mrityunjaymahanews
अन्य

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

सोहाळे ता.आजरा येथे वृद्धाची आत्महत्या

                    आजरा : प्रतिनिधी

         सोहाळे ता. आजरा येथील वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदा भीमराव दोरुगडे (वय ७८) यांनी आज राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

     त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार विवाहित मुली, एक अविवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

     आजरा पोलीस घटनास्थळी जाऊन माहिती घेत असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

व्यापाऱ्यांच्या सीसीटीव्ही कॅमे-यांवर चोरट्यांचा डल्ला…


                ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

      आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरेच चोरट्याने लांबवल्याने आता चोरट्यांवर नजर ठेवायची कशी ? हा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर पडला आहे. तब्बल चार ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बुधवारी रात्री चोरट्याने लांबवले.

       शहरामध्ये चोरीसारखे प्रकार घडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. असे असताना चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लांबवल्याने आता चोरीसारख्या प्रकारावर नियंत्रण ठेवायचे कसे ? हा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावू लागला आहे.

        दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने व्यापारी वर्ग निर्धास्त होता. लक्ष्मीपूजनादिवशी खोराटवाडी येथे किराणा दुकानात झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणानंतर व्यापारी वर्ग खडबडून जागा होऊन सीसीटीव्ही चालू आहेत की नाही याची खात्री देखील करून घेतली जात होती. असे असताना बुधवारी रात्री आजरा शहरातील बाजारपेठेतील चार दुकानदारांचे सीसीटीव्ही कॅमेरेच काय केल्याने आता सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.


छाननीचा आज अंतिम फैसला

                    ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचा भाग असणाऱ्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये काल गुरुवारी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांचे रहिवासी क्षेत्र कारखाना कार्यक्षेत्रा बाहेर असल्याचे कारण दाखवत त्यांच्या  उमेदवारीवर  हरकत घेतल्याने व इतर काही मंडळींच्या अर्जामध्ये तांत्रिक अडचणी असल्याने हे अर्ज निकालात प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

       आज या सर्व निकालावर निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याने आज उमेदवारी अर्ज छाननीचा अंतिम फैसला होणार आहे.

काल झालेल्या प्राथमिक छाननीतील परिस्थिती अशी….

उत्पादक गट १ (उत्तूर – मडिलगे) 

अपात्र शंकर आजगेकर (कारखाना कर्मचारी व इतर कारणांमुळे बाद), २ प्रलंबित               

उत्पादक गट २ ( आजरा श्रुंगारवाडी)

अवैध – संभाजी पाटील ( ऊस उत्पादक नाही)प्रलंबित – २     

त्पादक गट ३ ( पेरणोली गवसे) १ प्रलंबित    उत्पादक गट ५ ( हात्तिवडे मलिग्रे) चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांचा अर्ज निकाल राखीव

बिगर उत्पादक गट

अपात्र– नौशाद बुड्डेखान, प्रलंबित ३

अनुसूचित जाती जमाती

प्रलंबित १

महिला राखीव गट

प्रलंबित २

इतर मागास गट

प्रलंबित १ भटक्या विमुक्त प्रलंबित २

उत्पादक गट ५ ( हात्तिवडे मलिग्रे) मध्ये उत्तम रेडेकर यांनी चेअरमन सुनिल शिंत्रे यांच्या अर्जावर हरकत घेतली आहे त्यामुळे प्रलंबित


वावटळ की वादळ…?


     ✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत

      आजरा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे वरिष्ठ नेते मंडळींकडे बिनविरोध निवडणुकीचे साकडे घातले जात असताना छाननीच्या दिवशीच विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांना उमेदवारीपासून रोखून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी करण्यात आलेली व्यूहरचना पहाता हे तात्पुरते तयार झालेले वावटळ की राजकीय पटलावरील वादळ ? याचे उत्तर निवडणुकितील भविष्यातील हालचालीवर अवलंबून रहाणार आहे.

       मुळातच प्रा. शिंत्रे यांनी अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे घेतल्यापासून सत्तारूढ आघाडीमध्ये अनेक कारणावरून धुसफुस सुरू होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रा. शिंत्रे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून संभ्रमावस्था निर्माण केली होती. सध्या चर्चेत असणाऱ्या दोन्हीही परस्परविरोधी आघाड्यांशी समान अंतर ठेवण्याबरोबरच तिसऱ्या आघाडीची व्यूहरचना करण्यामध्ये ते गुंतले होते. हे सर्व करत असताना गेली दहा वर्षे बिगर उत्पादक गटातून उमेदवारी करणाऱ्या प्रा. शिंत्रे यांनी यावेळी मात्र हात्तिवडे – मलिग्रे या उत्पादक गटातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले त्यांची ही भूमिका अनेकांना रुचणारी नव्हती.

       अखेर त्यांना उमेदवारी पासून रोखणे हा एकमेव पर्याय विरोधकांकडे राहिला होता. त्यामुळे एका सभासदाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आप्तस्वकीय मंडळींनी च त्यांचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

       शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या प्रा. शिंत्रे यांच्या विरोधात हरकत नोंदवणाऱ्यांसोबत काही शिवसैनिकच होते त्यामुळे या सर्व प्रकरणाचे बोलवते धनी कोण ? हा प्रश्न आता चर्चेत येऊ लागला आहे.

      त्यामुळे हरकतीबाबत काहीही निर्णय झाला तरी या वावटळीचे निवडणुकीत वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिनविरोधची चर्चा करणाऱ्या मंडळींनी छाननीवेळी उभा केलेली वकिलांची फौज पाहता कोणत्या अंगाने निवडणूक बिनविरोध होईल ? हा प्रश्न निकालात निघाला आहे.


दाभिल येथे आम. आबिटकर यांची घनसाळ शिवारभेट

 

                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        आजरा तालुक्यातील घनसाळ उत्पादक दाभिल या गावी शिवार भेट देत घनसाळ शेतीची पहाणी  आ. प्रकाश आबिटकर यांनी केली.

         आजरा तालुक्यातील दाभिल या गावी दर्जेदार घनसाळ भात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते. आजऱ्यासह कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र व देशभरामध्ये ही घनसाळ प्रसिद्ध आहे. परंतू ज्या पध्दतीने या तांदळाचे मार्केटींग करणे गरजेचे असताना तसे न झाल्यामुळे काही व्यापारी मंडळींनी अन्य जातीचा सुवासिक तांदूळ आजरा घनसाळ म्हणून विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे घनसाळ म्हणून मुळ ओळख असलेल्या आजरा घनसाळ तांदळाची पिढेहाट होताना दिसत आहे.

        याकरीताच दाभिल गावी भेट घनसाळ उत्पादन करणारे शेतकरी व ग्रामस्थ यांचेसमवेत आम.आबिटकर यांनी शिवार भेट देत घनसाळ शेतीची शेतीची पहाणी केली. सेंद्रीय पध्द्तीने पिकवलेला घनसाळ हा खाण्यासाठी खमंग व दर्जेदार असून सर्वांनाच आहारामध्ये आवश्यक वाटतो. त्यांची प्रचार प्रसिध्दी व ब्रँडींग करण्यावर कृषि विभागाने भर देण्याबाबतच्या सुचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.


 पाडव्याच्या मुहुर्तावर जनता बँकेकडे १० कोटी १० लाखाच्या ठेवी जमा

                      ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

            जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर रु. १० कोटी १० लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास व बँकेबद्दल असलेली अत्मीयता दिसून दृढ आली. तसेच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

          बँकेने अनेक  पुरस्कार प्राप्त केले असूनबँकेकडे रु. ३४२ कोटीच्या ठेवी, रु. २३३ कोटीची कर्जे व रु. १३४ कोटीची गुंतवणूक असून बँकेने सलग शुन्य टक्के नेट एन पी ए ठेवण्यामध्ये सातत्य राखले आहे. बँकेच्या एकूण १७ शाखा कार्यरत असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे असून नुकतेच रिझर्व बँकेने नवीन तीन शाखांना नेसरी, ता गडहिंग्लज, कळंबा, ता करवीर, पेठवडगांव, ता हातकणंगले या ठिकाणी शाखा उघडणेस परवानगी दिलेली आहे. सदरच्या तीनही शाखा लवकरच लोकार्पण करणेत येतील अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री मुकुंददादा देसाई यांनी दिली.

         बँकेने आज पर्यंत ४७५ लोकांना जवळपास रु. ४८ कोटीची कर्ज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेमार्फत बिनव्याजी आदा केलेले आहेत. त्याचा सर्व मराठा समाजातील तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा. तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत रु. १० लाखाच्या सबसिडीची कर्जेही देवून बहुजन समाजातील उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँकेने केलेले आहे. त्याचाही, फायदा उद्योजकांनी घ्यावा असे आव्हान बँकेचे चेअरमन श्री मुकुंददादा देसाई, • चेअरमन महादेव टोपले, सीईओ एम. बी. पाटील व सर्व संचालक यांनी केले.


जे. पी. नाईक पतसंस्थेमध्ये  पाडव्याला १ कोटी १४ लाखाच्या ठेवी जमा

                    ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

     आजरा येथील शिक्षणतपस्वी डॉ. जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये दीपावली पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर १ कोटी १४ लाख ठेवी जमा झाल्या. स्वच्छ कारभार, आकर्षक व्याजदर ठेवीदारांचा विश्वास आणी तत्पर सेवा यामुळेच ठेवीदारांची आग्रही पसंती दिसुन येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी दिली.

         यावेळी उपाध्यक्ष सुभाष विभुते व सर्व संचालक, जनरल मॅनेजर संतोष जाधव, संजय तेजम, निकीता स्वामी, उत्तम कुंभार, तुषार येरूडकर, सुभाष पाटील उपस्थित होते.


हात्तीवडे येथे उद्या महाआरोग्य तपासणी शिबिर

                        ◼️आजरा: प्रतिनिधी◼️

         हात्तीवडे ता. आजरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

        शिबिरामध्ये ईसीजी रक्तातील साखर, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर, मूत्र विकार, हाडांचे विकार यासह विविध विकारांची तपासणी केली जाणार आहे. सदर शिबिर हे मोफत असून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्या मंदिर, हात्तीवडे येथे सुरू राहणार असल्याचे शिवसेना तालुकाध्यक्ष युवराज पोवार, कृष्णा पाटील यांनी सांगितले.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणीची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

धक्कादायक… रोहन देसाई यांचा अखेर मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!