

तर पुन्हा निवडणुकीला उभारणार नाही… : उमेश आपटे

आजरा:प्रतिनिधी
गेल्या पंचवीस वर्षात आजरा साखर कारखाना सुरू असताना डिस्टीलरी प्रकल्प, सहवीज प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत हे तालुकावासीयांचे दुर्दैव आहे. यामुळे कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढत गेला. कारखाना चालवण्याकरता चांगल्या माणसांची गरज आहे. जर आपली आघाडी निवडून आली तर कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी करणे हे आघाडीचे प्रमुख काम राहील. जर कारखान्याचे कर्ज आम्ही सत्तेवर आल्यानंतर येत्या पाच वर्षात कमी करू शकलो नाही व कर्जाचे आकडे वाढले तर पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही असा निर्धार श्री चाळोबा देव विकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनी केला.
उत्तुर येथे श्री जोमकाई देवी मंदिर परिसरात आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आपटे यांनी श्री चाळोबादेव विकास आघाडीची कारखान्याबाबतची धोरणे स्पष्ट केली. आजरा साखर कारखाना हा शेतात भांगलण करायला जाणाऱ्या महिलेपासून ते अगदी ट्रॅक्टर चालक, ऊस तोडणीचे काम करणाऱ्या मजूर वर्गाशी संबंधित आहे. त्यांची रोजी-रोटी या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यावेळी आपण हा कारखाना सक्षमपणे चालवण्याची गरज आहे. कारखाना सहकारातच टिकला पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री चाळोबा देव विकास आघाडीचे नेते अशोकअण्णा चराटी, श्रीमती अंजनाताई रेडेकर,प्रा.सुनिल शिंत्रे, जनार्दन टोपले,दशरथ अमृते, मलिककुमार बुरुड, अभिषेक शिंपी, प्रकाश चव्हाण, भिकाजीराव गुरव,संजय पाटील, सौ. सुनीता रेडेकर, सौ. संगीता माडभगत, यांच्यासह आघाडी समर्थक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये डॉ. आनंद बल्लाळ यांचा शोधनिबंध सादर

आजरा: प्रतिनिधी
मॉरिशस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी ‘मोरस रंगभूमी आणि देवजी पाडिया चंदावरकर यांचे योगदान’ हा शोधनिबंध सादर केला. तसेच मॉरिशस मधील मराठी भाषिक समाजाचा अभ्यास दौरा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.
मॉरिशस विद्यापीठाचे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस येथे ‘भारत आणि मॉरिशस यांच्यातील आंतरसांस्कृतिक संबंध – कला, साहित्य आणि संस्कृतीवरील प्रभाव’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात डॉ. बल्लाळ यांनी शोधनिबंध सादर केला.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान डॉ. बल्लाळ यांनी मॉरिशस विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ मधुमती कुंजल, प्रा. निशी हिरो लक्ष्मी, साहित्यिक प्रा. बिदन आबा, मॉरिशस मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष नितीन बापू, महिला नाटककार देवयानी नागिया आदी अनेकांशी चर्चा करून तेथील मराठी भाषिक समाज आणि मराठी भाषेच्या स्थिती विषयी चर्चा केली. मॉरिशस मधील मराठी शाळांची स्थिती समजावून घेतली. मराठी सांस्कृतिक मंडळाच्या भवानी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात डॉ. बल्लाळ यांनी इतर सहकाऱ्यांच्या साथीने मॉरिशस मधील मराठी भाषेच्या जपणुकीवर भाष्य करणारे पथनाट्य सादर केले.

पेरणोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नावलकर

आजरा: प्रतिनिधी
पेरणोली (ता आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप निवृत्ती नावलकर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
उपसरपंचपदासाठी नावलकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. संकेत सावंत यांनी सुचक म्हणून नाव सुचविले. उपसरपंच नावलकर यांचा सत्कार सरपंच प्रियांका जाधव यांच्या हस्ते झाला.
उपसरपंच नावलकर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. निवड सभेला सदस्य अमोल जाधव, रुपाली पाईम, अश्विनी कांबळे, सुषमा मोहिते, सुस्मिता कालेकर, शुभदा सावंत यांच्यासह अमरसिंह पवार, उदय कोडक, काका देसाई, हिंदुराव कालेकर,गौतम कांबळे, पांडुरंग पाईम, नामदेव मोहीते, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे यांनी आभार मानले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र आजरा तालुका कार्यकारणीची निवड
आजरा:प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली आजरा तालुक्याची ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांची मडिलगे येथे बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष पाटील यांचे स्वागत शिवाजी इंगळे यांनी केले. यावेळी ग्राहक पंचायतीच्या आजपर्यंतच्या कामाची माहिती पाटील यांनी दिली व तालुक्यातील कामाबाबत आढावा घेतला.
यावेळी पाटील म्हणाले, ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी संस्थापक बिंदू माधव जोशी यांनी कायदा करून घेतला ग्राहकांची फसवणूक वीज महामंडळ एस.टी.महामंडळ, दुकानदार, बेकरीवाले, बँका इत्यादी बऱ्याच ठिकाणी होत असते. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर कार्य चालू आहे समजूतीने प्रश्न सुटले नाहीत तर थेट ग्राहक न्यायालयात दाद मागता येते यासाठी समिती ग्राहकांना मदत करते.
आजरा तालुका कार्यकारणीमध्ये अध्यक्ष म्हणून महादेव दत्तू सुतार , उपाध्यक्ष प्रकाश मुरुस्कर, संघटक पदी शिवाजी इंगळे, सचिवपदी संजय घाटगे, कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे, महिला संघटक सुमन कांबळे, सहसंघटक नीलम पाटील, सहसचिव व्हि.डी.जाधव, सदस्य हनुमंत गुरव, भिकाजी कांबळे तसेच आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड विभाग प्रमुख म्हणून शिवाजी गुरव व कायदा सल्लागार म्हणून देवदास आजगेकर वकील यांची एकमताने निवड करण्यात आली.
आभार संजय घाटगे यांनी मानले.

निधन वार्ता
शंकर साटपे

आजरा:प्रतिनिधी
शिरसंगी ता. आजरा येथील शंकर लक्ष्मण साटपे (वय८०वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. मराठा समाजासाठी त्याचबरोबर गोरगरिबांसाठी लढणारा व कै.नरसिंगराव पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून शंकर साटपे यांना शिरसंगी परिसरात ओळखले जाते.’ साटपे मामा ‘ या नावाने ते तालुकावासीयांना परिचित होते.
रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक ८ रोजी होणार आहे.



