शनिवार दि.२५ आक्टोंबर २०२५





हरपवडे येथे राडा…
दोन जखमी…
दहा जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता. आजरा येथील कांबळे कुटुंबियांच्या वादग्रस्त जमिनीतील मेसकाठ्या तोडण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान कोयता, पट्टा, लाठीकाठीने मारामारीत होऊन यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…
कांबळे कुटुंबीयांमध्ये हरपवडे येथील गट नंबर ६५ च्या जमिनीचा वाद आहे.सदर वाद न्याय प्रविष्ट आहे. यावरून वारंवार महादेव मसनू कांबळे व आनंदी गणपती कांबळे यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद होत असतात. काल शुक्रवारी या जमिनीतील मेस काठ्या तोडण्यावरून व वाहतूक करण्यावरून दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. महादेव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आपण बाजाराकरीता आजरा येथे जाऊन परतलो असताना आनंदी यांच्यासह चौघे मेस काठ्या ट्रॅक्टरमध्ये भरून नेताना दिसले. सदर जमिनीचा वाद सुरू असून मेस काट्या नेऊ नका अशी त्यांनी ट्रॅक्टर चालकास विनंती केली. यावेळी आनंदी यांच्यासह सुनील गणपती कांबळे उषा सुनील कांबळे (सर्व रा.हरपवडे ) व जयराम भीमा कांबळे (रा. कारिवडे, ता. भुदरगड) यांनी त्यांना काठीने व कोयत्याने मारहाण करून जखमी केले असे म्हटले आहे. या फिर्यादीवरून आनंदी गणपती कांबळे, सुनील गणपती कांबळे, उषा सुनील कांबळे व जयराम भीमा कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान आनंदी गणपती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आपण मेसकाठ्या तोडत असताना महादेव मसणू कांबळे, मसणू बाबू कांबळे, यशवंत बाबू कांबळे, बनाबाई मसणू कांबळ, सुरेश मसणू कांबळे व उज्वला सुरेश कांबळे यांनी आपणाला पट्ट्याने तसेच लाकडी काठ्यांनी मारहाण करून जखमी केले असे म्हटले आहे. आनंदी यांच्या फिर्यादीवरून या सहा जणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.


ऊस उत्पादन वाढीसाठी ए आय तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
आजरा साखर कारखान्याचा गळीत शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यंदाही शंभर दिवस कारखाने चालतील असा कृषी तज्ञांचा अंदाज आहे. शंभर दिवस कारखाने चालले तर ते टिकणारे नाहीत. आर्थिक घडी विस्कटेल. भविष्यात ऊस उत्पादन वाढ होणे ही काळाची गरज आहे. यासाठी एआय तंत्रज्ञान (कृत्रीम बुध्दीमता) हा एकमेव पर्याय समोर दिसतो आहे. आजरा कारखान्यानेही एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करेल. असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा २७ वा गळीत हंगाम शुभारंभ भर पावसात झाला. या वेळी मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई प्रमुख उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मोळी पुजन तर कारखान्याचे संचालक अनिल फडके व त्यांच्या पत्नी अनिता फडके यांच्या हस्ते काटा पूजन झाले.
कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात परखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. वन्यप्राण्यांचा तालुक्यात होणारा उपद्रव थांबवावा व टोल रद्द करावा अशी मागणी केली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्रशासनाने साखरेचा हमीभाव ४३०० रुपये करावा. इथेनॉल व उपपदार्थांचा दर वाढवावा. यामुळे कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा, व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. याबाबत केंद्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. आजरा कारखान्याने सीएनजी व सौरऊर्जा प्रकल्प हे दोन उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुरु करावेत. जिल्हा बँक यासाठी आर्थिक मदत करेल.
मंत्री आबिटकर म्हणाले, राजकारण काहीही असो कारखाने टिकले पाहीजेत. आजरा कारखान्याला शासनस्तरावर कोणतीही मदत करावयास कटिबध्द असल्याची ग्वाही दिली. सुधीर देसाई यांचे भाषण झाले.
या वेळी उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे,उदयराज पवार, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, शिवाजी नांदवडेकर, रणजित देसाई, दीपक देसाई, राजू मुरुकटे, राजू जोशीलकर,सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, गोविंद पाटील, संभाजी पाटील, हरीबा कांबळे, अशोक तर्डेकर, रशिद पठाण, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, विठ्ठलराव देसाई, डी. ए. पाटील, अबूताहेर तकिलदार, आलम नाईकवाडे, रियाज तकिलदार,सुधीर कुंभार, राजेंद्र सावंत, विजय थोरवत, अनिकेत कवळेकर, इंद्रजीत देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, अधिकारी व कर्मचारी आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश देसाई यांनी सुत्रसंचालन तर काशिनाथ तेली यांनी आभार मानले.
टोल हद्दपारच…
आजरा तालुक्याच्या हद्दीच्या पुढे टोल हलवणार आजरा तालुक्याची हद्द घाटकरवाडी पर्यंत आहे. या हद्दीच्या पुढे टोलनाका केला जाईल. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगीतले. सोमवारी (ता. २७) याबाबत दुरध्वनीवरून गडकरी यांच्याशी संपर्क करणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगीतले. तोपर्यंत येथील टोल वसुली सुरु होवू देणार नसल्याचेही सांगण्यात आले.


सकारात्मक प्रशासनामुळे लोककल्याणाची कामे शक्य : पालकमंत्री आबिटकर
‘श्व़ास’ तर्फे लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्व. विमलाबाई सरदेसाई सेवा संस्थान या संस्थेने प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे. प्रशासन सकारात्मक राहीले तर लोककल्याणाची कामे मार्गी लागू शकतात. हाच विचार घेवून पुढे जावूया असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात स्व. विमलाबाई आ. सरदेसाई सेवा संस्थान या संस्थेमार्फत कार्यक्रम झाला. या वेळी लाभार्थांना विविध योजनाचे मंजूरी पत्र वाटण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत प्रमुख उपस्थित होते. संजय गांधी योजनाची मंजुरी पत्र, अंपगांना साहित्य व प्रमाणपत्र, कृषीचे साहित्य यासह विविध योजनांचे वाटप झाले.
संस्थेचे अध्यक्ष रणजित सरदेसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात संस्थेमार्फत जनकल्याणाची केलेली कामे मांडली. जवळपास सहा हजार लाभार्थीना संस्थेने विविध योजनाचा लाभ मिळवून दिला आहे. सर्वसामान्यांच्या सेवेत आपण कायम राहू असे ते म्हणाले.
श्री. चराटी म्हणाले, सरदेसाई सेवा संस्थानचे प्रमुख रणजित सरदेसाई यांनी जनतेच्या कामात स्वतःला जोडून घेतले आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करू. तहसीलदार श्री. माने यांनी शासनांच्या विविध योजनांची माहीती दिली. तालुक्यात ९२ पाणंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. गावोगावी पाणंद रस्ते तयार करण्याची मोहीम गतीमान केली जाईल. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचे भाषण झाले.
निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, विलास नाईक, विजयकुमार पाटील, पांडुरंग लोंढे, संभाजीराव सरदेसाई, सुधीर कुंभार, दशरथ अमृते, गोविंद गुरव, शैलेश मुळीक, राजेंद्र सावंत, विजय थोरवत, धनंजय पाटील, इंद्रजीत देसाई, लहू वाकर, युवराज पाटील, धोंडीराम परीट, संतोष भाटले, सुनिल दिवेकर, सुधाकर पाटील, काका देसाई, विष्णु कुंभार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. भरत बुरुड, युवराज जाधव यांनी सुत्रसंचालन केले. मंगेश पोतनीस यांनी आभार मानले.


मतदार यादी मधील गंभीर दोष दुरुस्त करा…
अन्याय निवारण समितीची तहसीलदारांसह मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी मध्ये प्रचंड गोंधळ असून मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदी करण्यात आल्या आहेत असा आरोप अन्याय निवारण समितीच्या वतीने करण्यात आला असून तातडीने या चुका दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली आहे. मतदार यादी मध्ये अनेक मतदारांची दुबार नोंदणी झाली आहे कांही मतदार खोट्या पत्त्यांच्या आधारे इतर प्रभागात स्थानांतरित करण्यात आले आहेत. नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्षात वास्तव्यास नसलेले अनेक मतदार बोगस पत्त्यांच्या आधारे यादीत प्रविष्ट करण्यात आले आहेत.
आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यही यामध्ये आहेत. हे प्रकार अत्यंत गंभीर असून निवडणुकीचा निकाल व लोकशाही प्रक्रियेवर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे या बाबी दुरुस्त करून निवडणूक प्रक्रिया राबवावी खोटे व बोगस मतदार यादीतून काढून टाकावे.दुबार नोंदणी त्वरित वगळावी अन्यथा नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतच्या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, संजय जोशी, जावेद पठाण, मदन तानवडे, दिनकर जाधव, मिनिन डिसोजा आदींच्या सह्या आहेत.


छायावृत्त…

काल शुक्रवारी गडहिंग्लज येथे आमदार सतेज पाटील यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकरीता ताकतीने कामाला लागा असा संदेश त्यांनी देत मतदारसंघांचा आढावा घेतला व आजरा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाकरीताच्या इच्छुकांशी संवाद साधला.


पाऊस थांबता थांबेना…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल आठवडा बाजारादिवशी पावसाने पुन्हा एक वेळ जोरदार हजेरी लावल्याने तालुका वासीयांची तारांबळ उडाली.
आजरा साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभासह तहसील कार्यालयामध्ये विविध दाखल्यांच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पण पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांमध्ये मोठा व्यत्यय निर्माण झाला. पावसातच गळीताचा शुभारंभ झाला. तर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम ऐनवेळी सभागृहामध्ये स्थलांतरित करण्यात आल्याने लाभार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
सुट्ट्यामुळे असणारी संकेश्वर -गोवा मार्गावरील प्रचंड वाहतूक व पावसामुळे तालुकावासीयांचे चांगलेच हाल झाले. कापणीला आलेली भात पिकेही आता भुईसपाट होऊ लागली आहेत.
पाऊस थांबता थांबेना… अशी अवस्था तालुका वासीयांची झाली आहे.







