

दुचाकी अपघातात एक ठार

आजरा: प्रतिनिधी
गवसे ता.आजरा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात बाळासाहेब तुकाराम यादव (वय ५४ वर्षे) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला होता. स्थानिक नागरिकांना ते जखमी स्थितीत आढळल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास यादव हे घरी चालले असताना त्यांच्या दुचाकीला आजरा आंबोली मार्गावरील गवसे येथील राम मंदिर परिसरात अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यादव हे वारकरी होते. गवसे ग्रामपंचायतचे माजी सदस्य व नवजीवन दूध संस्थेचे उपाध्यक्ष असणाऱ्या यादव यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सूना, जावई, आई -वडील अशा परिवार आहे.
अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.


आज-यात
‘ पाणी ‘बाणी
शहरवासीयांना वाली नाही…

आजरा: प्रतिनिधी
विजेचा सुरू असणारा खेळखंडोबा व राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे खुदाई करताना ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनेची झालेली मोडतोड व नगरपंचायतीकडून होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या काठावर वसलेल्या आजरा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून यामुळे शहरासह उपनगरातील अनेक भागातील नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
मुळातच गेले वर्षभर शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे गेल्या चार महिन्यापासून महामार्गाचे काम आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू झाले आहे.मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही खुदाई सुरू असल्याने शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली आहे. ही दुरुस्ती करताना नगरपंचायतीवर मर्यादा येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे त्या भागामध्ये पाणीपुरवठा करताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा अडथळा निर्माण होत आहे. कांही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे शासकीय विश्रामगृह ते आजरा न्यायालयाच्या नूतन इमारतीपर्यंत खुदाई झालीच आहे परंतु त्याचबरोबर शहरातही ठिकठिकाणी खुदाई झाल्याने दहा चाकी टँकर द्वारे पाणीपुरवठा करणे अशक्य झाले आहे. एकीकडे रस्त्यांअभावी मोठा टँकर गल्लीबोळात जाऊ शकत नाही, तर दुसरीकडे छोट्या टॅंकरचे पाणी मागणीपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. शहरालगत झालेल्या नवीन वसाहतींमध्ये पाण्याची अवस्था फारच बिकट बनत चालली आहे यातील बहुतांशी वसाहती या केवळ नगरपंचायतीवर पाण्याबाबत अवलंबून आहेत.
पाणी विकत घेण्याची वेळ…
महामार्ग व्यवस्थापनासह आजरा नगरपंचायतीच्या भरवशावर न राहता अनेक शहरवासीय स्वखर्चाने पाणी विकत घेताना दिसत आहेत. परंतु असे पाणी किती दिवस विकत घ्यावे लागणार ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
नगरपंचायतीचे कानावर हात…
नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याबाबत शहरवासीयांना योग्य ती माहिती दिली जात नाही. यामुळे नगरपंचायतीच्या विरोधात वातावरण बनू लागले आहे. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी फोन स्विच ऑफ करून नागरिकांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचे टाळत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यातूनही एखाद्याला संपर्क झालाच तर ती मंडळी महामार्ग प्रशासनाकडे बोट दाखवताना दिसतात.
नगरपंचायतीला कारभारीच नाहीत…?
नगरपंचायतीच्या नगरसेवकांची मुदत संपली असल्याने नगरसेवकांना देखील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून फारशी दाद दिली जात नाही. त्यामुळे केवळ नगरसेवकांचे अस्तित्व हे नाम फलकावरील नावापुरतेच असल्याचेही बोलले जात आहे. आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे परशुराम बामणे व त्यांचे सहकारी मात्र शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी महामार्ग व नगरपंचायतीकडे वारंवार प्रयत्न व पाठपुरावा करताना दिसत आहेत.



वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना नामकरण फलकाचे अनावरण

आजरा: प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादीत झालेल्या २ लाख साखर पोत्यांचे पूजन व वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना नामकरण फलकाचे अनावरण कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव बापुसोो धुरे यांचे हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थित पार पडले.
आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात ७० दिवसांत १,७६,१४० मे.टन ऊसाचे गाळप करून २,०५,००० मे.टन साखरेचे उत्पादन झाले असुन सरासरी ११.६३ टक्के इतका साखर ऊतारा प्राप्त झालेला आहे.
यावेळी चेअरमन श्री. वसंतराव बापुसोो धुरे यांनी कारखान्याचे गाळप नियोजना प्रमाणे व्यवस्थित करण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन या गळीत हंगामात किमान ३ लाख ५० हजार मे.टन गाळप करणेसाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे. तसेच इतर कारखान्यांचे बरोबरीने होणारी ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्यावेळी पाठविणेत येत आहे. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बिलेही देणेत येत आहेत. येथुन पुढेही येणा-या ऊसाची व तोडणी वाहतुकीची बिले वेळेत आदा करणेचे नियोजन संचालक मंडळाने ना. हसन मुश्रीफ, पालकमंत्री कोल्हापूर यांचे मार्गदर्शना नुसार कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा कारखान्याकडे गळीतास पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन केले.
या संयुक्त कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. मधुकर देसाई, कोल्हापुर जिल्हा बँकेचे संचालक तथा कारखान्याचे बँक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई कारखान्याचे संचालक, श्री. मुकुंदराव देसाई, श्री.उदयसिंह पोवार, श्री. अनिल फडके, श्री.रणजित देसाई, श्री.संभाजी रामचंद्र पाटील, श्री.राजेंद्र मुरुकटे , श्री. गोविंद पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री. हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम सौ. मनिषा देसाई, तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण तसेच कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक व्ही.के.ज्योती, जनरल मॅनेंजर (टेक्नी) श्री.व्ही.एच.गुजर, प्रोडक्शन मॅनेंजर श्री.एस.के.सावंत, आदी खातेप्रमुख, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…

आजरा: प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आजरा येथे फोटो पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख)श ओंकार माधद्याळकर ,शिवसेना उप शहर प्रमूख दयानंद भोपळे, भिकाजी विभुते,युवासेना उपजिल्हा प्रमुख, तालुका संघ संचालक महेश पाटील,रोहन गीरी, सुयश पाटील, विलास शिवनगेकर, मनीष गुरव , इतर सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



धार्मिक….
आयडियल कॉलनीचा उत्स्फूर्त सहभाग…

आयडीयल कॉलनी, आजरा येथील संयोगिता बापट ,साधना पाटील, वर्षा नार्वेकर, मुकुंद फडके , संजय नार्वेकर, रमेश पाटील ,कृष्णा यादव, प्रकाश परळकर ,दत्तात्रय धडाम इत्यादी राम भक्तांनी आजरा येथील विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.



निवड…
दिपक देसाई

मडिलगे ता.आजरा येथील श्रीराम सहकारी दूग्ध चेअरमनपदी वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे संचालक व माजी पं.स. उपसभापती दीपक देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भिकाजी गुरव, राजाराम येसणे, संजय घंटे यांच्यासह सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निधन वार्ता…
दशरथ साळुंखे

शिवाजी नगर, आजरा येथील दशरथ कोंडीबा साळुंखे (वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असापरिवार परिवार आहे. गुरुवार दिनांक २५ रोजी आजरा येथे रक्षा विसर्जन आहे.




