ्याचे आयोजीत केला होता. यामध्ये ३५ शेतकरी सहभागी झाले होते.

आजरा येथे बांबू लागवडीसह स्थानिक माणगा (मेसकाठी) यासह ट्ल्डा, बॅण्डसी व इतर आ‌द्योगिक वापरासाठीच्या जातीची माहीतीही घेतली. बांबू लागवडीला भेट दिली. मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील आंबा बागायतदार प्रकाश कदम यांच्या हापूस आंबा बागेस भेट देण्यात आली. आंबा बागेचे खत, पाणी यांचे व्यवस्थापन, रोग, किडी, हवामान, मोहोर संरक्षण बाजारपेठ याचीही माहीती घेतली. माजी आमदार शरद ढमाले, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समिती सदस्य दगडूकाका करंजावणे, योगेश प्रभु, राहुल पवळे, काजल मोरे, राजेंद्र बांदल, राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश पाटील कौलवकर, बाळासाहेब पाटील कौलवकर प्रक्रिया संघाचे व्यवस्थापक सुभाष बरगे, विलास भोपळे, मुळशी तालुका कृषी आधिकारी हनुमंत खाडे, संघाचे पदाधिकारी भाऊ केदारी, राम गायकवाड, लक्ष्मण निकटे, तुकाराम मरे, दत्तात्रय उभे, गणपतराव सरदेसाई, भैय्या सरदेसाई, आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मुळशी तालुका संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मारणे स्वागत व आभार मानले.

रंगकुंज’मध्ये साकारली कृष्णलीला; संस्कारमूल्यांचा प्रभावी संदेश…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती-शंकर विद्यामंदिर–विद्यालय यांच्या वतीने वार्षिक कला -गुणदर्शन कार्यक्रम ‘रंगकुंज’ उत्साहात पार पडला. यंदाची मुख्य थीम ‘कृष्णलीला’ होती.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते महाभारतातील गीतोपदेशापर्यंतचे प्रसंग २४ नृत्याविष्कार व २ नाट्यप्रसंगांतून प्रभावीपणे सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी यांनी भूषविले. अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांच्या हस्ते झाले. तसेच संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, श्री विनायक करंबळी, सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे व पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली.

संस्कार, कर्तव्यनिष्ठा व उदात्त मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात संस्मरणीय ठरला.

जचे पंचां

♦ दिनांक : २५ फेब्रुवारी २०२६
♦ वार : बुधवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : नवमी तिथी (२६ फेब्रुवारी पहाटे २.४० पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
♦ नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (दुपारी १.३८ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
♦ योग : विष्कुम्भ योग (२६ फेब्रुवारी पहाटे  १.२८ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
♦ करण : बलवा करण (दुपारी  ३.४५ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
♦ चंद्र राशी : वृषभ राशी (२६ फेब्रुवारी पहाटे १.५४ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.५२ ते दुपारी  २.१९पर्यंत
♦ सूर्योदय : सकाळी ७.०२ वा.
♦ सूर्यास्त : सायंकाळी  ६.४१ वा.
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याची कन्या झाली आमदार… आजऱ्यात जल्लोष

mrityunjay mahanews

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!