सोमवार दि.१२ जानेवारी २०२६

आज उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांवर होणार शिक्कामोर्तब

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासह दोन स्वीकृत नगरसेवक पदांवर आज अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग दोन मधील सौ. पूजा अश्विन डोंगरे यांची निवड निश्चित आहे तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्तारूढ आघाडीतून डॉ. इंद्रजीत नानासो देसाई व राष्ट्रीय काँग्रेस मधून विक्रम पटेकर यांची निवड निश्चित आहे.
दुपारी एक वाजता उपनगराध्यक्ष पद निवडीची तर चार वाजता स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

औषध फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतामध्ये औषध फवारणी करत असताना गवसे ता. आजरा येथील आत्माराम राजाराम पाटील ( वय ६२ वर्षे ) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
आत्माराम हे शेतामध्ये औषध फवारणी करत असताना त्यांना श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे.

कोल्हापूरला शिक्षण हक्क लढा परिषद घेण्याचा निर्णय..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुजन समाजाला शिक्षणातून कायमचे हद्दपार करण्यासाठी खेड्यापाड्यातील वाड्यावस्तीवरील मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव असून याविरोधात तीव्र लढा करण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. या लढ्याची सुरुवात देशात सर्वात प्रथम मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत कोल्हापूर येथे शिक्षण हक्क लढा परिषद घेऊन करण्यात येणार आहे.
यावेळी शाळा बचाव आंदोलनाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, कमी पटसंख्येचे कारण पुढे संचमान्यतेच्या नावाखाली सरकार शिक्षक अतिरिक्त झाल्याचा कांगावा करीत आहेत. एकीकडे शक्तीपीठ महामार्ग सारखे नको असलेले प्रकल्प बळजबरीने लोकांच्या डोक्यावर मारत आहे. दुसरीकडे शाळा बंद करत शिक्षणाचा हक्कच नाकारत आहे. सरकार शिक्षण हक्क कायद्याच्या उलटा व्यवहार करत आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात देऊन पुन्हा एकदा बहुजन समाजाला गुलाम करायचे आहे. आपल्याला हा संघर्ष नेटाने लढवावाच लागेल.
अमर चव्हाण म्हणाले, गाव खेड्यातल्या शाळा टिकल्या तरच आमची मुले शिकतील. त्यामुळे हा संघर्ष आता आपल्याला मोठ्या ताकतीने पुढे घेऊन जावा लागेल. संजय तर्डेकर म्हणाले, आपण यापूर्वी सरकारचा एक निर्णय लढा करून हाणून पाडला आहे. यावेळीही आपल्याला त्याच ताकदीने उभा राहावे लागणार आहोत.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, सरकारची धोरणे ही भांडवलदारांच्या बाजूची आहेत. सरकारी शाळा मोडून तिथे खाजगी शाळा आणण्याच्या दिशेने सरकार चालले आहे. आपण एकजुटीने हा लढा पुढे नेऊया. कॉ. सम्राट मोरे,कृष्णा भारतीय,कॉम्रेड शिवाजी गुरव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश तिबिले, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, शिक्षक संघाचे मायकेल फर्नांडिस, राजू होलम, सुरेश शिंगटे, युवराज पोवार, सुभाष निकम यांनीही मनोगते व्यक्त करून या लढयात सर्व शक्तीनिशी उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्याला आनंदनराव कुंभार, प्रकाश मोरुस्कर, युवराज जाधव, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, डी ए पाटील, संतोष पाटील यांच्यासह आजरा गडहिंग्लज व भुदरगड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यंकटरावच्या वीजनिर्मिती या वैज्ञानिक उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात “पिझो इलेक्ट्रिसिटी चा वापर करून चालणे /दाब देऊन वीज निर्मिती” हे उपकरण मांडले होते.
या उपकरणाला “द्वितीय क्रमांक” मिळाला. कु.आस्था सचिन गुरव व हाजिक मोहम्मद इरफान सय्यद या दोन विद्यार्थ्यांनी हे उपकरण बनवून सादर केले.
या पारितोषिक प्राप्त उपकरणाची नागपूर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत ,शिक्षक नेते श्री. दादासाहेब लाड, शिक्षण विस्तार अधिकारी पी.सी. कुंभार या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षिका सौ. आशा सचिन गुरव यांना प्रशस्तीपत्र ,शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

निधन वार्ता
चाळू पाटील

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
हत्तिवडे ता. आजरा येथील चाळू रावजी पाटील (वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आज सोमवारी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन आहे.
आजरा हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) उपकेंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी श्रीमती किरण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी तथा सर व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था ( सारथी ) उपकेंद्र कोल्हापूर डॉ. विलास पाटील कार्यकारी अधिकारी राहुल कोरे, कार्यालयीन सहाय्यक (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर, एस. एस. कांबळे,ए. आर. व्हसक़ोटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका सौ.एच.एस. कामत यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी, करिअर निवड,ज्ञान, आहार, चारित्र्य, जीवनातील ध्येये, कौशल्ये,कष्ट ऑनलाइन प्रशिक्षण याविषयी माहिती दिली.
मुख्याध्यापक ए.एल. तोडकर यांनी आभार मानले.

आज तालुक्यात
शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या आरेखनावर चर्चा करण्यासाठी पेरणोली येथील रवळनाथ मंदिरात प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक
ठीक ११.०० वाजता.
रवळनाथ मंदिर, पेरणोली येथे
आज शहरात
पंडित दीनदयाळ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्वामी विवेकानंद जयंती सकाळी ११ वाजता.

आजचा नाट्यप्रयोग
मी कुमार …
सादरकर्ते :- निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी
वेळ :- सायं.७-०० वा.
स्थळ:- आजरा महाविद्यालय रंगमंच


