शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४


तुम्ही कामे सांगा मी मार्गी लावतो : आमदार शिवाजीराव पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी येथील ग्रामस्थांनी दिलेले मतदान पाहून वाटंगीबद्दल आपली निश्चितच आपुलकी वाढली आहे.एकटा शिवाजीराव पाटील हा आमदार नसून त्याला मतदान करणारा प्रत्येक घटक हा आमदार आहे, येत्या पाच वर्षांमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीसह मतदारसंघांमध्ये भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण बांधील आहोत असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. वाटंगी येथे आयोजित आभार दौऱ्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समुह प्रमुख अशोकअण्णा चराटी होते. यावेळी आमदार पाटील यांचा वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी म्हणाले, हातामध्ये कोणत्याही संस्था व गट नसताना वाटंगी येथील तरुणांनी विधानसभा निवडणुकीत शिवाजीभाऊंना दिलेले मतदान कौतुकास्पद आहे. विकास कामांमध्ये निश्चितच वाटंगी या गावाचा सकारात्मक विचार यापुढे होईल.
यावेळी जयवंत सुतार, समीर पारदे, संदीप चौगले, संभाजी सरदेसाई संग्राम अडकुरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी संभाजी बापट, बळवंत शिंत्रे, सी.आर. देसाई, संदीप देसाई,संतोष चौगले, खंडेराव देसाई, रवी देसाई, बाळू तेजम, शामराव खुळे, वर्षा बागडी, विकास बागडी, प्रकाश पाटील, शिवणगे सर, भाजपा आजरा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रसाद देसाई यांनी केले तर आभार उमेश घोरपडे यांनी मानले.
संविधान द्रोहींहींवर कारवाई करा : संविधान संवर्धन चळवळीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाविरोधात व अशी षडयंत्र करणाऱ्या संविधानद्रोहींवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा संविधानिक मार्गाने करण्याचा इशारा संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष ,संघटना,संस्था यांनी दिला आहे.
आजरा येथे संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष संघटना संस्था, व्यक्ती यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तहसीलदार यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. डॉ. उल्हास त्रिरत्ने, कॉ. शिवाजी गुरव, नितीन राऊत, किरण के.के. ,मेघराणी भाईंगडे, मनीषा गुरव,संदीप कांबळे,द्वारका कांबळे,शिवाजी इंगळे,दशरथ सोनुले,रविंद्र नावलगी,विजय कांबळे,सुरेश दिवेकर,अमित सुळेकर,दत्तात्रय पाटील,स्मिता कांबळे,महादेव सुतार,डॉ.सुदाम हरेर,महादेव कांबळे,प्रशिक कांबळे,आदित्य. कांबळे, सुर्यकांत कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनामध्ये परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील “भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची” विटंबना करून, तोडफोड करण्यात आली. तो इसम परभणी तालुक्यातील मिर्झापुर या गावचा रहिवाशी असुन ती व्यक्ती खेडुत स्वभावाचा असुन, वरील प्रकारचे कृत्य करण्यासाठी त्या व्यक्तीस कोणी भाग पाडले? या सर्व घटनेमागे फार मोठे षडयंत्र असून, ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत, भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाचा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा आहे. अशी भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शंकरलिंग विद्या मंदिर, मडिलगे व कै. केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडीचा प्रथम क्रमांक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी ,शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये दुसऱ्या टप्प्यात आजरा तालुक्यातील शंकरलिंग विद्यामंदिर मडीलगेने प्रथम, विद्यामंदिर रायवाडा शाळेने द्वितीय आणि विद्यामंदिर हाळोलीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. खाजगी शाळा विभागामध्ये कै. केदारी रेडेकर हायस्कूलने प्रथम, छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळीने द्वितीय तर वाटंगी हायस्कूल वाटंगीने घेणे तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल सर्व बक्षीस पात्र शाळांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हात्तिवडे येथे योग शिबिर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तिवडे ता.आजरा येथे एकदिवशीय योग शिबीर उत्साहात पार पडले. शिबीराचे उद्घाटन होनेवाडीच्या सरपंच प्रियांका आजगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी हात्तिवडेच्या सरपंच शकुंतला सुतार होत्या.
या शिबीरामध्ये हात्तिवडे, होनेवाडी येथील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व योग गुरू बाळकृष्ण दोरूगडे यांनी योगा कृतीतून प्रात्यक्षिक दाखविले. नियमित योगामुळे आपण शारिरिकदृष्या कसे मजबूत, निरोगी राहतो हे त्यांनी दाखवून दिले.
शिबीरसाठी एस. के. हरेर, एस. ए. हरेर, बी. आर. हरेर, एम. जे. पंडीत, सदाशिव सुतार, कृष्णा खाडे, सविता हरेर, लिलावती पंडीत, आश्विनी हरेर यांनी परिश्रम घेतले.
दाभिल येथे उद्या दशावतारी नाटकाचे आयोजन
गवसे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल ता.आजरा येथे रविवार दि. १५ डिसेंबर रोजी दहिकाल्यानिमित्त दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दाभिल येथे दहिकाला उत्सव साजरा होणार आहे.
दहिकाल्यानिमित्त रविवारी रात्री ११ वाजता कारिवडे (ता. सावंतवाडी) येथील देव हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘वैभवलक्ष्मी’ हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.





