mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार

३१ जुलै २०२६

ना अर्ज आला…
ना निवड झाली….
पं.स. सभापती पद रिक्तच


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पंचायत समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पंचायत समितीचे सभापती पद रिक्त राहिले आहे.

सभापती सौ. जयश्री गाडे यांचा जात वैधता दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने आजरा पंचायत समितीचे सभापती पद रिक्त झाले आहे.काल गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात नूतन सभापती निवडीच्या पार्श्वभूमी बैठक बोलावण्यात आली होती.

सदर बैठकीत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने तहसीलदार समीर माने यांनी अखेर सभापती पद रिक्त राहिल्याचे जाहीर केले.

यावेळी गटविकास अधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मोठ्या राजकीय घडामोडी…

पंचायत समिती सभापती करता सौ. यशोदा पोवार या एकमेव महिला सदस्य दावेदार होत्या. परंतु सत्तारूढ आघाडीच्या नेते मंडळींनी सदर पदावर कोणीही दावा करू नये. पद  रिक्त ठेवावे अशा सूचना केल्याने सौ.पोवार यांनी अर्ज दाखल केला नाही असे समजते. पद रिक्त ठेवण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली झाल्या.

महिलेचा आकस्मिक मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कासार कांडगाव तालुका आजरा येथील मंगल भीमराव कांबळे ( वय ३२ वर्षे ) या महिलेचा शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास फिटस् येऊन बेशुद्ध पडल्याने आजरा येथील खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला.

मंगल यांना राहत्या घरी फिटस् येऊ लागल्याने त्यांना आजरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित डॉक्टरांनी याबाबत पोलिसात वर्दी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

अतिक्रमण हटवण्याची शेवटची संधी, अन्यथा १०० फूट रिंगरोड कागदावरच!

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गारगोटी-गडहिंग्लज राज्य मार्गावरील उत्तूर शहरालगतच्या १०० फूट रुंद रिंगरोडचे काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देश धोक्यात आला आहे.

उत्तूर हे आजरा तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून रोज मोठी वाहतूक होते. बसथांबा नसल्याने बसेस राज्यमार्गावरच थांबतात, त्यामुळे कोंडी आणि अपघात वाढले आहेत.

भविष्यातील गरज ओळखून शासनाने १०० फूट रस्ता संपादित केला होता. सध्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे रस्त्याची अधिकृत हद्द स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँक्रीट होण्यापूर्वीच सर्व अतिक्रमणे समान निकषावर हटवणे गरजेचे आहे.

प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास सार्वजनिक निधीतून उभारलेला हा रिंगरोड काही वर्षांतच अरुंद होऊन पुन्हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आजरा हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक सभेचे आयोजन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे शिक्षक-पालक सभा पार पडली.

सभेच्या प्रारंभी विभागप्रमुख श्री. आर. आर. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सभेची उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षपदी आजरा नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अश्विनी चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. विविध समित्यांची स्थापना करून त्यांच्या कार्याची माहिती सौ. एस. एस. पाटील यांनी दिली.सभेच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्था, आजरा यांचे संचालक श्री. अनिकेत चराटी होते.

श्री. अनिकेत चराटी यांनी पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन केले.
सौ. टी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यास, शिस्त व गुणवत्तावाढीबाबत विविध प्रश्न व सूचना मांडल्या. पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी यांनी पालकांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. ए. आर. व्हसकोटी यांनी केले. सभेस पालक, शिक्षक उपस्थित होते.

निधन वार्ता
रामचंद्र देसाई

भादवण तालुका आजरा येथील रामचंद्र बंडू देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले‌

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.

छायावृत्त…

आजरा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा आजरा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील ( कुर्डूकर ), आजरा तालुका अध्यक्ष बापू नेउंगरे ,महिला अध्यक्षा सौ.सुषमा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पावसाची  विश्रांती…
साळगाव बंधारा वाहतुकीकरता खुला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

काल गुरुवारी पावसाचा जोर थोडा ओसरल्याने जनजीवन पूर्ववत झाले असून साळगाव बंधारा वाहतुकीकरता खुला झाला आहे.

हिरण्यकेशी व चित्री नदीवरील चित्री व सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही नद्या अद्यापही पात्राबाहेरून वहात आहेत.समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात भात व नाचणा पिक उत्पादकांची चिंता दूर झाली आहे.

       आजचे पंचांग 

दिनांक : ३१ जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (रात्री १०.३१ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (रात्री ०७.२६ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : सौभाग्य योग (रात्री ११.५३ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : तैतुला करण (सकाळी १०.०४पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मकर राशी (सकाळी ०६.३७ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०८ ते दुपारी १२.४५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लोकाभिमुख कारभाराची हमी : अभिषेक शिंपी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!