mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

🟣🔴🟠🟣🔴🟠🟣🔴🟠🟣🔴🟠🟣

बिनविरोध साठी हरकत नाही…निवडणूक लागलीच तर सक्षमपणे लढू : अशोकअण्णा चराटी

                    आजरा : प्रतिनिधी

      तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी दगाफटका झाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु ही चुक साखर कारखाना निवडणुकीत होणार नाही. बिनविरोध निवडणुकीसाठी आपण तयार आहोत,परंतु निवडणूक लागलीच तर निवडणुकीलाही सक्षमपणे सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवली आहे असे प्रतिपादन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांनी केले.आजरा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

        यावेळी बोलताना अशोकअण्णा म्हणाले, आपण केवळ दोन वर्षे कारखान्याचे अध्यक्ष होतो. परंतु तीन वर्षांमध्ये कारखान्यावर शंभर कोटी कर्जाचा बोजा करण्यास आपण कारणीभूत आहोत असे विरोधी आघाडीतील वसंतराव धुरे हे सांगत आहेत. मुळातच धुरे यांनी गेल्या दोन वर्षात किती बैठकांना उपस्थित लावली हे प्रथम स्पष्ट करावे मग कारखान्याच्या हिताची भाषा करावी. अध्यक्ष पद कालावधीत कामगारांसह कोणाचीही देणे शिल्लक ठेवली नाही. असे असताना सध्या सत्तेत असणाऱ्या संचालकांनी कर्ज प्रकरणासह इतर कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला. परिणामी कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला.कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत असताना मंत्री मुश्रिफ यांच्याकडून जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी आपण प्रयत्न केला. परंतु मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या मंडळींनी आपणाला पैसे न देण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले. तुम्ही एक व्हा आपण पैसे देऊ असेही यावेळी मुश्रिफ यांनी सांगितले होते.अशावेळी सध्याच्या विद्यमान जिल्हा बँक संचालकांनी कारखाना बंद करण्यासाठीच जोरदार प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केला.

        कोणत्या अधिकाराने तुम्ही आम्हाला कारखाना देशोधडीला लावला असे म्हणता ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली अपेक्षा आहे,यासाठी वरिष्ठ नेते मंडळींच्या भेटीगाठी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

         साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, संस्था चालवणारी आपण मंडळी आहोत. कारखाना सक्षमपणे चालावा यासाठी आपण वेळोवेळी निकराचे प्रयत्न केले आहेत. परंतु काही मंडळी कारखाना चालवण्याऐवजी बंद कसा पडेल यासाठी प्रयत्नशील आहेत. विष्णुपंत केसरकर व सुधीर देसाई यांनी स्वतःच्या इतिहासाबद्दल आत्मपरीक्षण करावे. एकीकडे कारखाना काटकसरीने चालवण्याची गरज असताना अध्यक्ष प्रा.शिंत्रे व अंजनाताई रेडेकर यांनी २५ हजार टन ऊस कर्नाटकातून आणला परिणामी वाहतूक खर्च वाढला.  टिकवायची असेल तर ती चांगल्या मंडळींच्या हाती जाण्याची गरज आहे याचे भानही सभासद व कामगारांनी ठेवण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

        गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यमान अध्यक्षांनी कारखाना कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी चालवला की कर्ज वाढवण्यासाठी प्रयत्न केले हे सांगण्याची आता गरज आहे. शंभर कोटी रुपयांचे कर्ज वाढवण्यास विरोधी संचालक जबाबदार आहेत विरोधी संचालकांच्या गावा- गावातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना कसा गेला ? याचा खुलासा त्यांनी करावा. कारखाना हे तालुक्याचे वैभव आहे ते आमच्या हाती द्या. आम्ही सक्षमपणे चालवू असे मलिक कुमार बुरुड यांनी सांगितले.

        संचालक दिगंबर देसाई म्हणाले, तुमच्या मर्जीतले चेअरमन तुम्ही केल्यानंतर ३९ कोटी रुपये कर्जाचा बोजा फिटण्याऐवजी तो वाढला कसा ? इथेनॉल सारखा मंजूर करून आणलेला प्रकल्प मार्गी का लागला नाही? विद्यमान अध्यक्ष सांगत असल्याप्रमाणे खरोखरच कारखान्याला एक कोटी रुपये नफा झालेला आहे का? प्रसंगी कॉलेज गहाण टाकून कारखाना चालवतो म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्षात काय केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी द्यावीत या उत्तरातच कारखाना बंद का पडला? याची उत्तरे सापडतील असे सांगितले.

     यावेळी अशिशकुमार देसाई, जनार्दन टोपले सौ. सुनीता रेडेकर, दशरथ अमृते,विलासराव नाईक यांनीही आपली मते मांडली.

तीन हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले...

      कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर भाग भांडवलाच्या माध्यमातून पैसे उभा करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे ३००० सभासदांकडून पैसे घेतले गेले. या सभासदांना कोणतीही कल्पना न देता त्यांचे सभासदत्व सत्ताधारींनी रद्द केले. यामुळे सभासदांना पैसे भरल्याचा कोणताच फायदा झाला नाही परंतु मतदानापासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे . आपण यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले.

विघ्नसंतोषीना जवळ घेऊन आपणाला कारखान्यातून बाहेर काढले…

        कारखान्यातील काही विघ्नसंतोषी कामगार मंडळींना जवळ घेऊन सत्ताधाऱ्यांनी आपणाला अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरून बाजूला करण्याबरोबरच वर्षभरासाठी कारखान्या बाहेर काढले.यामुळे नेमके काय साध्य झाले ? याचा विचार ही कर्मचाऱ्यांनी करावा असे यावेळी चराटी यांनी सांगितले.


शिवसेना बिनविरोधासाठी प्रयत्नशिल : प्रा. सुनिल शिंत्रे

                    आजरा ; प्रतिनिधी

        आजरा साखर कारखान्यासमोर सध्यस्थितीस अनेक अडचणी आहेत.कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडल्यानंतर अथक प्रयत्न करून नेतेमंडळीच्या सहकार्याने कारखाना सहकारातच ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या वर्षी पावसाने दगा दिल्याने यंदाच्या गळीत हंगामाबरोबरच याचा परिणाम पुढील वर्षीही भोगावा लागणार आहे. कारखाना निवडणुकीचा खर्च हा निश्चितच परवडणारा नाही. सर्वांनी एकत्रीत येवून कारखाना चालवल्यास आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवसेना पक्ष म्हणून निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी प्रसंगी सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या सोबत चर्चाही करण्याची तयार आहे. असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले.

           येथे शिवसेना उध्दव ठाकरे गटातर्फे पत्रकार बैठक झाली. बैठकीला जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव देसाई, यांच्या कन्या सौ. मंजूषा इंगवले, सौ. सरोज सरनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

         या वेळी प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, कारखाना सहकारी तत्वावर चालू राहण्याबरोबरच कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी डिस्टलरीसारखा प्रकल्प सुरु करण्याची गरज आहे. कारखान्यामध्ये संचालक मंडळांतर्गत संघर्ष यापूढे परवडणारा नाही. यासाठी निवडणूक बिनविरोधसाठी आग्रही आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर प्रसंगी थांबण्याची आपलीही तयारी आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला सुनिल डोंगरे, ओंकार माद्याळकर, सागर नाईक, दिनेश कांबळे, मारुती डोंगरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आजरा तालुका शिवसेना प्रमुख युवराज पोवार यांनी स्वागत केले. कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

 संस्थापक अध्यक्षांचे नाव देण्यास विरोध…

           येत्या निवडणुकीत बिनविरोधासाठी शक्य ती मदत करण्यास स्व. देसाई यांचे कुटुंबीय म्हणून आपली तयारी आहे. सर्वपक्षीयांनी कारखाना सुरु रहावा यासाठी प्रयत्न करावेत. केवळ निवडणुकीपुरते संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांचे नाव वापरु नये. ते वापरणार असाल तर किमान त्यांच्या कुटुंबीयाची परवानगी घ्या. अशी भूमिका या वेळी सौ. मंजूषा इंगवले, सौ.सरोज सरनाईक यांनी मांडली.

बिनविरोधसाठी नेत्यांशी बोलू…

        आजरा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यासाठी आपण कारखान्याशी संबंधित जिल्हा पातळीवरील संवाद साधणार आहोत अशी यावेळी प्रा. शिंत्रे यांनी स्पष्ट केले.

 स्व.देसाई यांच्या कुटुंबीयांना संचालक मंडळात जाणे आवडेल का..?

       स्व. वसंतराव देसाई यांचे कारखाना उभारणीत मोठे योगदान आहे.या पत्रकार बैठकीस त्यांच्या कन्या उपस्थित राहिल्यानंतर त्यांना आपणाला संचालक मंडळात जाणे आवडेल का? अशी विचारणा केली असता आजपर्यंत कोणीही आमचा विचार केला नाही.मात्र आघाडी प्रमुखांनी विचार केल्यास आम्हीही निश्चित विचार करू असे त्यांनी सांगितले.


आजरा साखर कारखाना निवडणूक लढवण्याचा निर्णय :काॅ.दत्तात्रय अत्याळकर

                    आजरा:प्रतिनिधी

           आजरा येथील आजरा साखर कारखाना निवडणूक लढवण्याचा निर्णय येथील गिरणीकामगार ऑफिस मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना काॅ. दत्तात्रय अत्याळकर म्हणाले, आजरा साखर कारखाना निवडणूकीत मातब्बर, प्रस्थापित समाजातील लोकांना उमेदवारी दिली जाते .यासाठी सर्व श्रमिक संघटना यांच्या वतीने गिरणीकामगाराना उमेदवारी देऊन समविचारी पक्ष संघटना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहे.

         यानंतर ६ नोव्हेंबर रोजी, आजरा तालुक्यातील पेन्शन धारकाचा मेळावा, पेन्शन वाढीच्या लढ्यासाठी बोलवले आहे, तसेच गिरणीकामगारना म्हाडा कडून आलेली पत्रे दिशाभूल करणारी आहेत,असे मत व्यक्त केले. काॅ. शांताराम पाटील यानी, मंबईत गिरणी कामगारानी आपले आयुष्य घालवले. गिरणी कामगार संपात बाहेर पडून तीस वर्षे झाली .त्यामुळे गिरणीचा एक पुरावा ग्राह्य धरून एकही गिरणीकामगार वंचित राहणार नाही यासाठी आ.सुनिल राणे व म्हाडाना निवेदन दिले आहे.याचा विचार करून शासनाकडून मुंबईत घरे देण्यात यावीत असे मत व्यक्त केले.

        यावेळी नारायण भंडागे, तानाजी कुरळे यांनी ही आपले मत व्यक्त केले.

        यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आबा पाटील, जानबा धडाम, शांताराम हारेर ,मनप्पा बोलके, विजय पाटील, नारायण राणे यांच्या सह गिरणीकामगार उपस्थित होते आभार निवृत्ती मिसाळ यांनी मानले .

आजरा कारखाना निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम पुढील प्रमाणे….

उमेदवारी अर्ज दाखल करणे-६ नोव्हेंबर पासून मतदान – १७ डिसेंबर.                     मतमोजणी १९ डिसेंबर

 निवडणूक निर्णय अधिकारी -गोपाळ मावळे प्रादेशिक उपसंचालक

 सहाय्यक निवडणूक अधिकारी- अमित गराडे (सहाय्यक निबंधक गडहिंग्लज), सुरज येजरे (सहाय्यक निबंधक, आजरा)

सभासद अ वर्ग २५१८१

ब वर्ग – ७६०३

एकूण संचालक संख्या -२१


ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार थंडावला… उद्या मतदान 

                        आजरा : प्रतिनिधी

        गेले आठ दिवस सुरू असलेला आजरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. या ग्रामपंचायत करता उद्या रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होत असून निवडणुकी यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.

        तालुक्यातील पेरणोली, बुरुडे, मेंडोली, मसोली हरपवडे , ईटे, देऊळवाडी, वेंळवट्टी, सुलगाव या ग्रामपंचायतीकरता निवडणूक प्रक्रिया होत आहे.सरपंच पदासाठी २२ तर सदस्य पदासाठी १४३ इच्छुक निवडणुकीला सामोरे जात आहेत.

      निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी २४ केंद्राध्यक्ष, २४ मतदान अधिकारी मतदान अधिकारी, वर्ग २ चे २४ मतदान अधिकारी वर्ग ३ चे २४ अधिकारी या प्रक्रियेत भाग घेणार आहेत.४८ शिपाई व पोलीस,३ झोनल अधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राखीव स्वरूपात ३ केंद्राध्यक्ष व ९ मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

        मतमोजणी मंगळवार दिनांक ८ रोजी सकाळी आजरा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून पासून सात टेबलावर होणार आहे.

        प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पेरणोली, बुरुडे, इटे या गावावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.


आज आज-यात….

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांचे श्री रवळनाथ मंदिर आजरा येथे दुपारी ४ वाजता ‘सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन दहशतवाद्यांचे षडयंत्र ? ‘या विषयावर मार्गदर्शन….

मंत्री मुश्रीफ आज उत्तूरात…

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज शनिवारी सकाळी १०.३० वा. उत्तूर येथे उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.


निधन वार्ता.
गोपाळ कातकर

       मडिलगे येथील गोपाळ विठोबा कातकर ( वय वर्ष ६७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते निवृत्त गिरणी कामगार होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

माजी सैनिक व सध्या कोल्हापूर पोलीस सेवेत असलेले स्वागत कातकर व टू व्हीलर मेकॅनिकल संघटनेचे आजरा ता. अध्यक्ष भूषण कातकर यांचे वडील होत.

गोपाळ बुवा

       निंगुडगे, तालुका आजरा,येथील
गोपाळ गणपत बुवा, माजी सैनिक निंगुडगे यांचे शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी, वयाच्या ८५ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवार सकाळी ८ वाजता, निंगुडगे येथे होणार आहेत. ते पत्रकार य. ग. गिरी यांचे थोरले बंधू होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

🟥🟧⬜🟫⬛🟪🟩🟦🟨🟥🟧⬜🟫

संबंधित पोस्ट

नानासाहेब (बंटी) देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews

देवकांडगाव येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू…बहिरेवाडी येथे मारामारी… चार जखमी

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जवाहर पतसंस्थेत सत्‍ताधारी पै. सुलेमानशेठ दिडबाग आघाडीची बाजी…. विरोधकांना धोबीपछाड

mrityunjay mahanews
error: Content is protected !!