रवीवार दि. १५ डिसेंबर २०२४


आमदार प्रकाश आबिटकर यांची मंत्री पदी वर्णी…?
आज घेणार मंत्री पदाची शपथ

ज्योतिप्रसाद सावंत
सलग तीन वेळा राधानगरी – भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार प्रकाश आबिटकर यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती निश्चित झाली असून आज त्यांचा शपथविधी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राधानगरी- भुदरगड मतदारसंघांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असे राहिले आहे. सर्वसामान्यांचा आमदार अशी त्यांची मतदारसंघात ओळख राहिली असून सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे.
सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ, विकास कामांचा व्यापक दृष्टिकोन व तरुण कार्यकर्त्यांचा ताफा या जोरावर त्यांनी ‘कार्यसम्राट’ अशी बिरुदावली मिळवत सलग तीन व वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष त्यांना मंत्रिपद मिळणार का ? याकडे लागून होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या राज्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज त्यांचा मंत्री पदाचा शपथविधी होईल.
भविष्यात मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्षसंवर्धन गरजेचे : डॉ. मधुकर बाचूळकर.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या बेसुमार वृक्ष तोड आणि उद्योग इंडस्ट्रिज मुळे वृक्ष नष्ट होत आहेत, त्यामुळे पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईड याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढून तापमान वाढ होत आहे. अनेक रोगराईला सामोरे जात आहोत,त्यामुळे मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्ष संवर्धन गरजेचे आहे, असे मत वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ.. मधुकर बाचूळकर यांनी हारूर ता. आजरा येथील फलोद्यान पार्क येथील कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना टीम आजरा चे डॉ. प्रविण निंबाळकर होते.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले , आपला देश अनेक जैविक वनस्पतीपासून समृद्ध आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, शतकोटी वृक्ष लागवड झाली मात्र त्यातील वृक्ष किती जगले याची नोंद शासन दरबारी नाही ही शोकांतिका आहे, प्लास्टिक वापरावर बंदी आहे मात्र निर्मितीवर का नाही ? प्लास्टिक वापराने प्रदूषण होत आहे, ही बाब चिंतेची आहे, किमान एका व्यक्तीने आपल्या देशात एक तरी झाड लावले व जगविले तर फार मोठे काम होईल मात्र याकडे बुद्धिजीवी नागरीकांचे दुर्लक्ष आहे, भविष्यात या समस्या अशाच राहिल्या तर ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येईल, यासाठी झाडे लावून ती जगविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बेसुमार ऊस लागवड सोडून इतर पिके व ती सेंद्रियपद्धतीने केली तर चांगले होईल, अन्यथा पुढील पिढीला आपण काय देणार याचा विचार होणे गरजेचे आहे, हारूर युवक व ग्रामस्थांनी राबविलेला फलोद्यान पार्क पाहून समाधान वाटल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश रेडेकर, विलास सुतार सुभाष पाटील, सयाजी सावंत अमोल रेडेकर यांच्यासह, महसूल अधिकारी प्रकाश जोशीलकर, गिरीधर रेडेकर महेश पाटील, तानाजी खाडे, भारती चव्हाण वसंत सावंत, रावसाहेब नलवडे, प्रथमेश रेडेकर संदीप रेडेकर यांच्यासह सरंबळवाडी हायस्कुल चे मुख्याध्यपक सुभाष गोरुले, शिवाजी विद्यालयचे शिक्षक परीतकर व धनगर आणि दोन्ही विद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.
आभार अमोल रेडेकर यांनी मानले.
इव्हीएम विरोधातील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उद्या सोमवारी येथील संभाजी चौकात आयोजीत केलेला इव्हीएम विरोधातील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,काँग्रेस,श्रमिक मुक्ती दल, लाल बावटा गिरणी कामगार, रिपब्लिकन सेना आदी घटक पक्षांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई होते.
यावेळी काँ. संपत देसाई म्हणाले, माझं मत मी कोणाला दिलं आहे हे कळण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार असून इव्हीममुळे आपले मत कुठं गेलं आहे हेच कळत नाही. किंवा दिलेले मत इव्हीएमशी छेडछाड करून बदलले जाऊ शकते असे आता प्रत्येक नागरिकाला वाटत आहे.
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख संभाजी पाटील म्हणाले, इथूनपुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी महाविकास आघाडी च्यावतीने आजरा येथे मोर्चाचे आयोजित करण्यात आले आहे. तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, इव्हीएम विरोधात आज-यातून सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रात रान पेटणार आहे. समीर चांद यांनी येथून पुढचा लढा महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याची सूचना मांडली.
यावेळी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन लढा उभा करणे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून संघटितपणे विविध समस्येवर आंदोलन करणे, समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेत काँ. संजय तर्डेकर, संजय घाटगे,प्रकाश मोरूसकर, सुरेश दिवेकर आदींनी सहभाग घेतला.
यावेळी जनता बँक उपाध्यक्ष अमित सामंत,संचालक रणजीत देसाई, विक्रम देसाई,रविंद्र भाटले,बाकीव खेडेकर,दौलती राणे, हिंदुराव कांबळे, दौलती मिसाळ, अभिजीत मनगूतकर आदी उपस्थित होते.





