

मारुती देसाई यांचे निधन

पेरणोली ता. आजरा येथील हे.भ.प. मारुती बचाराम देसाई ( वय ८५) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे ,तीन मुली, जावई ,सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते माजी उपसरपंच उत्तम देसाई यांचे वडील व जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव देसाई यांचे कनिष्ठ बंधू होत.

काजूला हमी भाव मिळावा आजरा तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचे धरणे

आजरा : प्रतिनिधी
काजू पिकाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजरा तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर मागण्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयात काजू चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र काजू पिकाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. जगभरातून होणाऱ्या आयात काजू मुळे स्थानिक बाजारात काजू बी चे दर गडगडले आहेत. गेल्या ३ ते ४ वर्षात २०० रूपयांवरून ८० ते ९० रूपयांपर्यंत दर घसरले आहेत. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हमीभाव मिळणे आवश्यक आहे.
शेजारील गोवा राज्यात गोवा सरकारने काजू बी ला १५० रूपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. दापोली विद्यापीठाने काजू उत्पादन खर्च १२९ रूपये प्रती किलो असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वामीनाथ अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव म्हणजे किमान १९३ रूपये मिळणे रास्त आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन राज्य शासनाने काजू बी ला २०० रूपये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
या आंदोलनात कॉ. शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, नारायण राणे, मनप्पा बोलके, दौलती राणे, संजय घाटगे, नारायण भडांगे, शांताराम हरेर, निवृत्ती मिसाळ, जानबा धडाम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


व्यंकटराव महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

आजरा: प्रतिनिधी
व्यंकटराव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक धोरण शिक्षक व विद्यार्थी भूमिका’ विषयी कार्यशाळा उत्साहात पार पडली.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नीत व देवचंद कॉलेज अर्जुननगर, अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “नवीन शैक्षणिक धोरण : शिक्षक व विदयार्थ्याची भूमिका ” यावर कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष शेळके होते. सदर कार्यशाळा ही दोन सत्रात संपन्न झाली. पहिल्या सत्रांचे संसाधन व्यक्ती तु. कृ. कोलेकर महाविद्यालय नेसरीचे मा. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी नवीन शैक्षणिक धोरण : शिक्षकांची भूमिका कशी असावी, विज्ञान- तंत्रज्ञान धोरणांच्या आधारे नवीन आकृतीबंध तयार असून, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना ५० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. स्वायत्त व रिसर्च विद्यापीठे स्थापन होणार असून प्रत्येकाने कौशल्यपूर्ण शिक्षण घेवून सक्षम झाले पाहिजे सर्व भाषा आत्मसात परिपूर्ण तंत्रज्ञानाने डिजीटल युगात स्वःताला अपडेट करावे लागणार आहेत असे मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
दुसऱ्या सत्राचे संसाधन व्यक्ती कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी तथा संचालक मौनी विद्यापीठ गारगोटीचे मा. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थाची भूमिका कशी असावी करियर करण्यासाठी भाषा, व्यक्तिमत्वाची गरज नसून, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते कारण शिक्षणामुळे उंची वाढते आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून उत्तुंग भरारी घेता येते. परिस्थीती हि लढायला शिकवते त्यातूनच आवडीच्या क्षेत्रात नावलौकीक करता येतो. असे मत आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. संसाधन व्यक्तींचा सत्कार शिंपींच्या हस्ते केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ. शेळके व समन्वयक प्रा. खामकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये शेळके यांनी महाविद्यालयाची वाटचाल, धोरणे व कार्यशाळेचे महत्व काय आहे यांचे अभिभाषण केले. या कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व मान्यवर संचालक, तसेच अग्रणी महाविद्यालय अंतर्गत सहभागी डी. आर. माने कॉलेज, कागल कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी, देवचंद कॉलेज अर्जुननगर, दूधसाखर महाविद्यालय बिद्रीचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी, व्यंकटराव कॉलेजचे प्राचार्य कुंभार, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिद्धिविनायक फाउंडेशन कडून प्राथमिक आरोग्य केंद्रास चारशे शुगर ट्यूब प्रदान

उत्तुर: प्रतिनिधी
येथील सिद्धिविनायक फाऊंडेशन कडून उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४०० शुगर ट्यूब प्रदान करण्यात आल्या.सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सिद्धिविनायक फाउंडेशनच्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर या उपक्रमांतर्गत ज्या रुग्णांना शुगर आहे अशा लोकांची शुगर प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत तपासून दिली जाते. याकरीता टेस्टिंग ट्यूब ची आवश्यकता असते, प्राथमिक आरोग्य केंद्रात या शुगर टेस्टींग ट्यूब ची कमतरता भासू नये व कोणताही रुग्ण या सेवेपासून वंचित राहू नये या उद्दात्त हेतूने फाऊंडेशन कडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.रविकांत शर्मा यांच्याकडे या ट्यूब सुपुर्द कऱण्यात आल्या.
याप्रसंगी पत्रकार अशोक तोरसकर,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जवाहिरे,सदस्य मंदार हळवणकर,भारत जाधव,शरद ढोणुक्षे,महेंद्र मिसाळ,विजय गुरव,स्वप्निल इंगळे,प्रविण जवाहिरे,गुरुनाथ जाधव,लॅब कर्मचारी आनंदा चव्हाण उपस्थित होते अर्चना देसाई यांनी आभार मानले.


त्रिवेणी पुरस्काराचे वितरण

उत्तुर : प्रतिनिधी
येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणीक व क्रीडा संस्था यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण बहिरेवाडी येथील पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक स्मारक येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ चे माजी अध्यक्ष रविंद्र आपटे होते.
प्रास्ताविक प्रा. श्रीकांत नाईक यांनी केले. समाजात वेग वेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार दर वर्षी त्रिवेणी मार्फत केला जातो. संस्थे तर्फे सलग २४ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. संस्थेकडून दिले गेलेले या वर्षीचे पुरस्कार पुढील प्रमाणे दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार (राज्यस्तरीय) मेघन देसाई. पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार – कुसुम भोसले, नंदकुमार शेटके, विवेक ठाकुर, शिवदास मुंढे, संभाजी पोवार, सीमा मुळे – पेटकर, जगदीश भदरगे, सुनिल रेडेकर, गीतांजली चौगुले, दिगंबर गीरीबुवा, जयश्री लकांबळे, विक्रम यमगेकर, गुरुनाथ ठाकुर. परम पूज्य बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार – अनंत पाटील. त्रिवेणी जीवन गौरव पुरस्कार – अनंतराव आजगावकर, प्रा. अरविंद देशपांडे, सदानंद देवरू, पी. एन. देशपांडे, दत्तात्रय मुळीक, प्रा. पी. एन. गणाचारी. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिप्पूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी विश्वनाथ करंबळी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, रत्नजा सावंत, अनिल चव्हाण, किरण आमनगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आभार संस्थेचे अध्यक्ष टी. के. पाटील यांनी मानले.

इ.१२ वी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण

आजरा: प्रतिनिधी
इ.१२ वी बोर्ड लेखी परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ पासून सुरु होत आहे. आजरा तालुक्याच्या ठिकाणी एकमेव आजरा महाविद्यालय, आजरा (०५३१) हे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षेसाठी आजरा ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, पंडीत दिनदयाळ ज्युनिअर कॉलेज, ओम पॅरामेडिकल कॉलेज, व झाकीरहुसेन उर्दु कॉलेज, आजरा इ. कॉलेजचे एकूण विद्यार्थी ७९३ इतके प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेवून त्यांची बैठक व्यवस्था आजरा महाविद्यालय व आजरा हायस्कूल येथे करणेत आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळ, पोलीस स्टेशन, दूरसंचार केंद्र व महावितरण विभागाला सहकार्य करावे यासाठी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे परीक्षार्थिना याचा लाभ मिळणार आहे. अन्य कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता केंद्रप्रमुख, अधिक्षक, उपप्रचार्य व प्राचार्यांनी घेतली आहे.
दररोजची बैठक व्यवस्था बदलती असणार असून बैठक व्यवस्था आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी बोर्डवर प्रसिध्द केली जाईल. परीक्षेसाठी सुपरवायझर, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करुन संबंधितांना पर्यवेक्षणासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थिनी आपापल्या विषयाच्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेस वेळेत हजर राहून परीक्षा सुरळीत पार पाडणेसाठीचे आवाहन केंद्र प्रमुख श्री. मनोज पाटील यांनी केले आहे.


निधन वार्ता
सुरेश जाधव

आजरा येथील पंचायत समिती मधील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश धोंडीराम जाधव( वय ६०) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

छायावृत्त…

आजरा नळ पाणीपुरवठा योजनेची गळती काही थांबावयास तयार नाही. एकीकडे महामार्गाच्या गटर्सचे काम सुरू असताना दुसरीकडे नळ पाणीपुरवठा योजनेस गळती लागल्याने गटर्सकरिता खोदलेल्या चरीमध्ये पाणीच पाणी झाले होते.

भाजपा महिला आघाडीच्या वतीने आजरा शहरातील महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.



