सोमवार दिनांक १४ एप्रिल २०२५



चाफवडे प्रकरणी चौघे पोलिसांच्या ताब्यात…?
कट रचून मारहाण केल्याचा प्रकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चाफवडे – वाटंगी मार्गावरील उचंगी हद्दीतील हूडे ते कुपटे वसाहत येथे आजऱ्याच्या दिशेने तलाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या विनायक पांडुरंग तेजम या चाफवडे येथील हॉटेल व्यावसायिकास अज्ञात तिघांनी दगड व काठीने मारहाण करून जखमी करत त्यांच्या जवळील मोबाईलसह दुचाकीची चावी लंपास केल्याची घटना मंगळवार दिनांक ८ रोजी घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चाफवडे येथील एका स्थानिक युवा लोकप्रतिनिधीसह कोल्हापूर येथील एक व गडहिंग्लज येथील दोघे अशा तिघांसह एकूण चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तेजम हे आपल्या दुचाकीवरून आजऱ्याच्या दिशेने येत असताना हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल वरून आलेल्या तिघांनी त्यांना कुपटे वसाहती नजिक अडवले. आमच्या बहिणीला तू मेसेज करतोस काय… असे म्हणत आपल्या गाडीतील पेट्रोल संपले असून तेजम यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली. त्याला दगड व काठीने बेदम मारहाण केली आणि विनायक यांच्या जवळील दुचाकीच्या चावीसह मोबाईल घेऊन तिघेजण मोटरसायकल वरून निघून गेले होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी तातडीने भेट देऊन या प्रकरणाचा छडा लावण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची यंत्रणा सक्रिय झाली होती.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्व वैमनस्यातून चाफवडे येथील एका युवा राजकीय कार्यकर्त्याने तेजम याला धडा शिकवण्याच्या दृष्टीने अन्य तिघांच्या मदतीने कट रचून तेजम यांच्या हालचालीवर पाळत ठेवून सदर प्रकार केल्याचे उघडकीस आल्याचे समजते.
गाडी इलेक्ट्रिक… पेट्रोल कुठून देणार…?
या प्रकरणांमध्ये फिर्यादी तेजम यांची गाडी इलेक्ट्रिक असताना सदर गाडी तिघांनी अडवून आपल्या गाडीतील पेट्रोल संपले आहे व तेजम यांच्याकडे पेट्रोलची मागणी करत त्यांच्याशी वाद घातला व त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. मुळातच तेजम यांची गाडी इलेक्ट्रिक असल्याने ते पेट्रोल देणार कुठून आणि त्यांच्याकडेच पेट्रोल मागण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर वेगळ्या पद्धतीने तपासाची सूत्रे हलवून पोलिसांनी सदर प्रकरणाचा छडा लावला आहे.
रात्री उशिरापर्यंत याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दभिलला सरपंच पद आरक्षणावर आक्षेप
आरक्षण थांबवून लवकरच कायदेशीर सुनावणी करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये दाभील गावासाठी सर्वसाधारण महिलासाठी हे सरपंचपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत मागासवर्गीयसाठी सरपंचपद मिळाले नसल्यासमुळे सरपंच पद मागासवर्गीयासाठी आरक्षित व्हावे अशी मागणी दाभील गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांनी तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मौजे दाभील ग्रामपंचायतीची स्थापना सन १९७४ साली झालेली आहे. स्थापनेपासून ते आज तागायत या ग्रामपंचायतीला मागासवर्गीय पुरुष सरपंचपद आरक्षण मिळालेले नाही. यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला आहे त्यामुळे या आरक्षणावर हरकत संदीप कांबळे यांनी घेतली असून तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना दिले असून आपली हरकत नोंद करून घेऊन याची ताबडतोब सुनावणी घ्यावी असे म्हटले आहे.


मलिग्रे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता. आजरा येथील समाज मंदिरात रविवारी रात्री बारा वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती , मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी डाॅ.बाबासाहेबाच्या कर्तुत्वाची माहिती देवून बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे नेण्याचे सांगितले, यावेळी संजय घाटगे, विश्वास बुगडे, रामचंद्र कांबळे, जया कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांनी गाणी सादर केली.
यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, विष्णू कांबळे, शिवाजी कागिनकर, नेताजी कांबळे, छाया कांबळे, आक्काताई कांबळे याच्या सह महिला उपस्थित होत्या. आभार बाळू कांबळे यांनी मानले.

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सव व बक्षीस वितरण

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त वडरगे तालुका गडहिंग्लज येथे क्रीडा महोत्सवासह विविध कार्यक्रम पार पडले.
डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व जिल्हा लोककलाकार समिती, उत्तूर यांच्या वतीने शालेय स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस देऊन, सर्व मुलांना अल्पोपहार, शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
प्राथमिक विद्या मंदिर व अंगणवाडी, वडरगे येथे सदर क्रीडा महोत्सव पार पडला.जिल्हा लोककलाकार समिती, उत्तूर चे अध्यक्ष डॉ.सचिन पोवार, सामाजिक कार्यकर्ते भैरू चौगुले , वडरगे सरपंच सौ. सविता पाटील, माजी सैनिक भाऊसो मोरे,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन च्या संचलिका सरिता पोटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापिका गीता माळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
डॉ.पोवार, भैरव चौगुले, माजी सैनिक भाऊसो मोरे, सरपंच पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक व शाळा व्यस्थापन कमिटी अध्यक्ष किरण माने, महादेव मोरे,भगवान गोरुले, महादेव गायकवाड, अनिल देवार्डे,आनंद जावळे, माया होडगे आदी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. पोवार फौंडेशन च्या ट्रस्टी सरिता पोटे यांनी केले. सांगितली.सूत्रसंचालन सुलोचना चिदंके यांनी तर आभार वैशाली कोष्टी यांनी मानले.

निव्वळ डोकेदुखी….

वडाच्या गोंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची खुदाई करून संबंधितांनी या परिसरातील शेतकरी, महिला वर्ग, मयत घेऊन जाणाऱ्या मंडळींच्या डोक्याला निव्वळ ताप करण्याचे काम केले आहे.
काम वेळेत मार्गी लागणार नसेल तर ही खुदाई करून मार्ग कशाला बंद केला असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.

राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घाटकरवाडी ता.आजरा येथील गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंचच्यावतीने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तक पाठविण्याची अंतिम मुदत ही १५ एप्रिलपर्यंत असणार आहे.
यामध्ये तीन पुरस्कार असून श्रीहरी काव्य पुरस्कार सर्वांसाठी आहे. तर जिजाई काव्य पुरस्कार फक्त महिलांसाठी व सुवर्ण साक्षी काव्य पुरस्कार पहिल्या काव्यसंग्रहासाठी असणार आहे. मे महिन्यामध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारासाठी पुस्तकाची एक प्रत, कवीची संक्षिप्त माहिती फोटोसह, स्वयं घोषणा पत्रासह पाठवण्याचे आवाहन दत्तात्रय पाटील तसेच मंचच्या सचिव वैष्णवी पाटील यांनी केले आहे.

आज शहरात…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडेनऊ वाजता फोटो पूजन, दुपारी साडेचार वाजता व्यंकटराव प्रशाला येथून प्रतिमेची मिरवणूक व सायंकाळी सात ते दहा या कालावधीत स्नेह भोजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


