

बिनविरोधची
चर्चाच … उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत…..
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम उद्यापासून (दि.६) सुरू होत आहे. याची सुरुवात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून होत असून दिनांक ६ नोव्हेंबर पासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. सर्वच मंडळी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणतीही बैठक झालेली नसल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काठावरती बहुमत आल्याने पाच वर्षे सभासदांनी अध्यक्ष पदाच्या संगीत खुर्चीचा चांगलाच अनुभव घेतला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये कारखान्यात ज्या कारखान्याच्या हिताविरोधात घडामोडी झाल्या त्याचे खापर गेले काही दिवस सर्वच मंडळी सोयीनुसार एकमेकांवर फोडत आहेत.
बैठका, मेळावे, पत्रकार बैठका याच्या माध्यमातून एकमेकांवर शिंतोडे उडवण्याचा प्रकार कारखान्यातील प्रमुख नेते मंडळी करत आहेत. एकीकडे एकमेकांची उणी धुणी काढायची आणि दुसरीकडे बिनविरोधची भाषा करायची असा विरोधाभास नेतेमंडळींच्या वागण्यात दिसत असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे.
कारखान्यावर वाढलेला कर्जाचा बोजा, कमी पगारावर काम करणारा नोकरवर्ग, तालुक्यातून इतर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात जाणारा ऊस याकडे कारखान्याच्या प्रमुख मंडळींनी फारसे लक्ष दिलेले नाही. याचा परिणाम म्हणून बेरिंग्ज चोरी प्रकरण, जादाचा वाढलेला कर्जाचा बोजा, तोडणी यंत्रणांनी घेतलेला गैरफायदा व कारखान्याच्या गळीत हंगामात ठरवल्या जाणाऱ्या उद्दिष्ट पुर्तीमध्ये आलेले अपयश होय.
कारखान्याचा कर्मचारी वर्गही आता या काठावरच्या सत्तेला कंटाळला आहे. सत्ता कोणाचीही येऊ देत पण ती पूर्ण बहुमताने यावी जेणेकरून कारखान्याचे सत्ता संघर्षात होणारे नुकसान टाळले जाईल असे स्पष्टपणे कामगारवर्ग प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतो.
कारखान्यात ज्या आघाड्या बनण्याची शक्यता आहे त्या आघाडी प्रमुखांनी यापूर्वीच प्रत्येक गटातील व राखीव जागांवरील उमेदवारांची चाचपणी करून ठेवली आहे. त्यामुळे केवळ बिनविरोधची चर्चा करत रहायचे आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी नेटाने तयारी करायची असाच प्रकार सध्या दिसत आहे.
बिनविरोध करा…पण माझी वर्णी लावा
कारखान्याचे संचालक बनण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. असे असताना सत्ताधारी मंडळी मधील बहुतांशी मंडळी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करा असे सुचवताना दिसत आहेत. पण असे सुचवत असताना माझी वर्णी संचालकपदी लावा हे अप्रत्यक्षरीत्या सांगण्यास विसरत नाहीत हे देखील दिसत आहे.
अशा आघाड्यांची शक्यता...
कारखाना वर्तुळात सुरू असणाऱ्या हालचाली पाहता राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे) व भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची एक आघाडी तर दुसरीकडे भाजपाचे उपजिल्हाप्रमुख अशोकअण्णा चराटी , कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपाचे विद्यमान संचालक, शिवसेना (शिंदे गट) अशा दोन प्रमुख आघाड्या तयार होण्याची शक्यता दिसत आहे.



आजरा साखर कारखान्याचा आज गळीत शुभारंभ
◼️ आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याच्या सन २०२३- २४ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज रविवारी होत आहे. या निमित्त सकाळी आठ वाजता काटापूजन व त्यानंतर प्रगतशील शेतकरी किरण देशपांडे यांच्या हस्ते मोळी टाकून गळीत शुभारंभ करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.
उद्या सोमवारपासून कारखाना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून आज कारखान्याचा गळीत शुभारंभ होत आहे.



ग्रामपंचायत निवडणूकी करता आज मतदान…
दिवाळीपूर्वीच मतदारांची झाली दिवाळी…

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींकरिता आज रविवारी मतदान होत असून गेल्या आठ दिवसातील घडामोडी पाहता आणि दिवाळीच्या तोंडावर असणाऱ्या या निवडणुकांमुळे मतदारांची दिवाळीपूर्वीच दिवाळी झाल्याची तालुक्यात चर्चा आहे.
तालुक्यातील मेंढोली, बुरुडे, वेळवट्टी, देऊळवाडी, हरपवडे, इटे,सुलगाव,मसोली या ग्रामपंचायतींकरता आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या आठवड्यापासून प्रचाराचे धुमशान सुरू आहे. अनेक गावांमध्ये अत्यंत चुरशीची लढत असल्याने मुंबई पुण्यासह ठिकठिकाणी चाकरमानी मतदानासाठी गावी परतला आहे.
पेरणोली गावातील मतदारांचे तर या निवडणुकीमुळे उखळ पांढरे झाले आहे.सरपंच पदाकरिता तब्बल पाच नेटके उमेदवार तर सदस्य पदाच्या नऊ जागांकरिता २९ उमेदवार निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात असल्यामुळे येथे विजयाचे सर्व निकष प्रत्येक उमेदवाराने पार करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच हे सर्व मतदारांच्या पथ्यावर पडले आहे.
हीच अवस्था इतर ग्रामपंचायतीमध्येही असल्याने व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे नगारे वाजू लागल्याने मतदानाबरोबरच निवडणूक निकाल प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.


रस्त्याच्या डागडुजीला मुहूर्त मिळाला… कारखान्याच्या गळीत हंगामाबरोबरच रस्त्याचे पॅचवर्क सुरू

◼️आजरा:प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ मुहूर्त साधून सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर आजरा ते उत्तूर फाटा मार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क सुरू केले आहे. उशिरा का असेना सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम सुरू करण्यास मुहूर्त सापडला. काम सुरू झाल्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे.
आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम आज रविवारपासून सुरू होत आहे. सध्या सुरू असणाऱ्या गडहिंग्लज – आंबोली या नव्याने सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे जुन्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीकरीता धोकादायक बनला आहे. एकीकडे ऊस वाहतूकदार मंडळींची या मार्गावरून वर्दळ वाढणार आहे तर दुसरीकडे या मार्गाची दुर्दशा झाली असल्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील हा एक प्रमुख अडसर बनणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सध्या किमान रस्त्याचे पॅचवर्क करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.



बिनविरोधची मानसिकता ठेवून कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्याचा उत्तूर येथील मेळाव्यात निर्णय
◼️आजरा: प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये बिनविरोधचा पर्याय समोर येऊ लागला आहे. जिल्हा पातळीवरील राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधील राहून व प्रसंगी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत अशा सूचना उत्तूर विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आल्या.
यावेळी बोलताना माजी चेअरमन वसंतराव धुरे म्हणाले, सद्यस्थितीला साखर कारखान्याला निवडणूक खर्चाचा बोजा पेलण्याजोगी परिस्थिती नाही याकरिता निवडणूक बिनविरोध व्हावी अशी प्रमुख मंडळींची इच्छा आहे. तरीदेखील निवडणूक पार पडली तर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. निवडणुकीचे प्रमुख निर्णय जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह या प्रक्रियेत असणारे इतर नेते घेतील त्या निर्णयाशी आपण बांधील राहून उमेदवारी अर्ज दाखल करूया असे त्यांनी सुचवले याला सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली.
उपस्थितांचे स्वागत गणपतराव सांगले यांनी केले, तर आभार काशिनाथअण्णा तेली यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपकराव देसाई, तालुका संघाचे संचालक संभाजी तांबेकर, सुनील देसाई,माजी उपसभापती शिरीष देसाई, जम्बोअण्णा गोरुले, बापू नेऊंगरे,गोविंद सावंत, शशिकांत जाधव, पांडुरंग तोरगले, राजू चव्हाण, धनाजीराव देसाई, सुधीर सावंत, मच्छिंद्र कडगावकर, संजय गाडे, बबन पाटील, सुशांत गुरव, आनंदा घाटगे, शशिकांत जाधव यांच्यासह उत्तुर पंचक्रोशीतील राष्ट्रवादीची प्रमुख मंडळी उपस्थित होती.



‘लालपरी ‘चा प्रवास महागला ; किती वाढले भाडे?

एसटी महामंडळाने ऐन दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीने केलेल्या दरवाढीचा दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या तसंच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळ महसूलवाढीसाठी सुट्यांच्या दिवसात परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सुत्रानुसार भाडेवाढ करत असते.
दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण नातेवाईकांसह साजरे करण्याची प्रथा आहे. दिवाळीत शाळा-महाविद्यालयांनाही मोठी सुट्टी असल्याने सहकुटुंब गावी जाण्यासाठी गर्दी असते. यामुळे रेल्वे, खासगी गाड्यांसह एसटीही प्रवाशांनी भरून धावत असतात. यंदा ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अर्थात ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरनंतर मुळ दराने तिकीट आकारणी सुरू होणार आहे. आरक्षित तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडेदरातील फरकाचे पैसे प्रवास करताना द्यावे लागणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
शिवनेरी, ई-शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, परिवर्तन (लालपरी), हिरकणी, शितल, विना वातानुकूलित शयनयान, विना वातानुकूलित आसनी व शयनयान अशा सर्व बस श्रेणींसाठी भाडेवाढीनुसार तिकीट आकारण्यात येणार आहे.
एसटीला झाला योजनांचा फायदा
दिवाळी हंगामाचा फायदा उठवण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळ अशा प्रकारची भाडेवाढ करत असते. अशा प्रकारची भाडेवाढ करण्याची एसटीला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उन्हाळी अथवा दिवाळी सुट्टीनिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करत असते. एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच लांबलेला कामगारांचा संप यामुळे एसटीचे काम आणखीनच गर्तेत अडकले. एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरली ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ हळूहळू आर्थिक गर्तेतून बाहेर पडत आहे.
News Source…..
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq


🟥🟨🟦🟩🟪⬛🟫⬜🟧🟥🟨🟦🟩

🟫⬜🟧🟥🟨🟦🟩🟪⬛🟫⬜🟧🟥

