mrityunjaymahanews
अन्य

यात्रेच्या पहिल्या दिवशीच पाटील कुटुंबियावर कोसळला दुःखाचा डोंगर…

यात्रे दिवशीच पाटील कुटुंबियावर कोसळला दुःखाचा डोंगर…

पत्रिका वाटत असतानाच चंद्रकांत पाटील यांची निधन

मुरूडे ता. आजरा येथील चंद्रकांत मारुती पाटील (वय ५०) यांचे लक्ष्मी यात्रेनिमित्त निमंत्रण पत्रिका वाटत असतानाच यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. एकीकडे यात्रेचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र पाटील कुटुंबीयांवर कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई येथे बोर्ड सिक्युरिटी मध्ये कामाला असणारे पाटील हे आपल्या कुटुंबीयांसोबत आठ दिवसापूर्वी यात्रेच्या तयारी करता मुरूडे या आपल्या मूळ गावी आले होते. गेले आठवडाभर त्यांची यात्रेची तयारी सुरू होती. दरम्यान काही शिल्लक निमंत्रित त्यांना पत्रिका देण्याकरता आज सकाळी ते बाहेर पडले साडेआठ वाजण्याचा सुमारास भटवाडी येथे पत्रिका वाटत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

किटवडे चा एकनाथ गेला…

किटवडे तालुका आजरा येथील हरहुन्नरी असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकनाथ कृष्णा सावंत याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले . निधन समयी त्याचे वय ४० वर्षे होते.

सकाळी छातीत दुखू लागल्याने त्याला आजरा येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे आजरा येथून गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवले. दरम्यान गडहिंग्लज येथे उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे .

आजरा मर्चंट्सला ३६ लाख २५ हजार नफा

आजरा मर्चंट्स को ऑफ़ क्रेडिट सोसायटी लि. आजरा या संस्थेला सन २०२२ – २०२३ साल अखेर रु.३६ लाख २५ हजार २७४ इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रमेश महादेव कारेकर यांनी दिली.

संस्थेच्या ठेवी रु. १४ कोटी ३० लाख ४० हजार १६८ इतक्या असून कर्ज वाटप ९ कोटी २३ लाख ३६ हजार १३१ इतके आहे. गुंतवणुक रु. ६ कोटी ९७ लाख ०१ हजार ३८५ इतकी आहे. थकबाकी ०.८३% असून एन.पी.ए.०% असून ऑडिट वर्ग सतत ‘अ’ राहिला आहे.

संस्थेची वार्षिक उलाढाल – रु. २३ कोटी ५३ लाख ७६ हजार २९९ इतकी असून खेळते भांडवल १८ कोटी ८४ लाख ५४ हजार ५६६ आहे.

संस्थेच्या शाखा-महागांव तारळे-राशिवडे व मलकापूर येथे कार्यरत असुन सर्व शाखा नफ्यामध्ये असल्याची माहीती दिली. संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणीकृत आहे. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सुरज जाधव, जेष्ठ संचालक श्री. बसवराज गुंजाटी, श्री. दिवाकर नलवडे, श्री. शिवलिंगाप्पा तेरणी, श्री. रुद्राप्पा पाटील, श्री. गोपाळ जाधव, श्री. गोपाळ पाटील, श्री. मारुती वाजंत्री, श्री. शामराव कारंडे, संचालीका सौ. उमा हुक्केरी, सौ. स्मिता टोपले व व्यवस्थापक श्री. गोपाळ पाटील उपस्थित होते.

भावपुर्ण वातावरणात तहसीलदारांना निरोप


आजरा तालुक्यात तहसीलदार म्हणून रूजू झालो त्यावेळी अतिपावसाचा तालुका म्हणून प्रशासनातील वरिष्ठांनी आजऱ्याची ओळख करून दिली होती. पण इथल्या कोसळधार पावसाप्रमाणेच तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या हृदयातून भरभरून प्रेम वाहताना आपण अनुभवले आहे. त्यामुळे येथून बदली होऊन गेलो तरी आजऱ्याशी आपली नाळ कायम राहील अशी कृतज्ञतेची भावना तहसीलदार विकास अहिर यांनी व्यक्त केली. बदलीच्या निमित्ताने आजरा तालुकावासीयांच्यावतीने त्यांचा सत्कार प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या हस्ते करण्यात आला.

आजऱ्यातील सामान्य जनता, लोकप्रतिनिधी यांनी केलेले सहकार्य, आजरा तहसील मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानामुळे गेल्या चार वर्षात चांगले काम करता आले. आजरा तालुक्याला विविध क्षेत्रात अग्रस्थानावर नेण्यात यश आले. या कामाचे श्रेय तहसीलदार म्हणून आपल्याला मिळाले असले तरी या यशाचे मानकरी येथील सर्वांचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आजरा तालुक्याच्यावतीने प्रांताधिकारी बारवे यांच्या हस्ते अहिर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना व व्यक्तीच्यावतीने अहिर यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर पुन्हा पदोन्नतीने या विभागाचे प्रांताधिकारी म्हणून या विभागात या अशा शुभेच्छा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना कॉ. संजय तर्डेकर, संजय येसादे, नारायण भडांगे, मुरलीधर कुंभार, समीर पारदे, के. एम. मोमीन, अविनाश पाटील, युवराज पोवार, वसंतराव धुरे, सुधीर कुंभार, नूतन तहसीलदार सागर माने यांनी मनोगतातून अहिर यांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले. त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले. अध्यक्षीय भाषणात प्रांताधिकारी बारवे म्हणाल्या, प्रशासनात अहिर यांच्यासारखे संवेदनशील अधिकारी मोजकेच असतात. आजच्या कार्यक्रमाला असणारी उपस्थितीतच अहिर यांनी तालुक्यात केलेल्या उत्कृष्ट कामाची पोहोच पावती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, डी. डी. कोळी, विकास कोलते, नगरसेवक संभाजी पाटील, नगरसेविका शकुंतला सलामवाडे, माजी उपसभापती दिपक देसाई, शिरिष देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् सभागृह भावूक झाले…

आपल्या चार वर्षांच्या सेवा काळात आजरेकरांनी भरभरून प्रेम दिले. आपण आजरा आणि आजरेकरांना कधीच विसरू शकत नाही. पण शासन निर्णयानुसार बदली झाली असली तरी आजरा सदैव स्मरणात राहील असे सांगताना शेवटी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा… म्हणताना तहसीलदार विकास अहिर यांच्याबरोबरच संपूर्ण सभागृह भावूक झाले.

सर्व उत्सव आनंदात व शांततेत साजरे करा : राजीव नवले
आजऱ्यात शांतता समितीची बैठक


आजरा शहराला शांततेची परंपरा आहे ती कायम पाळा , सर्व उत्सव आनंदात व शांततेत साजरे करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केले . शनिवारी आजऱ्यात होत असलेल्या पारंपारीक शिवजयंती , बसवेश्वर जयंती, अक्षयतृतीया व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली .

या उत्सव काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन कोणीही करू नका . सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा . प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा , कोणावरही कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका असे आवाहन नवले यांनी केले .

संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नाथ देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. . अध्यक्षीय भाषणात तहसीलदार माने यांनी प्रशासनाचे सहकार्य राहील असे सांगितले . तर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास कोणीही कायदा हातात घेऊ नका , प्रशासनाशी संपर्क साधा असे आवाहन केले .

यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई , सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील हारूगडे, मंडल अधिकारी जी . बी . पाटील, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष महादेव टोपले, नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, आनंदा कुंभार , ओंकार माद्याळकर, महेश दळवी, शैलेश पाटील, प्रथमेश काणेकर यांच्यासह शहरातील विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथील दुचाकी अपघातात नवविवाहीत तरुणाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews
error: Content is protected !!