



पावसाने घनसाळ भात आडवे केले… गव्यांनी तुडविले
मसोली (ता. आजरा) येथे अवकाळी पावसामुळे घनसाळ भाताचे प्रचंड नुकसान झाले असून जोरदार पावसामुळे उभे भातपीक आडवे झाले असताना गव्यांचा उपद्रव वाढला असून आडव्या पीकावरून गव्यांचे कळप च्या कळप जात असल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. गेले दोन दिवस मसोली येथील पुंडलिक आबा गुरव, महादेव चाळू गुरव, सिताराम हरी मुगुर्डेकर, आनंद हरी मुगुर्डेकर यांच्या मालकीच्या शेतातील घनसाळ पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
धनगर वाड्यावर बिबट्या कडून शेळीवर हल्ला
आजरा तालुक्यातील आवंडी धनगर वाडा क्रमांक दोन येथे बिबट्याकडून शेळीवर हल्ला होऊन यामध्ये कानू विठू शेळके यांची शेळी मृत पावली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथे तातडीने भेट देऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली.
निंगुडगे येथे कार्तिक स्वामींची यात्रा उत्साहात
निंगुडगे तालुका आजरा येथील अमृतेश्वर मंदिरातील कार्तिक स्वामींची यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी चंदगड,आजरा, गडहिंग्लजसह जिल्हाभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुकुंदराव देसाई यांना मान्यवरांच्या शुभेच्छा
आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जनता बँकेचे विद्यमान अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांना वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यामध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा चराटी, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, जि. प. सदस्य उमेश आपटे, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, विद्याधर गुरबे, प्रा. सुनील शिंत्रे मलीककुमार बुरूड, जनार्दन टोपले, सुधिर देसाई, दशरथ अमृते, राजाराम होलम, अरूण देसाई, आदींचा समावेश होता.
परशुराम बामणे यांच्याकडून सरोळी शाळेस पन्नास हजारांची देणगी
गडहिंग्लज तालुक्यातील सरोळी गावातील विद्यामंदिर सरोळी शाळेची होत असलेली दुरवस्था लक्षात घेऊन कोल्हापूर मनसे जनहित व विधी कक्ष जिल्हाध्यक्ष श्री.परशुराम बामणे यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी रोख पन्नास हजार रुपये शाळेच्या कमिटीकडे सुपूर्द केले.
त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज व समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा शाळेस भेट दिली.
कोल्हापूर ग्रामीण मधील मराठी शाळांची होणारी दुरवस्था व शासनाकडून होणारी कुचंबणा लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून मराठी शाळांना शासनातर्फे योग्य सहकार्य मिळावे,यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे बामणे यांनी यावेळी नमूद केले.
प्रा. डॉ. परशराम जिरगे यांची निवड
महाराष्ट्र राज्याच्या वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीची संस्था महाराष्ट्र विज्ञान अकादमीने (एमएएससी) यावर्षी कामेवाडी (ता. चंदगड) या गावचे सुपुत्र व आयआय टी इंदोरचे प्रा. डॉ. परशराम शिरगे यांची फेलो म्हणून निवड केली आहे.
त्यांनी केलेल्या सुवाहक पदार्थांचे संशोधन, बॅटरी, सुपरकपॅसिटर (अतिधारित्र), सौर ऊर्जा यंत्र इत्यादी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध जागतिक पातळीवर प्रकाशित केले आहेत. त्यांना गेल्या वर्षी मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (एमआरएसआय) ने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. डॉ. शिरगे यांचे नाव स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या वतीने जाहीर केलेल्या यादीत नामांकन मिळाले आहे. . त्यांना यापूर्वी रामानुजन फेलोशिप (भारत सरकार), आयएसपीएस फेलोशिप जपान, एमके – २१ फेलोशिप (साऊथ कोरिया) हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
विवाह सोहळ्याच्या आनंदावर पावसाचे विरजण
आजरा,चंदगड व गडहिंग्लज तालुक्यामध्ये गेले चार दिवस धुवांधार पाऊस सुरू आहे. ठीक-ठिकाणी होणाऱ्या जोरदार पावसामुळे एकीकडे बळीराजा अडचणीत आला आहे. दुसरीकडे तुळशी विवाह झाल्यानंतर अनेकांनी कोरोणामुळे प्रलंबित असणारे विवाह सोहळे दणक्यात आयोजित केले आहेत. परंतु ढगाळ वातावरण व पावसाची सातत्याने लागणारी हजेरी यामुळे या विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडू लागले आहे. मंगल कार्यालयाऐवजी उघड्या मैदानावर आयोजित केलेले विवाह सोहळे यामुळे अडचणीत येत आहेत. रविवार दिनांक २१ रोजी गडहिंग्लज उपविभागात तब्बल ७० वर विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई यांना पितृशोक
गारगोटी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. अमृत गणपतराव देसाई यांचे वडील तसेच बळिराजा सहकार समुहाचे संस्थापक श्री. श्रीपतराव बचाराम देसाई यांचे कनिष्ठ बंधू श्री.गणपतराव बचाराम देसाई(वय ८६ रा.पेरणोली ता. आजरा) यांचे शुक्रवार दि. १९ रोजी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ भाऊ, सुना नातवंडे २ मुलगे, १ मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता पेरणोली येथे आहे.
————————ADVT————————
‘मृत्युंजय महान्यूज’ करिता बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
ज्योतिप्रसाद सावंत (मुख्य संपादक)
9637598866
8695715566.


‘मृत्युंजय महान्यूज’ करिता बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :