mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.२४ फेब्रुवारी २०२६

आजऱ्यात शक्तीपीठला विरोधच… परभणी घटनेचा निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकरी स्त्री-पुरुष आंदोलकांवर लाठीचार्ज करून बळजबरीने करणाऱ्या सरकारचा आजरा येथे निषेध करण्यात आला.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई, काँग्रेसचे संजयभाऊ सावंत, कॉ. संजय तरडेकर, प्रकाश मोरुस्कर, कॉ. शांताराम पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना कॉ‌. देसाई म्हणाले, माती ही आमच्यासाठी मातेसमान आहे. त्यामुळे मातीला हात लावाल तर आमचा शेतकरी तुम्हाला मातीत गाढल्या शिवाय सोडणार नाही. ज्या राजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त ताकीद दिली त्या राजाच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी स्त्री-पुरुषांच्यावर लाठीचार्ज केला गेला. हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे या सरकारने शक्तीपीठ लादण्याचा प्रयत्न अजिबात करू नये.

शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई म्हणाले शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या वर सरकार अन्याय करत असेल तर ते नेमके कोणत्या विचाराची आहे हे सांगायची गरज नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. ते ते अदानी आणि अंबानीचे हस्तक बनले आहे. यांना शक्तिपीठ त्यांच्यासाठी करायचा आहे.

यावेळी रवी भाटले, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, भीमराव माधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीवर व्याख्यान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील पर्यावरण सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘ नैसर्गिक व पारंपरिक शेती ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते श्री.अजित हरेर यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन केले.

आजची पिढी शेती पासून लांब जात असली तरी कशा पद्धतीने आपण आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून परड्यात किंवा टेरेस वर छोटी छोटी पीक घेऊ शकतो ते सांगितले.रासायनिक खत आणि सेंद्रीय खत यातील फरक,सेंद्रीय खत कसं तयार करावं,पिकांना पाणी किती प्रमाणात आणि कसे द्यावे.रासायनिक खतांवर पिकणाऱ्या पिकांचा शरीरावर होणारा परिणाम असे अनेक घटक हरेर यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, श्री. पाटील- अर्दाळकर , पर्यावरण विभाग प्रमुख श्री.एस.वाय. भोये,सौ.ए.एस. गुरव व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आजऱ्यात आज विकास सेवा संस्था संचालक, सचिव प्रशिक्षण


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथे विकास सेवा संस्था संचालक, सचिव प्रशिक्षण आज मंगळवार दिनांक २४ रोजी होत आहे. येथील जनता बँक, आजराच्या सभागृहात सकाळी १० वाजता सुरुवात होईल. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन होईल.

जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे, जिल्हा सहकार बार्डचे संचालक संभाजी तांबेकर, जिल्हा बँकचे विभागीय अधिकारी सुनिल दिवटे, सहकार अधिकारी जोतीराम बंडगर, जनता बँकेचे कार्यकारी संचालक एम. बी. पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तात्यासाहेब मोहीते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस. टी. जाधव हे सहकारी काय‌द्यातील महत्वाच्या तरतुदी व बदल, विकास सेवा संस्था ऑडिट, निकष ऑडिट मार्किंग याबाबत मार्गदर्शन करतील. एस. बी. शिंदे हे संगणकाचे मुलभूत ज्ञान व एम. एस. वर्ड याबाबत मार्गदर्शन करतील.

समारोप समारंभाला जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक निळकंठ ठाकूर, तालुका संघाचे अध्यक्ष महादेव पाटील- धामणेकर, जिल्हा गटसचिव संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विक्रम पाटील, संतोष ढोणुक्षे, तालु‌का अध्यक्ष श्रीधर कुऱ्हाडे सुभाष चौगुले उपस्थित राहणार आहेत.


व्यंकटराव हायस्कूलच्या १९७८ एस.एस.सी.बॅचचे द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यंकटराव हायस्कूलच्या १९७८ एस. एस. सी. बॅचचे द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन” चित्री डॅम एडव्हेंचर इको टुरिझम” या रिसॉर्टवर यशस्वीपणे संपन्न झाले.

यावेळी संजय टोपले,संजय निर्मळे, नरेंद्र सावंत, शेखर वाळके,सुरेश पाटेकर,कल्पना कुरुणकर, सुनंदा सामंत, मंगल चिंडक, यांचे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

सुत्रसंचालन श्री.बंडू कुंभार यानी केले.

निधन वार्ता

श्रीमती अन्नपूर्णा कुरुणकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लिंगायत गल्ली आजरा येथील अन्नपूर्णा आण्णासो कुरुणकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे . त्या येथील  व्यापारी संदेश कुरुणकर यांच्या आई होत.

तिसरीचा कार्यक्रम उद्या दिनांक २५ फेब्रुवारी रोजी आहे.

अक्काताई जाधव 

मुंगूसवाडी तालुका आजरा येथील अक्काताई बंडू जाधव ( वय ७८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,दोन विवाहित मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. त्या अशोक जाधव व निवास जाधव यांच्या आई होत.

 रक्षाविसर्जन उद्या बुधवार दिनांक २५ रोजी मुंगूसवाडी येथे आहे.

सोनाबाई भोसले

धामणे ता. आजरा येथील सोनाबाई महादेव भोसले ( वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पक्षात दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

वासंती पानारी

मडीलगे ता. आजरा येथील वासंती शांताराम पानारी ( वय ७६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ आहेत.

उद्यापासून श्री कलावती देवी यांचा आजरा येथे वार्षिक हरिनाम सप्ताह

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बेळगाव निवासी गुरुदेवता श्री कलावती देवी यांचा उद्या बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी ते रविवार दिनांक २ मार्च अखेर वार्षिक हरिनाम सप्ताह दुरदुंडेश्वर मंगल कार्यालय,आजरा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताहादरम्यान रोजचे सकाळचे भजन सकाळी ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत, सायंस्मरण भजन संध्याकाळी ४ ते ५.३० पर्यंत व शिवाराधना सायंस्मरण रात्री व ८ ते ९.३० या कालावधीत होणार असल्याचे सिद्धकला भजनी मंडळ व बाल संस्कार केंद्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

किणे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

किणे (ता. आजरा) येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा गुरुवार (ता. २६) पासून सुरू होत आहे. सोहळा शनिवार (ता. २८) पर्यंत चालेल. किणे ग्रामस्थ व वारकरी सांप्रदाय मंडळ, किणे यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिर पासून दिडी निघणार आहे. या वेळी दीप प्रज्वलन, ध्वजारोहण, मुर्ती पूजन, कलश पूजन, विणा पूजन, तुळस’ पूजन यासह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. दररोज काकड आरती, द्वारी महीलांचे भजन, सायंकाळी हरीपाठ, प्रवचन, किर्तन व हरीजागर असे कार्यक्रम होतील. ह. भ. प. प्रेश वामनराव देसाई (नेसरी) हे प्रवचन करणार आहेत. अर्जुन जाधव महाराज तवंदी शिप्र (ता. चिकोडी) व धनाजी खतकर महाराज पिंपळगाव (ता. भुदरगड) यांचे किर्तन होईल. शनिवारी महाप्रसाद व कालाकिर्तन होईल.

छायावृत्त

माझी वसुंधरा अभियान २०२३-२४  स्पर्धेमध्ये आजरा नगरपंचायतीने उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केला. पुरस्काराचे वितरण हे  पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार स्विकारते वेळी आजरा नगरपंचायतीतर्फे विद्यमान नगराध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी, तत्कालीन नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, पाणीपुरवठा अभियंता श्रीमती मानसी कदम, कर निरिक्षक श्री.निहाल नायकवडी, शहर समन्वयक श्रीमती कोमल देसाई उपस्थित होते.

महत्त्वाचे

वाटंगी, तालुका आजरा येथे गेले काही दिवस नळ पाणीपुरवठा योजनेतून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 

संबंधित पोस्ट

गजरगाव बंधार्‍यावरून मोटरसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भाकरी फिरणार…

mrityunjay mahanews

जिल्हा बँकेसाठी आज मतदान… आजऱ्यात चराटी व देसाई यांच्यात चुरशीची लढत…. अनाथांची ‘माय’गेली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!