mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार  दि. २२ सप्टेंबर २०२५   

अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा नोंद… पाच जखमी, एक गंभीर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संभाजी चौकातील हॉटेल मॉर्निंग स्टार समोर आयशर ट्रक वरील ताबा सुटून रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या अल्टो कार सह स्प्लेंडर मोटरसायकलला दिलेल्या धडकीत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.यामध्ये विमा एजंट संजय गोपाळ यादव,कमल संजय यादव, शुभम संजय यादव, गोपाळ बाळू यादव व मसणाप्पा सखाराम पोवार ( सर्व रा. चाफेगल्ली आजरा ) हे जखमी झाले आहेत.यापैकी संजय यादव हे गंभीर जखमी असून गोपाळ बाळू यादव यांच्यासह इतरांवर ठिकठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आयशर ट्रक चालक अभिषेक छोटेलाल द्विवेदी (रा.बटाला, लक्ष्मीपुरी, एकता नगर, इंदोर, मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दारूचे सेवन करून वाहन चालवत असताना वाहनाचा ताबा सुटल्याने सदर अपघात घडल्याचे पोलिसात नोंद करण्यात आले आहे.

या अपघाताला नेमके जबाबदार कोण ? याबाबत मात्र शहरवासीयात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

नवरात्रीत संधीचे सोने करण्यासाठी इच्छुकांची घालमेल

ज्योतिप्रसाद सावंत

दसरा-दिवाळी पाठोपाठच नगरपंचायत निवडणुकीचे नगारे वाजू लागल्याने यावर्षी तरुणाई व महिला मतदार वर्गाचे मतदान नवरात्रीच्या निमित्ताने  आपलेसे करण्यासाठी नगरपंचायती करता इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांची चांगलीच धडपड सुरू आहे. यामुळे नवरात्र उत्सव मंडळांचे उखळ पांढरे होण्याची शक्यता दिसत आहे.

लांबलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुका यावर्षी कोणत्याही परिस्थितीत घेण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. अगदी त्या दिवाळीनंतर लागलीच होण्याची शक्यता आहे.

संभाव्य प्रभागवार आरक्षणाची शक्यता गृहीत धरून अनेक इच्छुकांनी नवरात्र उत्सव मंडळांना सढळ हाताने मदत देण्यास सुरुवात केली आहे.

‘नगरसेवक’ पदाची बिरुदावली मिळवण्यासाठी अनेक जण गेले दोन ते तीन वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. संभाव्य आघाड्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. सर्वसामान्य मतदारांसमोर नवरात्रीच्या माध्यमातून जाण्याची ही संधी जाऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत.

पुढचे पुढे बघू… असे म्हणत नवरात्रोत्सव मंडळांच्या कारभाऱ्यांनीही तूर्तास अशा मंडळींकडून जमेल ते सहकार्य घेऊन नवरात्र उत्सव दणक्यात पार पाडण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे.

दुर्गा मातेला साकडे

नगरपंचायतीवर जाण्याचे आपले स्वप्न होऊ नये म्हणून अशा नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गा मातेकडे संभाव्य इच्छुकांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. आता याला सामान्य मतदार किती प्रतिसाद देणार यावरच अशा मंडळींचे भवितव्य अवलंबून आहे.

दुर्गा मातेच्या स्वागतासाठी तालुका वासीय सज्ज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह संपूर्ण तालुका दुर्गा मातेच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.सार्वजनिक मंडळांनी दुर्गा मातेच्या आगमनाची जय्यत तयारी केली असून गेले आठ दिवस सुरू असणाऱ्या पावसाने थोडी उसंत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

घटस्थापना व दुर्गा मातेच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. आज सोमवारी दुर्गामाता मुर्त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने शहरातील भगवा रक्षक, शिवाजीनगर, तुकाई देवी, लायन्स किंग, रवळनाथ मंदिर यासह गांधीनगर येथे मिरवणुकीचे औचित्य साधून डॉल्बीसह विविध आकर्षक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

ग्रामीण भागातही सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

दिव्यांग बांधवांसाठी घरपोच ई-केवायसी सेवा ; नरसू शिंदे यांच्या सामाजिक संस्थेचा उपक्रम


शिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भारत सरकारने यूडीआयडी (UDID) धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केल्याने अनेक दिव्यांग बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोश्रातवाडी येथील समाजसेवक नरसू शिंदे यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी घरपोच ई-केवायसी सेवा राबविण्यात आली. तर संतोष सुतार व गणेश मातवणकर यांच्या सहकार्याने ही मोफत सेवा कोळींद्रे, हंदेवाडी, पोश्रातवाडी, शिरसंगी आदी पंचक्रोशीतील यूडीआयडी कार्डधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमामुळे दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने मिळणार आहे. यावेळी सुरेश बुगडे, आनंदा सुतार, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. नरसू शिंदे सामाजिक संस्थेच्यावतीने समाजहितासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

श्री.प्रशांत सुभाष गुरव यांना राज्यस्तरीय माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कै.श्री.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार भादवण हायस्कूल,भादवणचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,कोल्हापूर विभागाचे सहसचिव डी.एस.पोवार उपस्थित होते.

निधन वार्ता
नानुबाई आरळगुंडकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे ता. आजरा येथील नानुबाई विठोबा आरळगुंडकर वय 79 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

संभाजी आरळगुंडकर यांच्या त्या आई होत.

आवंडी वसाहत आजरा येथे नवरात्र उत्सव निमित्त नऊ दिवस नऊ पैठणी ‘ खेळ पैठणीचा ” कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आवंडी वसाहत, आजरा येथिल शिवजन्मोत्सव व भावेश्वरी मंडळांने आयोजित केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी येथिल व्यावसायीक श्री. सुभाष निकम यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, त्यांच्या सोबतमंडळाचे सहकारी किरण निकम, वैभव बांदेकर, अंकुश मांगले, ऋतिक फगरे, दिनेश कालेकर, चेतन निकम, कुणाल दारुटे अभिजित चौगुले, जयसिंग सावंत, लालु कुरळे, संतोष चौगुले, रघुनाथ ठिकार, शंकर सावंत, विलास अस्वले, अमोल गावडे इ. सर्व गावातील तरुण वर्गाने संपूर्ण गावदेवी तालुक्यातील जागृत देवस्थान आई “श्री भावेश्वरी देवीचा” नवरा उत्सव साजरा करणेसाठी धडाडीचा सहभाग दर्शविला आहे.

देवीच्या देवळात दररोज संध्याकाळी सात वाजता देवीची आरती करण्यात येईल व प्रसाद वाटप होईल. रात्री नऊ वाजता ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आणि नंतर गरबा राञी बारा वाजेपर्यंत खेळला जाईल. प्रत्येक दिवशीच्या विजेत्या स्पर्धकांना पैठणी आणि उपविजेत्याना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

बक्षीस वितरण समारंभ दिनांक ६/१०/२०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाटप करण्यात येणार आहे असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

देवेंद्र-अमृता फडणवीस व राज ठाकरेंमध्ये गुप्तगू …भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्येचा प्रयत्न… राज्याच्या मुख्य सचिवांना ईडीचे समन्स…कृषी कायदे घ्यावे लागले मागे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!