mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. १३  डिसेंबर २०२४              

उत्तूर येथे मटका जुगार घेणाऱ्यावर कारवाई

            उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     उत्तूर ता. आजरा येथे मटका जुगार घेणाऱ्या रमेश शिवराम रक्ताडे (वय ४८ वर्षे, राहणार इंदिरानगर, उत्तूर) याला पोलिसांनी मटका घेताना रंगेहात पकडून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

      पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार उत्तूर ते गारगोटी मार्गावर असलेल्या स्वस्तिक इंडस्ट्रीजच्या मागील बाजूस रमेश रक्ताडे हा मटका जुगार घेत असताना आढळला. त्याच्याजवळ मटका चिठ्ठ्यांसह इतर साहित्य व रोख रक्कम आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद गणेश विठ्ठल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिली आहे.

‘वंचित’ कडून परभणी येथील घटनेचा निषेध
तहसीलदारांना दिले निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      परभणी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, संविधानाच्या प्रतिकृती ची मोडतोड करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करून, आजरा तालुका तहसीलदार मा.समीर माने याना वंचित बहूजन युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

      परभणी येथील घटनेमुळे समस्त भारतीय, संविधान मानणारे, दलित शोषितांची मने दुखावली आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करून, असे कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याच्या मागे मास्टर माईन्ड कोण आहे याचा शोध घेवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात संबधित घटनेच्या निषेधार्थ उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असलेचे निवेदनात म्हटले आहे.

      यावेळी वंचित बहूजन युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मासोळे, उपाध्यक्ष संदीप कांबळे, काॅ. काशिनाथ मोरे, संपर्क प्रमुख भिकाजी कांबळे, संघटक गुणाजी कांबळे, बाळासाहेब कांबळे, तेजस्विनी देसाई, राजश्री सावंत, किरण के.के, रामदास चव्हाण, देवदास सुर्यवंशी, सुरेश दिवेकर, विलास पाटील, मारूती कांबळे, संभाजी कांबळे, वैभव कांबळे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाचा समतेचा विचारच महाराष्ट्राला पुढे नेणारा : कॉ. संपत देसाई

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वारकरी संस्कृती हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती असून समतेचा विचार गावोगावी पोहचवण्याचे काम आजरा तालुका वारकरी मंडळ करीत आहे. या मंडळाच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहावे असे विचार कॉ. संपत देसाई यांनी मांडले. ते आज शेळप येथे वारकरी मंडळाच्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष ह.भ.प. गौरव सुतार महाराज, उपाध्यक्ष ह.भ.प. संतराम कांबळे महाराज, सचिव ह.भ.प. पांडुरंग जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

      कॉ. देसाई आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की वारकरी संतांनी आजच्या वर्तमान प्रश्नांची उत्तरेही आपल्या मांडणीत दिली आहेत. भेदाभेद, भ्रम, अमंगळ म्हणणारी ही परंपरा आधुनिक विचार मांडते. आज स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये जी संविधानाने दिली आहेत त्या मूल्यांची पेरणी या भूमीत वारकरी संतानी तेराव्या शतकांपासून केली आहे. म्हणूनचं अभिमानाने सांगावे लागते की महाराष्ट्राची खरी संस्कृती ही वारकरी संस्कृती आहे.

      यावेळी बोलताना मंडळाचे तालुका अध्यक्ष ह.भ.प. गौरव सुतार महाराज म्हणाले, तालुक्यात संतांचे विचार पोहचवणे, वारकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यासाठी या तालुक्यातील वरकाऱ्यांना आम्ही संघटित केले आहे. वारकरी संस्कृती, विचार जनतेत घेऊन जाण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जाणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी वारकरी भवन उभा करण्याचा संकल्प असून तो लवकरच पूर्णत्वाला नेला जाईल.

      यावेळी चंद्रकांत घुणे, शामराव पाटील, संतु महाराज यांनीही मनोगते व्यक्त केली. गावच्या वेशिपासून दिंडी निघाली. भैरवनाथ मंदिराजवळ वारकरी मंडळाच्या शेळप शाखेचे उद्घाटन करण्यात आले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शांताराम पाटील, बाबुराव आडे, गंगाराम येडगे, संभाजी पालकर, दीपाली गुरव, कल्पना जाधव, संगीता माधव, रेखा नांदवडेकर, रेखा बटकडली यांच्यासह तालुक्यातून वारकरी मोठ्या संख्येने आले होते.

स्वागत प्रास्तविक सुधाकर पाटील यांनी केले तर आभार बाळू पाटील यांनी मांडले.

खेडे येथे भगवद गीता जयंती उत्सव उत्साहात

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      प.पू. सदगुरू भिकू रामा चौगुले उर्फ भर्तरीनाथ महाराज वारकरी सांप्रदाय भक्ती सेवा मठ खेडे यांच्या वतीने भागवद् गीता जयंती उत्सव उत्साहात पार पडला. या उत्सव कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ प्रवचन, हरिकीर्तन व जागर असे कार्यक्रम संपन्न झाले.या उत्सवामध्ये विविध गावातील भजनी मंडळे व मान्यवर सहभागी झाले होते.महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

निधन वार्ता
तुकाराम केसरकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       मडिलगे, तालुका आजरा येथील तुकाराम भिमा केसरकर (वय ६३ वर्षं) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी पत्नी असा परिवार आहे.

तानाजी चव्हाण


             उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उत्तूर ता. आजरा येथील तानाजी हरी चव्हाण (वय वर्ष ६५) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगा असून मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

        आजचा कार्यक्रम…

      मौजे वाटंगी, तालुका आजरा येथे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २.०० वाजता वाटंगी येथील रवळनाथ मंदिर जवळ.  आयोजित करण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!