
५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने नूतनीकरण झालेल्या आजरा बँकेच्या गारगोटी शाखेचे उदघाटन...

आजरा अर्बन बँकेच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झाले. ग्रामीण भागात ५० वर्षापूर्वी गरज ओळखून आजरा बँकेने आपली दुसरी शाखा गारगोटी येथे सुरू केली होती. काळाची गरज ओळखून मात्र आपला मूळ उद्देश कायम ठेवत आज या बँकेने नूतनीकरण केले आहे ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सेवा आणि तंत्रज्ञान याची सांगड घालत या भागात बँकेने सर्वांचा विश्वास प्राप्त केला आहे असे गौरव उदगार या प्रसंगी आबिटकर यांनी व्यक्त केले.
आजरा बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सुरू केल्या आहेत. याच बरोबर कर्जासाठी कमीतकमी व्याजदर आकारून गरजू व्यक्तींना अर्थपूरवठा केला आहे. पुढील काही दिवसात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरपोच बँकिंग सेवा देण्याची योजना असल्याची माहिती चेअरमन डॉ. अनिल देशपांडे व व्हाईस चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी दिली.
ग्रामीण भागात ज्याठिकाणी बँकिंग सेवा उपलब्ध नाही आणि आर्थिक व्यवहारात फसगत होऊ नये यासाठी बीसी, बीएफ मार्फत सर्व बँकिंग सेवा देण्याचा मानस असल्याचे आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी यांनी सर्व उपस्थितांसमोर स्पष्ट केला. बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. विलास नाईक आणि श्री. सुरेश डांग यांनी बँकेच्या गतवर्षीच्या कार्याचा आढावा सभासद व ग्राहक यांच्या समोर मांडला. बँकेचा एकूण व्यवसाय १३२५ कोटींचा झाला असून या बँकेने खूप चांगले काम केले आहे आणि या पुढील काळात देखील याहीपेक्षा चांगले कामकाज करावे अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. राहुल देसाई व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. श्री. नाथाजी पाटीलसो यांनी व्यक्त केले. आजरा बँक सर्व व्यवहार हे अतिशय काटेकोरपणे करीत असल्याचे आणि आपल्या परंपरा जपत व्यवसायवाढ करीत असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे ज्येष्ठ सभासद श्री. हिंदुराव देसाई यांनी व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये बँकेच्या प्रगतीचे टप्पे याविषयाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. तानाजी गोईलकर यांनी केले. बँकेच्या या सर्व प्रगतीमध्ये प्रामुख्याने सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांचे योगदान असल्याने त्यांचे आणि उपस्थितांचे आभार ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक सातोसकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बँकेचे श्री. प्रकाश वाटवे,श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके,सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुनिल मगदुम, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील,श्री. संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल,श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे शाखा मार्गदर्शक श्री. श्रीकांत उळेगड्डी, श्री. उदय पाटील,श्री. शामराव देसाई उपस्थित होते.

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
आजरा येथील सुतार गल्लीतील फकीरांच्या शेतातील विहिरीत पडून ललिता गणेश राठोड (वय ३२) यांचे निधन झाले. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीमती शांताबाई अण्णाप्पा राठोड यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. ललिता या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या असता सदर प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास अशोक शेळके करीत आहेत.

खानापूर दरोडा प्रकरणातील आणखी चौघांना अटक
खानापूर – रायवाडा ता. आजरा येथील माजी सरपंच सौ. पूनम गुरव यांच्या घरावर व वराहपालन शेडवर १५ सशस्त्र दरोडेखोरांनी नऊ लाख १७ हजार रुपयांचा दरोडा घातला होता. या प्रकरणातील अकरा जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती दरम्यान आज आणखीन चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या पंधरा पर्यंत गेली आहे.
आज अटक केलेल्यामध्ये श्रीकांत दुधाप्पा सिगरी (रा. रुक्मिणी नगर, बेळगाव), दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी (रा. उचगाव, कोल्हापूर) राघवेंद्र व्यंकाप्पा धारवाड (रा. शिरगाव, चंदगड ) व सागर आत्माराम गोसावी (रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
सर्व आरोपींना गुरुवार दिनांक २० पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.

निधन वार्ता
केशव नेवरेकर
आजरा येथील केशव बंडू नेवरेकर ( वय ६८) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील रवळनाथ ग्रामीण पतसंस्थेच्या संचालिका रंजना नेवरेकर यांचे ते पती होत.
….
अशोक कुंभार
कुंभार गल्ली येथील अशोक पांडुरंग कुंभार (वय ७०) यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.





