mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 

रस्ते गेले खड्ड्यात…
तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेले आठ-दहा दिवस सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे आजरा शहरासह तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठेकेदारांच्या रस्त्यात वापरणाऱ्या येणाऱ्या डांबरातील पितळ पावसाने अक्षरश: उघडे पाडले आहे. रस्त्यांची कामे सर्वसामान्यांच्या सोयीसाठी की ठेकेदार पोसण्यासाठी असा संतप्त सवाल आता तालुकावासीय उपस्थित करू लागले आहेत.

     शहरातील गल्लीबोळासह राज्यमार्ग, ग्रामीण मार्गातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांची कामे करताना कामाच्या दर्जाकडे अधिकारी वर्गाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे हे स्पष्ट आहे.

     एकीकडे नेतेमंडळी रस्त्यांवर करोडो रुपये खर्च झाल्याच्या बाता मारत असताना दुसरीकडे हे रस्ते चार सहा महिन्यातच जर पुन्हा कामाला येत असतील तर ही निधीची उधळपट्टी असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्ता तयार केल्यानंतर विशिष्ट कालावधीपर्यंत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदारावर सोपवले जाते.परंतु ठेकेदार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणचे खड्डे वर्षानुवर्षे तसेच राहतात. परिणामी याचा त्रास तालुक्यातील वाहनधारक व ठिकठिकाणच्या रहिवाशी मंडळींना सोसावा लागतो.

     नेते मंडळींनी केवळ आपल्या बगलबच्चांना पोसण्यासाठी शासकीय निधीची उधळपट्टी थांबवावी व कामांच्या दर्जाकडे लक्ष द्यावे. अन्यथा याचा फटका भविष्यामध्ये ठेकेदारांऐवजी नेतेमंडळीना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजऱ्यातील ॲग्रो प्रोडयूसर कंपनीला मान्यवरांची भेट


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     स्मार्ट प्रकल्पांतर्गत आजरा ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड आजरा या सीबीओस भेट देण्यात आली.

     श्रीमती रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा तथा प्रमुख डी.आय.यु.स्मार्ट, कोल्हापुर, श्री.प्रविण आवटे, नोडल अधिकारी डी.आय.यु स्मार्ट कोल्हापूर, श्री. राजन कामत, पुरवठासाखळी व मुल्यसाखळी तज्ञ डी.आय.यु स्मार्ट कोल्हापूर, श्री. अक्षय पोवार अर्थशास्त्रज्ञ, तथा वित्त प्रवेश सल्लागार डी.आय.यु, स्मार्ट, कोल्हापूर, व कंपनी संचालक संभाजी सावंत व संभाजी इंजल हे उपस्थित होते.

     भेटी दरम्यान ३५० मे.टन गोदाम बांधकाम व पॅडी क्लीनर पॅडी पॉलीशर, पॅकिंग मशीन, पावर ट्रिलर, पॅडी हार्वेस्टिंग मशीन इ. मशिनरींची पाहणी केली.

पाऊस पाणी


       आजरा शहरासह मंडल मध्ये गेल्या २४ तासात ३९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यातील सर्व बंधारे वाहतुकीकरता खुले झाले असून पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे.

आसपास…

आश्चर्यकारक! वारणा नदीत कार कोसळून बुडालेला तरुण ६ दिवसांनी रेल्वेत जिवंत सापडला!!

      पुणे-बंगळुरु महामार्गावरील वारणा पुलावरून सहा दिवसांपूर्वी नदीपात्रात पडलेल्या कारचा चालक नजीर कांकनडगी याचा अखेर नाट्यमयरित्या शोध लागला. कार नदीत कोसळल्यानंतर बुडालेल्या नजीरचा नदीपात्रात शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. अखेर सहा दिवसांनी मंगळवारी (दि.३०) तो सातारा येथून मिरजेत आलेल्या रेल्वेत मिळून आला. त्याच्यावर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारणा नदी पूल बुडालेल्या नजीरचा सातारा ते मिरज प्रवास प्रवास कसा झाला याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही.

       मूळचा विजापूर येथील व सध्या कुंडलवाडी (ता.वाळवा जि. सांगली) येथे वास्तव्यास असणारा सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर नजीर कांकनडगी गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.२४) रात्री आपली कार (क्रमांक एमएच १० बीएम-८४२८) घेऊन कोल्हापूरहुन कुंडलवाडीकडे निघाला होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वारणा नदीपुलाच्या वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वारणा नदीत कोसळली होती. त्यानंतर जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले. गुरुवारी (दि.२५) सायंकाळी ही कार क्रेनच्या सहाय्याने वर काढण्यात आली, मात्र कारचा चालक नजीरचा मात्र ठावठिकाणा लागला नसल्याने शोधमोहीम सुरू होती.

     अखेर सहा दिवसांनी काल (मंगळवारी) सकाळी तो सातारा येथून आलेल्या रेल्वेत मिरज येथे सापडल्याची माहिती समोर आली आहे. नजीर याच्यावर इस्लामपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

     भर महापुरात नदीपात्रात कार कोसळून अपघात झाल्याने जिवंत असण्याची सुतरामही शक्यता नसताना नजीर चक्क जिवंत असल्याचे पाहून त्याच्या कुटूंबियांचा आणि नातेवाईकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. मात्र वारणा नदी पूल ते सातारा व परत मिरज ते इस्लामपूर प्रवास कसा झाला याचे कोडे उलगडायला काही अवधी जाण्याची शक्यता आहे. या सर्व घटनेचा उलगडा तपासांनंतर निष्पन्न होईल, असे वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.

क्रीडा…

भारताला दुसरे ऑलिम्पिक पदक! मन उभा भाकरने घडवला इतिहास!! मनू भाकेर-सरबज्योतच्या जोडीची कमाल !!!

       पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी काल (दि.३० जुलै) कांस्‍य पदक पटकावले. दोघांनी अचूक लक्ष्‍यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळवून दिले आहे. विशेष म्‍हणजे मनू भाकरचे हे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग अचूक ‘लक्ष्‍यभेद’

      ऑलिम्‍पिकमध्‍ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात प्रत्येकी १० शॉट्सच्या तीन मालिका असतात. सर्वाधिक गुण मिळवणारे संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. अव्वल दोन संघामध्‍ये सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी सामना होतो. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ कांस्यपदकासाठी आमने-सामने होते. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रतामध्ये तिसरे स्थानासाठी पात्र ठरले होते. आज कांस्यपदकासाठी त्‍यांचा कोरियन जोडी ली वॉन-हो आणि ओ ये-जिन यांच्याशी सामना झाला. कांस्यपदकासाठी सामन्‍यात भारताची सुरुवात खराब झाली. सरबज्‍योतने ८.६ तर मनू१०.४ गुण घेत पिछाडीवर राहिले. मात्र यानंतर दाेघांनी दमदार कमबॅक केले. सलग चार शॉट्‍समध्‍ये दोघांचेही गुण अग्रस्‍थानी राहित ८-४ अशी आघाडी घेतली. यानंतर पाचव्‍या मालिकेत मनू भाकर १०.६ गुण घेत निर्णायक आघाडीकडे वाटचाल केली. यानंतर भारतीय जाेडीने १४-१० अशी निर्णायक आघाडी घेत कांस्‍य पदकावर आपली माेहर उमटवली.

मनू भाकरच्‍या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नाेंद

     मनू भाकरने यंदाच्‍या ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्‍य पदक पटकावले आहे. यानंतर सलग दुसर्‍या कांस्‍य पदकावरही तिने आपली माेहर उमटवली आहे. हे तिचे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

(बातम्या सौजन्य : online batmya group)


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!