‘पाठिंबा भाजपाचा… निधी महाविकास आघाडीचा’
विधान परिषद निवडणुकांच्या माध्यमातून
आज-याच्या राजकीय पटलावर सावळागोंधळ
(ज्योतिप्रसाद सावंत)
जनता पार्टी व ताराराणी आघाडीच्या पाठिंब्यावर आजरा नगरपंचायत व नगरपंचायती मधील सत्ता अस्तित्वात आली. नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत ताराराणी आघाडी व भाजपा पुरस्कृत आघाडीला आजरा नगरपंचायती मध्ये सत्ता स्थापनेत यश मिळाले. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितरीत्या महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून बाजूला गेली. परिणामी अनेक स्थानिक व राज्य पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होऊन बसली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर भाजपाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर ठीक-ठिकाणी सत्तेत असलेल्या मंडळींसमोर विकास कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. धड राज्यात सत्ता नाही तर जिल्ह्यात निधीचा स्त्रोत नाही, अशी विचित्र अवस्था बनत गेली. आजरा नगरपंचायततिची अवस्था फारशी वेगळी राहिली नाही. अखेर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नगरपंचायतीमधील सत्तारूढ आघाडीचे नेते अशोकअण्णा चराटी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून मिळेल तो निधी आणून विकास कामे सुरु ठेवली आहेत. या तिघांच्या माध्यमातून लाखोंचा निधी नगरपंचायती ला आला आहे तर तालुक्यांमध्ये हि मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानपरिषदेकरीता महाविकासआघाडी आजरा नगरपंचायतीच्या सत्तारुढ नगरसेवकां कडूनही मतदानाची अपेक्षा बाळगून आहे. तर नगर पंचायतीमध्ये सत्तेत येताना तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा, पाटील, माजीआमदार सुरेश हाळवणकर व महाडिक परिवाराने नगरपंचायती मधील सत्तारूढ मंडळींना चांगलेच बळ दिले होते. अशोकअण्णा चराटी हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणूककिमध्ये आघाडीचे नेते अशोकअण्णा चराटी व सत्तारूढ सदस्यांसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. अलीकडेच गृहराज्यमंत्री यांचे निकटवर्तीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व अशोकअण्णा चराटी हे एकत्र आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीकरिता गृहराज्यमंत्री पाटील यांच्यासाठी शिंपी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेटाने कामाला लावले आहे. नगरपंचायतीचा कालावधी संपण्याकरीता अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत. असे असताना भविष्यात निधी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री पाटील व ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार आबिटकर यांच्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी नाही. महाविकासआघाडी सोबत जावे तर भाजपा नेत्यांसह महाडिक परिवाराचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे व दुसरीकडे भाजपासोबत जावे लागल्यास भविष्यात निधीची अडचण निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकंदर परिस्थिती पाहता आजरा येथील नगरपंचायत कारभाऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर अशीच झाली आहे.







